​“गर्ल्स हॉस्टेल” ... लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 11:35 IST2017-07-08T06:05:23+5:302017-07-08T11:35:23+5:30

कॉलेज जीवनात हॉस्टेलमध्ये राहाण्याचा एक वेगळाच अनुभव असतो. तिकडची धमाल-मस्ती ही काही वेगळीच असते. हॉस्टेलमधील अनेक किस्से आयुष्यभर तुमच्या ...

"Girls Hostel" ... a visit to the audience soon | ​“गर्ल्स हॉस्टेल” ... लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

​“गर्ल्स हॉस्टेल” ... लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

लेज जीवनात हॉस्टेलमध्ये राहाण्याचा एक वेगळाच अनुभव असतो. तिकडची धमाल-मस्ती ही काही वेगळीच असते. हॉस्टेलमधील अनेक किस्से आयुष्यभर तुमच्या लक्षात राहात असतात. प्रत्येक हॉस्टेलची एक भयकथा तर असतेच. रात्रीच्या मित्रमैत्रिणींच्या गप्पांच्या ओघात हे किस्से आणखी रंगवून सांगितले जातात. अशाच अनाकलनीय भयाची चाहूल सोबत घेऊन  “गर्ल्स हॉस्टेल ...  कोणीतरी आहे तिथे" ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. “गर्ल्स हॉस्टेल " ही मालिका  महाराष्ट्रातील  वेगवेगळ्या छोट्या शहरांतून, मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी  आलेल्या नऊ मुलींची आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका भयावह घटनेची गोष्ट आहे. एक अशी घटना ज्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते.
दिवसरात्र  जागणारे आणि गर्दीने ओसंडून वाहणारे मुंबई शहर महिलांसाठी अजूनही म्हणावे तसे सुरक्षित नाही. अशा परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी सारा, प्रियांका, तन्वी, मालती, वल्लरी, ध्यानलक्ष्मी, सागरिका, नेहा  आणि वनिता या पुणे, नाशिक, पंढरपूर, मराठवाडा अशा आणि इतर वेगवेगळ्या शहरांतून मुंबईत येतात. या मुली सावित्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये एकमेकींच्या रूममेट्स असतात. धमाल मस्ती करत आपले जीवन ते जगत असतात. रोजच्या आयुष्यातील संघर्ष करत असताना त्यांना हॉस्टेलच्या भिंतीच्या आत नेहमीच प्रचंड सुरक्षित वाटत असतं. सावित्री गर्ल्स हॉस्टेलमधील या मुलींना सगळ्यात मोठा आधार हा एकमेकींचा असतो. याच त्यांच्या सावित्री गर्ल्स हॉस्टेलच्या सुरक्षित जगात अतिशय भयानक घटना घडते. या घटनेमुळे या मुलींच्या आयुष्यातील धमाल मस्ती संपून त्याची जागा थरकाप उडवणारे भय घेते. गूढ घटनांची साखळी वाढू लागते आणि त्यानंतर सुरू होते एक अनाकलनीय प्रसंगांचे भयंकर चक्र! या सर्व मुली एक एक करून या चक्रात गुरफूटल्या जातात. हॉस्टेलमध्ये कोणीतरी आहे ही भावना बळावू लागून एक भीतीचे सावट पसरू लागते.
“गर्ल्स हॉस्टेल ...  कोणीतरी आहे तिथे" या मालिकेत सर्वच नवोदित कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या कलाकारांचे छोट्या पडद्यावरचे पदार्पण असले तरी यातील अनेकांनी रंगभूमीवर काम केले आहे. या मालिकेची कथा लेखक शेखर ढवळीकर आणि पटकथा अभिनेता लेखक चिन्मय मांडलेकरची आहे तर संवाद कुमुद इतराज यांचे आहेत. या मालिकेचं दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केलं आहे.

Web Title: "Girls Hostel" ... a visit to the audience soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.