"तेव्हा पक्क केलं की..." देवदत्त नागेनं सांगितलं जेजुरीमध्ये घर घेण्याचं कारण, म्हणाला "गेली १२ वर्षे न चुकता."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:14 IST2025-08-26T13:07:03+5:302025-08-26T13:14:17+5:30
देवदत्त नागेचं खूप फॅन फॉलोइंग आहे. आजही चाहते त्याला खंडोबा म्हणून ओळखतात.

"तेव्हा पक्क केलं की..." देवदत्त नागेनं सांगितलं जेजुरीमध्ये घर घेण्याचं कारण, म्हणाला "गेली १२ वर्षे न चुकता."
Devdutt Nage Buys House In Jejuri: 'जय मल्हार' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे देवदत्त नागे (Devdatta Nage). देवदत्त नागेचं खूप फॅन फॉलोइंग आहे. आजही चाहते त्याला खंडोबा म्हणून ओळखतात. देवदत्तने काही दिवसांपूर्वी खंडेरायाच्या कृपेने जेजुरी याठिकाणी नवीन घर घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आता देवदत्त नागेनं जेजुरीमध्ये घर घेण्यामागे खरं कारण काय याबाबतही माहिती दिली आहे. तसेच मालिकेच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.
देवदत्तने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "येळकोट येळकोट.. जय मल्हार… बा श्री खंडेराया… तुझे आशिर्वाद माझ्या वर.. तुझ्या सगळ्या भक्तांवर सदैव राहु दे... सर्वांना सुखी ठेव रे बाबा". देवदत्तने या पोस्टमध्ये जेजुरीमधील काही फोटो पोस्ट केलेत. यात तो म्हणतो, "जय मल्हारचा पहिला भाग १८ मे २०१४ रोजी प्रक्षेपित झाला आणि माझा श्री खंडेरायांप्रती एक अलौकिक प्रवास सुरु झाला. मनात येईल तेव्हा श्री खंडेरायांच्या... म्हाळसा आई... बानू आईच्या दर्शनाला जायचे आणि आशिर्वाद घ्यायचे, हा नियम असयचा. रात्री ११ ला पॅकअप व्हायचं आणि तिथेच सेटवर स्नान करून लगेच गाडीला स्टार्टर मारून डायरेक्ट माझी जेजुरी गाठायचो. मध्य रात्री साधारण ३ वाजता पोहोचायचो. मग ५ ते ५:३० पर्यंत रोडवरच गाडीमध्ये बसून रहायचो. त्यानंतर श्री खंडोबाचे दर्शन आणि मग परतीचा प्रवास".
पुढे तो म्हणतो, "श्री खंडोबाची प्रेमळ ओढ त्या दिवसांपासून अगदी आजपर्यंत तशीच आहे. गेली ३-४ वर्ष वाटायला लागलं होतं की तिथेच आपलं एक छोटासं घर असावे, पण माझ्यासाठी हा खूप मोठा निर्णय होता. एक दिवस बारामतीहून जेजुरीकडे जात असताना त्या पुलावरून सहज लक्ष गेलं, तिथे काही जागा होती. त्या जागेवर जाऊन बघितलं तर तिथून श्री खंडेरायांच्या जेजुरी गडाचे मनमोहक दर्शन घडले. त्या दिवशी मित्र परिवारातील एका मित्राच्या दुकानाचे ओपनिंग आटोपले आणि माझा मित्र युवराजने सुचवलेल्या एका lodging मध्ये रात्री मुक्काम केला. पहाटे जेव्हा जाग आली, तेव्हा सहज त्या खिडकीमधून लक्ष गेलं तर समोर साक्षात जेजुरी गड आणि श्री खंडेरायांचे अलौकिक दर्शन. तेव्हाच जेजुरीमध्ये मनात येईल तेव्हा आणि जमेल तेव्हा वास्तव्य कराचे पक्क केलं".
देवदत्त म्हणाला, "माझी बहीण सौ अमृता ताई आणि भाऊजी श्री संदिपजी घोणे यांच्या शुभहस्ते आमच्या जागेचं भुमीपूजन केलं. गेली १२ वर्ष मी न चुकता जेजुरीला श्री खंडेरायांच्या दर्शनाला येतोय. श्री खंडेरायांच्या चरणी माझी सेवा ते रुजू करून घेत आहेत, त्याचेच हे फलित आहे असं मला वाटतंय. माझ्या जेजुरीच्या कुटुंबाचे... आप्तेष्टांचे... मित्रपरिवाराचे माझ्यावर असणारे प्रेम आणि श्री खंडेरायांची कृपा खरंच अलौकिक आहे", असं अभिनेत्यानं म्हटलं. तसेच देवदत्तने या पोस्टमध्ये त्याने ज्या प्रोजेक्टमध्ये घर घेतलं, त्या प्रोजेक्टसाठी ब्रँड ॲम्बेसिडर असल्याचेही सांगितले.