Ganesh Festival 2018 : कलाकारांनी गणेशोत्सवाच्या शेअर केल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 07:15 IST2018-09-12T14:02:04+5:302018-09-13T07:15:00+5:30

कलर्स वाहिनीवरील कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी, अनुभव वाचकांसोबत शेअर केल्या असून धुमधडाक्यात गणरायाचे स्वागत केले. तसेच पुढच्या वाटचालीसाठी आर्शिवाद देखील घेतले.

Ganesh Festival 2018: Colors marathi artist talked about there childhood memories about Ganesh Festival | Ganesh Festival 2018 : कलाकारांनी गणेशोत्सवाच्या शेअर केल्या आठवणी

Ganesh Festival 2018 : कलाकारांनी गणेशोत्सवाच्या शेअर केल्या आठवणी

भाद्रपदाची चाहूल लागताच महाराष्ट्रात नाही तर सगळीकडेच अमाप उत्साहात येणारा, घरोघरी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी. चहूकडे गणरायाच्या मूर्ती, कंठी, सजावटीची साधने, मखर, ढोल – ताशा घेऊन गणरायाच्या स्वागतासाठी तयारी करणारी पथकं... सर्वत्र उत्साहाचे, मंगलमय वातावरण असते... गणपती बाप्पा येणार या कल्पनेनेच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह असतो. गणपती म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्याच्या येण्याने सगळ्यांची विघ्न, दु:ख, समस्या दूर होतात. या विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी सगळेच कित्येक दिवस आधीपासूनच तयारी सुरू करतात. यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी कलर्स मराठीच्या संपूर्ण परिवाराने जय्यत तयारी केली आहे. वाहिनीवरील कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी, अनुभव वाचकांसोबत शेअर केल्या असून धुमधडाक्यात गणरायाचे स्वागत केले तसेच पुढच्या वाटचालीसाठी आर्शिवाद देखील घेतले. ‘घाडगे & सून’ मालिकेमधील अमृता (भाग्यश्री लिमये) ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतील राधा आणि प्रेम (वीणा जगताप आणि सचित पाटील), ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेतील लक्ष्मी (समृद्धी केळकर), मल्हार (ओमप्रकाश शिंदे) आणि आर्वी (सुरभी हांडे) तसेच नवरा असावा तर असा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक सगळ्यांच्या लाडक्या हर्षदा खानविलकर. 

कलर्स मराठी परिवारातील घाडगे & सून मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अमृता म्हणजेच भाग्यश्री लिमयेने गणपती बाप्पाच्या काही आठवणी तसेच अनुभव सांगितले. गणेशोत्सव म्हणजे माझ्यासाठी उत्साहाला उधाण आणणारा समाजभिमुख करणारा सण. आमच्या कॉलनीत आम्ही गणपती बसवायचो. रात्री गणपतीच्या आरतीला झांजा वाजवायला मला खूप आवडायचं. रात्री आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटायचा हे काम आम्हा छोट्या मंडळीकडे होतं. हे काम केल्याबद्दल आम्हाला दुप्पट प्रसाद मिळायचा जो खूप चविष्ट लागायचा.. इतका की बस्स त्या प्रसादाचे खूप अप्रूप वाटायचं. आमच्या घरी पाच दिवस गणपती असतात ... पण, पाचव्या दिवशी गणपतीचे विसर्जन करताना खूप उदास वाटायचे.

कलर्स मराठीवर नुकतीच सुरू झालेली ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेमधील मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदेने देखील काही आठवणी आणि अनुभव सांगितले. तो सांगतो, मी लहान असताना आमच्या गावी सार्वजनिक मंडळाचा गणपती असायचा. तेव्हा आरतीला दिला जाणारा प्रसाद रोज वेगवेगळ्या घरातून जायचा. आमच्या घरातून जेव्हा प्रसाद द्यायचा असायचा, तेव्हा मी त्यातील बराचसा प्रसाद मंडळात पोहचवण्यापूर्वीच फस्त करायचो. अर्थात घरी कळू न देता. मला एक सांगावंसं वाटतं की, गणेशोत्सवाचा मूळ हेतू विसरू नये. ध्वनी, प्लास्टिक आणि इतर होणारे प्रदूषण टाळावे. मंडळामध्ये स्पर्धा असावी पण द्वेष नसावा.

लक्ष्मी सदैव मंगलम मालिकेमधील लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकरने सांगितले, मला आवडणाऱ्या उत्सवांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव असून या काळात सगळीकडे आनंदाचं आणि चैतन्यपूर्ण वातावरण असते. आमच्या घरी बाप्पा येत नाही, पण मी माझ्या आत्याकडे आणि मावशीकडे जाऊन बाप्पाच्या आगमानाची जय्य्त तयारी करते. मी नेहेमी बाप्पा आला की, त्याच्यासमोर आम्हाला कथ्थक मध्ये शिकवलेले कवीत्त सादर करते. एका अर्थाने हा नमस्कारच असतो. मी एक गोष्ट आवर्जून सांगेन, आपण सगळ्यांनी छोटी शाडूची मूर्ती आणावी. तिचे जवळच्या एका विहिरीमध्ये किंवा कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावे. प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करूया असे मी सर्वांना नक्कीच सांगेन. 

बाप्पाच्या आठवणीबद्दल बोलताना राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमधील प्रेम देशमुख म्हणजेच सचित पाटील सांगतो, माझ्या लहानपणापासूनच्या बाप्पाच्या असंख्य आठवणी आहेत. माझ्या आजीकडे गणपती बाप्पा येतो... आम्ही सगळी भावंडं मिळून बाप्पाच्या आगमनाची वाट अगदी आतुरतेने बघत असायचो... टाळ मृदुंगाच्या साथीने “गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करत बाप्पाला घरी घेऊन यायचो. यानिमित्ताने सगळ कुटुंब एकत्र यायचं जसं अजूनही येतं. जसे लहान असताना आम्हाला उकडीचे मोदक आवडायचे अगदी तसेच आजही आम्हाला आजही आवडतात. दादर मध्ये गणपतीच्या दिवसांमध्ये खूप चैतन्यमय वातावरण असते. त्यादिवसांचीच एक आठवण सांगायची म्हणजे दादर मध्ये जेवढे सार्वजनिक गणपती आहेत तिथे आमच्या लहानपणी सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. आणि आमची आजी आम्हाला तिथे घेऊन जायची मला असं वाटतं, या क्षेत्रात येण्याची बीजं कुठेतरी तिकडे रोवली गेली. एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे पर्यावरणाचा विचार आपण सगळ्यांनी करणे खूप महत्त्वाचे आहे. ECO Friendly अशी गणेशाची मूर्ती घरोघरी आणली जाते जी अत्यंत चांगली गोष्ट आहे. या सगळ्या आनंद सोहळ्यामध्ये आपण पर्यावरणाचा तोल जाऊ देता कामा नये.

कलर्स मराठीवरील “नवरा असावा तर असा” या कार्यक्रमाच्या होस्ट हर्षदा खानविलकरने त्यांच्या आणि बाप्पामधल्या अनोख्या नात्याचे काही किस्से आणि आठवणी सांगितल्या. माझं आणि बाप्पाचं खूप खास नातं आहे असं मी समजते. मला असं वाटत की, त्याचं देखील माझ्यावर प्रेम आहे. मला छोट्या छोट्या अशा खूप प्रचिती येत असतात. मुळात माझ्या वडिलांची गणपतीवर खूप श्रद्धा होती. माझ्या घरात बरेच छोटे मोठे गणपती आहेत, जे मला भेट म्हणून मिळाले आहेत. माझी आणि गणपतीची मैत्री आहे, मी त्याला माझा खूप मोठा आधार मानते.

 

Web Title: Ganesh Festival 2018: Colors marathi artist talked about there childhood memories about Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.