जाणून घ्या काय आहे तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा म्हणजेच हार्दिक जोशीचा फिटनेस फंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 15:37 IST2018-07-05T12:36:08+5:302018-07-10T15:37:50+5:30
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणाची भूमिका साकारणारा हार्दिक जोशी त्याच्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सर्तक आहे. त्यांच्या फिटनेस सिक्रेटविषयी त्याने नुकतेच सांगितले आहे.

जाणून घ्या काय आहे तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा म्हणजेच हार्दिक जोशीचा फिटनेस फंडा
अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने नुकतंच ५०० यशस्वी भागांचा टप्पा गाठला. या मालिकेतील अंजली आणि राणा नव्हेच तर बरकत, नंदिता वहिनी, चंदे हि सगळी पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजनच नाही केलं तर कुस्ती या खेळाचं महत्व देखील दर्शवलं. अंजली आणि राणा यांची हृदयस्पर्शी प्रेमकथा, कठीण परिस्थितीत न डगमगता, एकमेकांच्या साथीने प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची दोघांची वृत्ती प्रेक्षकांना भावली. लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या या मलिकने प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्याने मैलाचा दगड पार पडला आहे. या मालिकेतील राणा म्हणजेच हार्दिक जोशीचा फिटनेस प्रेक्षकांना प्रचंड आवडतो.
'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका नेहमीच टिआरपी रेसमध्ये अव्वल ठरली आहे. राणादा आणि पाठकबाई यांची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. त्याचा फिटनेस फंडा शेअर करताना राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी सांगतो, "मी शूटिंग संपल्यानंतर नियमितपणे जिमला जातो. जिमला जाणं मी कधीच टाळत नाही तसेच वर्कआऊट करताना मी एकाच अवयवावर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण शरीराचा व्यायाम करतो. चपळपणासाठी मी योगा देखील करतो... त्यामुळे शरीराला स्टिफनेस येत नाही. तसेच तालमीचे सीन शूट करताना सूर्यनमस्कार करावे लागतात तसेच डीप्स मारावे लागतात. त्यामुळे हे व्यायाम जास्त करण्याकडे माझा भर असतो. हा झाला व्यायामाचा भाग, पण त्यासोबतच डाएट करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. राणादा हा एक पेहलवान असल्यामुळे त्याची शरीयष्टी ऑनस्क्रीन चांगली दिसली पाहिजे. म्हणूनच व्यायामासोबत डाएटवर देखील मी कटाक्षाने लक्ष देतो. माझ्या रोजच्या आहारात पाव लिटर दूध, एक लिटर ताक, १५-२० अंडी आणि मांसाहार यांचा समावेश असतो."