Exclusive : शरद आणि प्रसाद अहिल्याबाईमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 17:02 IST2016-08-09T11:32:58+5:302016-08-09T17:02:58+5:30
- प्राजक्ता चिटणीस आवाज या सिरिजमध्ये प्रेक्षकांना अहिल्याबाई होळकर यांची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेची निर्मिती कोठारे प्रोडक्शनची असून ...

Exclusive : शरद आणि प्रसाद अहिल्याबाईमध्ये
आवाज या सिरिजमध्ये प्रेक्षकांना अहिल्याबाई होळकर यांची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेची निर्मिती कोठारे प्रोडक्शनची असून महेश कोठारे या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत तर उर्मिला कानेटकर कोठारे या मालिकेत अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत उर्मिलासोबतच शरद पोंक्षे, प्रसाद जावडे हे कलाकारही झळकणार आहेत. शरद या मालिकेत अहिल्याबाईंच्या सासऱ्याची म्हणजेच मल्हार राव होळकरांची भूमिका साकारणार आहेत तर प्रसाद जावडे अहिल्याबाईंच्या पतीच्या म्हणजेच खंडेराव होळकरच्या भूमिकेत झळकणार आहे. या भूमिकेविषयी शरद सांगतात, "थोर व्यक्तींचे व्यक्तीचित्रण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खूपच चांगला प्रयत्न आवाज या सिरिजद्वारे केला जात आहे. सध्या वाचनसंस्कृती ही लोप पावत आहे. त्यामुळे या थोर लोकांची माहिती आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे खूप चांगले काम या माध्यमाद्वारे केले जात आहे. मला या मालिकेबद्दल विचारल्यावर पैशांचा, तारखांचा काहीही विचार न करता मी या मालिकेसाठी लगेचच होकार दिला. मल्हारराव होळकर ही इतिहासातील अतिशय महत्त्वाची व्यक्तिरेखा मानली जाते. त्यांनी पेशव्यांच्या चार पिढ्यांसोबत काम केले होते. बाजीराव पेशवे तर त्यांच्या कर्तृत्वावर प्रचंड खूश होते. केवळ नऊ वर्षांची असताना अहिल्या त्यांच्या घरात सून म्हणून आली होती. त्यांनी तिच्यावर खूपच चांगले संस्कार केले. तेच तिचे राजकीय, सामाजिक गुरू होते. त्यामुळे या मालिकेतील माझी भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. या मालिकेचे दिग्दर्शन महेश कोठारेंसारखे मराठी चित्रपटात आपला नावलौकिक मिळवलेले दिग्दर्शक करत असल्याने या मालिकेचा दर्जा अधिक उंचावला आहे. या मालिकेतील माझा लूक तर वेगळा आहे. पण त्याचसोबत या मालिकेत मी तलवारबाजी आणि घोडस्वारी करतानाही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे."