सुनील तावडे सांगतायेत लोक मला घाबरायला लागले आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 17:42 IST2017-07-31T12:12:13+5:302017-07-31T17:42:13+5:30

दुहेरी या मालिकेत सुनील तावडे परसू ही भूमिका साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

People are scared of me in Sunil Tawde. | सुनील तावडे सांगतायेत लोक मला घाबरायला लागले आहेत...

सुनील तावडे सांगतायेत लोक मला घाबरायला लागले आहेत...

हेरी या मालिकेत सुनील तावडे परसू ही भूमिका साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या या भूमिकेबाबत आणि त्यांच्या एकंदर कारकिर्दीबाबत त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

का रे दुरावा या मालिकेतील आणि दुहेरी या मालिकेतील तुमची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायच्या असे तुम्ही ठरवले आहे का?
मी माझ्या कारकिर्दीत नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे पसंत करतो. मी नेहमीच वेगळ्या भूमिकेच्या शोधात असतो. भूमिका वेगळी असल्याशिवाय ती स्वीकारायची नाहीच असे माझे ठरलेले असते आणि त्यातही भूमिकांमध्ये काहीसे सार्धम्य असल्यास भूमिकेत काहीतरी वेगळेपणा आणण्याचा मी प्रयत्न करतो. मी माझ्या कारकिर्दीत अनेकवेळा खलनायकाची भूमिका साकारली आहे. पण तरीही नेहमीच ही भूमिका मी वेगवेगळ्या पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न केला आहे. 

दुहेरी ही मालिका सुरू होऊन जवळजवळ वर्षं झाले आहे, परसू या तुमच्या भूमिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे?
परसू ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे आणि विशेष म्हणजे या व्यक्तिरेखेला लोक प्रचंड घाबरत आहेत. तुझी आम्हाला खूप भीती वाटते असे माझे जवळचे मित्रदेखील मला सांगतात. एका बाईने तर मला भेटल्यावर चक्क नमस्कार केला होता आणि तुमची मला खूपच भीती वाटते असे त्या मला म्हटल्या होत्या. लोकांना एखाद्या मालिकेतील मुख्य कलाकार आवडतात. पण मुख्य भूमिकेइतकीच लोकप्रियता दुहेरी या मालिकेतील खलनायकाच्या भूमिकेने मला मिळवून दिली आहे.

तुम्ही गेली अनेक वर्षं इंडस्ट्रीमध्ये आहात, गेल्या अनेक वर्षांत इंडस्ट्री किती बदलली आहे असे तुम्हाला वाटते?
गेल्या काही वर्षांत इंडस्ट्री खूपच बदलली आहे यात काहीच शंका नाही. आज लोक खूप प्रॅक्टिकल झाले आहेत. आज चित्रपट, मालिका कोणतेही माध्यम असो प्रमोशनशिवाय पर्याय नसतो. तसेच सोशल मीडियाच्या मार्फत प्रत्येक जण स्वतःचे प्रमोशन करतो. गेल्या काही वर्षांपर्यंत तसे काहीच नव्हते. पूर्वी नाटक आणि चित्रपट ही दोनच माध्यम होती. पण आता नाटक, मालिका, चित्रपट त्याचसोबत डबिंग असे अनेक पर्याय कलाकारांना मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या आर्थिक गणितामध्ये देखील सुधारणा झाल्या आहेत. 

सध्या वेबसिरिजचा जमाना आहे, त्याबद्दल तुमचे काय मत आहे?
वेबसिरिज हे खूपच चांगले माध्यम आहे यात काहीच शंका नाही. दिवसेंदिवस अनेक माध्यमं निर्माण होत आहेत आणि त्यामळे कलाकारांना अनेक संधी मिळत आहेत. पण वेबसिरिजमुळे मालिकांचे महत्त्व कमी होईल असे मला कधीच वाटत नाही.

तुमची दोन्ही मुलं मराठी इंडस्ट्रीमध्ये आहेत. त्यांच्याबद्दल काही सांगा.
माझी मुलगी सरस्वती, चूकभूल द्यावी घ्यावी यांसारख्या मालिकांची असोसिएट डायरेक्टर आहे. तसेच आता एका चित्रपटासाठी ती असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करत आहे. तिला कॅमेऱ्याच्या पुढे नव्हे तर मागे राहायला आवडते. तिला कलाकार निर्माण करायला आवडतात असे ती सांगते तर माझा मुलगा अभिनेता असून त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केले आहे. डबल सीट या चित्रपटात तो झळकला होता. तसेच फ्रेशर्स या मालिकेतही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. 


Also Read : दुहेरी मालिकेमध्ये परतलेली मैथिली आहे की सोनिया?

Web Title: People are scared of me in Sunil Tawde.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.