'आई तुळजाभवानी' मालिकेत उत्कंठावर्धक वळण, पाताळलोकात सापडले पृथ्वीवरचे संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 16:15 IST2024-10-31T16:14:49+5:302024-10-31T16:15:33+5:30
Aai Tuljabhavani Serial : 'आई तुळजाभवानी' ही पौराणिक मालिका नुकतीच सुरू झाली असून अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.

'आई तुळजाभवानी' मालिकेत उत्कंठावर्धक वळण, पाताळलोकात सापडले पृथ्वीवरचे संकट
कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' (Aai Tuljabhavani Serial) ही पौराणिक मालिका नुकतीच सुरू झाली असून अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. 'आई तुळजाभवानी'च्या रुपात अभिनेत्री पूजा काळे प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिच्या सोज्वळ आणि सात्विक रुपाने महाराष्ट्राचं मन जिंकले आहे आणि 'आई तुळजाभवानी'च्या रुपात तिला आपलंसं केलं. या मालिकेच्या माध्यमातून तुळजाभवानी मातेचे अद्भुत चमत्कार आणि संकटांमधून पृथ्वीवरील भक्तांचे रक्षण करण्याचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत.
मालिकेतील कथानकाने वेग पकडला असून आता पुढील काही भागांमध्ये 'आई तुळजाभवानी'ला एका नव्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. दैत्यमाता दीतीची त्रिखंडावर राज्य करण्याची असूरी इच्छा तुळजासमोर येणार का? आली तर तुळजा त्यातून पृथ्वीचे संरक्षण कसे करणार आणि यातून तिला कशी महादेवाची साथ लाभेल? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.
देवी कशाप्रकारे करणार भक्तांचे रक्षण?
भगवान शंकर आणि पार्वती पाताळलोकात गेले असताना पार्वती मातेला दीतीमातेचा पट्टीग्रंथ मिळतो, त्यात असलेल्या पट्ट्यांवर काय असते, त्यातून देवीला कोणते संकेत मिळतात, याची अत्यंत रंजक गोष्ट या भागात उलगडणार आहे. तुळजाभवानी देवी कशाप्रकारे भक्तांचे रक्षण करणार? हे पाहणे प्रेक्षकांसाठी अत्यंत रंजक ठरणार आहे.