बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
By कोमल खांबे | Updated: October 13, 2025 16:27 IST2025-10-13T16:25:58+5:302025-10-13T16:27:42+5:30
वयाने मोठ्या असलेल्या आणि एका दिग्गज अभिनेत्यासमोर इशित त्याच्या अकलेचे तारे तोडताना दिसला. ज्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय रिएलिटी शोमध्ये काही ज्युनियर्स त्यांची हुशारी दाखवणार आहेत. केबीसी ज्युनियर सुरू झालं असून अतिशय हुशार असलेली छोटी मुलं हॉटसीटवर बसताना दिसत आहेत. त्यांच्या हुशारीने बिग बी आश्चर्यचकित झाले. मात्र, नुकत्याच प्रसारित झालेल्या केबीसीच्या एका भागात गुजरातचा इशित भट्ट सहभागी झाला होता. पण, वयाने मोठ्या असलेल्या आणि एका दिग्गज अभिनेत्यासमोर इशित त्याच्या अकलेचे तारे तोडताना दिसला. ज्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यामध्ये हॉटसीटवर बसलेला इशित बिग बींशी उद्धटपणे बोलताना दिसत आहे. नवीन स्पर्धक हॉटसीटवर बसल्यानंतर बिग बी त्याला खेळाचे नियम प्रत्येकवेळी समजावून सांगतात. मात्र या मुलाने हॉटसीटवर बसल्यानंतर बिग बींना उद्धटपणे "तुम्ही मला आता नियम समजावत बसू नका. मला सगळं माहीत आहे", असं म्हटलं. एवढ्यावरच तो मुलगा थांबला नाही तर अमिताभ बच्चन यांनी पुढे प्रश्न विचारताच तो त्यांच्याशी उद्धटपणे बोलताना दिसला. बिग बींनी प्रश्न विचारताच मला उत्तर माहितीये ऑप्शन सांगू नका, असं तो म्हणत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर काही प्रश्नांची उत्तर ऑप्शन देण्याआधीच लॉक करा असं तो अमिताभ बच्चन यांना सांगत आहे. पण, पाचवीत शिकणाऱ्या इशितचा हा अतिआत्मविश्वास त्याला नडला.
आगाऊपणा करणाऱ्या इतिशची बिग बींनीही चांगलीच फिरकी घेतली. "वाल्मिकी रामायणाच्या प्रथम काण्डचं नाव काय आहे?" असा प्रश्न इशितला २५ हजार रुपयांसाठी विचारण्यात आला होता. याचं उत्तर त्याला माहीत नव्हतं. त्यामुळे तो ऑप्शनची वाट बघत होता. पण, बिग बींनीही त्याला काही वेळ ऑप्शन न देत त्याची फिरकी घेतली. बिग बी म्हणाले, "फक्त तुच हुशार नाहीस, तर हेदेखील हुशार आहेत". त्यानंतरही त्याने उद्धटपणे "अरे ऑप्शन द्या", असं अमिताभ बच्चन यांना म्हटलं. पण ऑप्शन दिल्यानंतर त्याने B) अयोध्या काण्ड हा पर्याय निवडला. हा पर्याय लॉक करण्यासाठीही तो बिग बींना जोरजोरात ओरडून सांगत होता. पण, त्याचं हे उत्तर चुकलं आणि अवघ्या पाचव्या प्रश्नावरच इशितची विकेट उडाली.
T 5530 - कुछ कहने को है नहीं, बस स्तब्ध !!!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 12, 2025
केबीसीमधील इशितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांनीही ट्रोल केलं आहे. तर अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत "बोलायला काहीच नाही, स्तब्ध आहे" असं म्हटलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत "त्या मुलाला दोन कानाखाली द्यायच्या होत्या", असं म्हटलं आहे.