शेतात राबतोय 'हा' मराठी अभिनेता, VIDEO व्हायरल, तुम्ही ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:12 IST2025-07-01T13:12:16+5:302025-07-01T13:12:49+5:30
लोकप्रिय अभिनेता स्वतः शेतात काम करताना दिसत आहे.

शेतात राबतोय 'हा' मराठी अभिनेता, VIDEO व्हायरल, तुम्ही ओळखलंत का?
मराठी कलाविश्वातील कलाकार केवळ त्यांच्या अभिनयापुरतेच मर्यादित राहत नाहीत, तर विविध क्षेत्रांत सक्रिय राहून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. हटके भूमिका, दमदार अभिनय यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारे हे कलाकार सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी ते आवर्जून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अभिनयाच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून अनेक कलाकार आपली दुसरी आवड जोपासताना दिसतात. काही कलाकार असेही आहेत ज्यांना शेतात रमायला अधिक आवडतं. शेतात राबण्याचं समाधान काही वेगळंच असतं. अशाच एका कलाकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो शेतात राबताना दिसतोय.
अभिनेता कपिल होनराव सध्या त्याच्या मूळ गावी आहे. यावेळी शेतातून त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात तो शेतात काम करताना दिसतोय. कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, Back+shoulder+ bicep +tricep + cardio = 1000 वृक्षारोपण. माझं वर्कआऊट... वृक्षारोपणाच महत्व आज किती आहे हे वेगळ सांगायची गरज नाही", असं त्यानं म्हटलं. यासोबतचं त्यानं #golbalwarming #love #झाडे लावा झाडे जगवा हे हॅशटॅगही शेअर केलेत. शेतात काम करताना आपोआपच शारीरिक व्यायामही होतो, असं त्यानं या पोस्टमधून अधोरेखीत केलंय. मातीशी जोडलेलं आयुष्य केवळ समाधानीच नव्हे, तर शरीरासाठीही उपयुक्त ठरू शकतं.
कपिल होनरावच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर कपिलने अनेक मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेनंतर कपिलने 'निवेदिता माझी ताई' मध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. 'जय जय शनिदेव' या मालिकेत तो राजा विक्रमादित्यच्या भूमिकेत दिसला होता.