​द कपिल शर्मा शो आला पुन्हा अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 11:51 IST2017-04-25T06:21:58+5:302017-04-25T11:51:58+5:30

द कपिल शर्मा शो हा गेल्या काही दिवसांपर्यंत छोट्या पडद्यावरचा सगळ्यात प्रसिद्ध कार्यक्रम होता. पण गेल्या काही दिवसांपासून या ...

The Kapil Sharma show again again | ​द कपिल शर्मा शो आला पुन्हा अडचणीत

​द कपिल शर्मा शो आला पुन्हा अडचणीत

कपिल शर्मा शो हा गेल्या काही दिवसांपर्यंत छोट्या पडद्यावरचा सगळ्यात प्रसिद्ध कार्यक्रम होता. पण गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाचे वाईट दिवस सुरू झाले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. गेल्या महिन्यात या कार्यक्रमातील सुनील ग्रोव्हर, अली असगर आणि चंदन प्रभाकर यांना कपिल शर्माने विमानात शिवीगाळ केल्याने या तिघांनी या मालिकेला रामराम ठोकला. अली, सुनील आणि चंदन गेल्या काही दिवसांपासून चित्रीकरण करत नसल्याने या मालिकेचा टीआरपी दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. टिआरपी कसा वाढवावा याची चिंता आता या मालिकेच्या टिमला लागली आहे. पण त्याचसोबत आता कपिल शर्माच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे कळतेय.
दिल्लीतील प्रसिद्ध कॉमेडियन अभिजीत गांगुलीचा एक विनोद त्याच्या परवागीशिवाय द कपिल शर्मा शोमध्ये वापरला गेला असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याने याबाबत फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर एक पोस्ट लिहिली असून या पोस्टमध्ये याबाबतचा पुरावादेखील सादर केला आहे. या पोस्टमध्ये गांगुलीने लिहिले आहे की, मी युट्युब आणि फेसबुक या साइटवर मोठा भाऊ असणे या नावाची एक स्टँडअप कॉमेडी पोस्ट सादर केली होती. त्यातील एक विनोद द कपिल शर्मा शोमध्ये चोरला गेला असल्याचे माझ्या लक्षात आले. कपिल देवपासून जहिर खान (तसेच हरभजन सिंग, श्रीनाथ, कुंबळे) यांपर्यंत सगळे यशस्वी बॉलर हे एकमेकांचे लहान भाऊ आहेत यावर मी विनोद केला होता. काल माझ्या एका फेसबुकवरील मित्राने मला साडे दहाच्या सुमारास मेसेज करून सांगितले की, माझा लहान भावावरचा विनोद कपिल शर्मा शोमध्ये वापरला गेला आहे. मी हा कार्यक्रम ऑनलाइन पाहिल्यानंतर माझ्यादेखील हेच लक्षात आले. त्यांनी अशाप्रकारचे कृत्य केले आहे हे पाहून मला खूपच वाईट वाटले होते. किकू शारदाने माझा विनोद वापरून त्याची पूर्ण वाटच लावली होती आणि त्यावर सिद्धू आणि सगळे नेहमीसारखेच खळखळून हसले होते. आम्ही विनोदी कलाकार स्वतः लिहिलेल्या विनोदामधूनच लोकांच्या प्रशंसा मिळवत असतो. आमचा विनोद चोरण्याचा आणि तो राष्ट्रीय टिव्हीवर दाखवण्याचा त्यांना कोणीही अधिकार दिलेला नाहीये. 
सोनी वाहिनीवर काही कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले आहे का असे विचारले असता अभिजीत सांगतो, इतक्या मोठ्या वाहिनीच्या आणि प्रोडक्शन हाऊसच्या विरोधात लढण्यासाठी ना माझ्याकडे पैसे आहेत ना वेळ. त्यामुळे मी या सगळ्यापासून दूरच राहाण्याचा विचार केला आहे. पण त्या कार्यक्रमाने माझ्या विनोदासाठी मला श्रेय तरी द्यायचे होते असे मला वाटते. मी याबाबात कपिल शर्मा अथवा किकू शारदा यांना दोषी ठरवत नाही. पण ते या कार्यक्रमाचा चेहरा असल्याने अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

Web Title: The Kapil Sharma show again again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.