‘ललित २०५’, ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘छोटी मालकीण’ मालिकेचा महासंगम एपिसोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 06:00 IST2018-09-14T14:45:34+5:302018-09-15T06:00:00+5:30
यंदा राजाध्यक्षांच्या घरी गणपती बाप्पाचे थाटामाटात आगमन झाले आहे. राजाध्यक्षांच्या या आनंदात ‘छोटी मालकीण’ आणि ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेचे कलाकारही सहभागी होताना दिसणार आहेत.

‘ललित २०५’, ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘छोटी मालकीण’ मालिकेचा महासंगम एपिसोड
आपल्या सर्वांचे लाडके दैवत म्हणजे गणपती बाप्पा. या लाडक्या दैवताची आपण वर्षभर आतुरतेने वाट पहात असतो. ‘ललित २०५’ या मालिकेतले राजाध्यक्ष कुटुंबही गेले कित्येक वर्ष बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसले आहेत. यंदा मात्र त्यांची ही प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. धाकटी सून भैरवी राजाध्यक्षांची ही इच्छा पूर्ण करणार आहे. भैरवीच्या पुढाकारामुळेच यंदा राजाध्यक्षांच्या घरी गणपती बाप्पाचे थाटामाटात आगमन झाले आहे.
राजाध्यक्षांच्या या आनंदात ‘छोटी मालकीण’ आणि ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेचे कलाकारही सहभागी होताना दिसणार आहेत. सणाच्या निमित्ताने का होईना आपापसातले हेवेदावे विसरुन राजाध्यक्ष कुटुंब एकत्र आले आहे. मनात मात्र कटुता कायम आहे. बाप्पाच्या येण्याचा आनंद जरी असला तरी भैरवीमुळे हा आनंद घरात आलाय ही गोष्ट नीलिमा आणि गार्गीला खटकते आहे. त्यामुळे भैरवीच्या आनंदात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न या दोघी करणार आहेत. आता नीलिमा आणि गार्गीचा हा प्लान यशस्वी होतो का? भैरवी बाप्पाची पूजा निर्विघ्नपणे पार पाडणार का? छोटी मालकीण आणि लेक माझी लाडकीमधले कलाकार या सणाचा आनंद कसा द्विगुणीत करणार का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे गणपती विशेष भागात मिळतील. तेव्हा गणपती विशेष महासंगम रविवार १६ सप्टेंबरला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.