वेगवेगळ्या धाटणीचे विषय मांडणे आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 12:06 IST2016-06-04T06:36:45+5:302016-06-04T12:06:45+5:30
कलर्स मराठी या वाहिनीने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले. वर्षभरात या वाहिनीने अनेक चांगल्या मालिका, कार्यक्रम प्रेक्षकांच्या समोर सादर ...
वेगवेगळ्या धाटणीचे विषय मांडणे आवश्यक
* कलर्स मराठीच्या एका वर्षांच्या वाटचालीबद्दल तुम्ही काय सांगाल?
- प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा ध्यास घेऊन कलर्स मराठीने आपली वाटचाल सुरू केली. सुरुवातीपासूनच उत्तमोत्तम आणि दर्जेदार कार्यक्रम प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आम्ही झटत आहोत. प्रेक्षकांना नेहमीच आम्ही चांगले मनोरंजन देण्याचा प्रयत्न केला. आमच्या मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम प्रेक्षकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत चालल्या आहे. आम्ही करत असलेल्या कामाची दाखल मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकरांनी घेतली असल्याने आमच्या उत्साहात भर पडत आहे. आज मराठी मनोरंजन क्षेत्रात मोठ्या दर्जेदार कार्यक्रमांच्या आयोजनासाठी कलर्स मराठी वाहिनी हे सर्वोत्तम व्यासपीठ मानले जाते आहे याचा आम्हाला आनंद आहे.
* वर्षपूर्तीच्या निमित्ताने तुम्ही काही खास कार्यक्रम आयोजित केले आहेत का?
- यशाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेक्षकांचे निस्सीम प्रेम आम्हाला लाभले. आम्ही करत असलेल्या चांगल्या कामाची पावती त्यांनी आम्हाला वेळोवेळी दिली. महाराष्ट्राच्या मायबाप प्रेक्षकांनी आम्हाला दिलेल्या प्रेमासाठी आम्ही कृतार्थ आहोत आणि म्हणूनच आमचे हे यश आम्ही महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसोबत साजरे करायचे ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील शहरांमध्ये निरनिराळे कार्यक्रम आयोजित करून आमच्या प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत. ‘कलर्स मराठी’ म्हणजे रंग मराठी, गंध मराठी हे समीकरण अशा कार्यक्रमांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहचवले. याशिवाय वर्षभरात आमच्या कलाकारांना घेऊन आपल्या मराठी सणवार आणि कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर तयार केलेले प्रोमो आमच्या वाहिनीवर चालवले. या प्रोमोमधून आम्ही प्रेक्षक आणि आमच्या कलाकारांच्या नात्यावर भर दिला.
* वाहिन्यांच्या शर्यतीत टिकून राहाणे कितपत अवघड असते असे तुम्हाला वाटते?
- एक मराठी मनोरंजन वाहिनी म्हणून हिंदी वाहिन्यांकडूनदेखील मोठी स्पर्धा असते. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उत्तमोत्तम आणि दर्जेदार कार्यक्रम देणे हा एकच पर्याय आहे. मुळात पहिल्या क्रमांकाची वाहिनी होणे या शर्यतीपेक्षा प्रेक्षकांची पसंती मिळवण्याला आम्ही जास्त प्राधान्य देतो. प्रामाणिकपणे प्रेक्षकांचे मनोरंजन केले की बाकी गोष्टी आपोआप होतात.
* तरुण पिढी ही मालिका बघत नाही असे म्हटले जाते. तरुणांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही तुमच्या वाहिनीवर काही खास प्रयोग केले आहेत का?
- मराठी तरुण हा मराठी भाषेपासून दुरावतो आहे असे म्हणणे पुरेसे नाही. या तरुण वर्गाला पुन्हा मराठी भाषेकडे वळवणे महत्त्वाचे आहे. यासाठी आम्हीदेखील आमच्याकडून काही प्रयत्न केले. कथाबाह्य कार्यक्रमांचा दर्जा वाढवला. वैशाली सामंत, अवधूत गुप्ते यांसारख्या मराठी गायक-संगीतकारांचे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केले आणि त्यात प्रेक्षकांना सहभागी केले. मानाचा मुजरा आणि गर्जा महाराष्ट्र यांसारख्या उपक्रमांमधून मराठी संस्कृती भव्य-दिव्य रूपात प्रेक्षकांसमोर मांडली आणि तरुण वर्गाची त्याला पसंती मिळाली. पूर्वी कलाकार पुरस्कार सोहळ्यांना आणि इतर कार्यक्रमांना साधे कपडे घालून जात. कलाकार म्हणून आपले वेगळेपण आपल्या पेहाराव्यातून दिसले पाहिजे असे आम्ही सुचवले. हा बदल तरुणाईला आकर्षित करणारा ठरला. ‘तू माझा सांगाती’ ही मालिका ग्रामीण पार्श्वभूमीवर असली तरी त्याचा लूक तरुणांना आकर्षित करणारा आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’ मधले स्पेशल इफेक्ट्स हे तरुण पिढीसाठी नाविण्यपूर्ण ठरले. ते त्यांना प्रचंड आवडल्याचे तरुण प्रेक्षक आम्हाला आवर्जून सांगतात.
* एखाद्या चांगल्या वाहिनीमध्ये काय काय असले पाहिजे असे तुम्हाला वाटते.
- मनोरंजन वाहिनी म्हणजे एक परिपूर्ण थाळी सारखी असली पाहिजे तेव्हाच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. थाळीमध्ये जशा तिखट, गोड, आंबट अशा वेगवेगळ्या चवी असतात. त्याचप्रकारे मनोरंजन वाहिनीनेदेखील वेगवेगळ्या धाटणीचे विषय मांडणे आवश्यक आहे.