"तू शरीराने इथे नसलास तरी...", अपूर्वा नेमळेकर भावाच्या वाढदिवसानिमित्त आठवणीत झाली भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:04 IST2025-10-07T12:03:37+5:302025-10-07T12:04:03+5:30
Apurva Nemlekar : अपूर्वा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. नुकतेच तिने तिच्या दिवंगत भावाच्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने भावाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

"तू शरीराने इथे नसलास तरी...", अपूर्वा नेमळेकर भावाच्या वाढदिवसानिमित्त आठवणीत झाली भावुक
अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेनंतर आता ती लवकरच 'शुभविवाह' (Shubhvivah Serial) मालिकेत दिसणार आहे. यात ती एसीपी अपूर्वा पुरोहित हे पात्र साकारणार आहे आणि पहिल्यांदाच ती पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अपूर्वा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. नुकतेच तिने तिच्या दिवंगत भावाच्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने भावाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी भावाने जगाचा निरोप घेतला असला तरी, त्याच्या आठवणी आजही तिच्या मनात ताज्या आहेत.
अपूर्वाने भावासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, "हॅप्पी बर्थडे, ओमी. तू या जगातून जाऊन दोन वर्ष झाली आहेत, पण एकही दिवस असा गेला नाही, जेव्हा मला तुझी आठवण आली नसेल. १९९४ पासून आम्ही कधीच तुझा वाढदिवस एकत्र साजरा करायला विसरलो नाही आणि आजही, जरी तू शरीराने इथे नसलास तरी, मी माझ्या हृदयात तुझा वाढदिवस साजरा करते. तुझ्या प्रत्येक आठवणीत मला तुझं हसू दिसतं, मनात तुझा आवाज ऐकू येतो, आणि प्रत्येक शांत क्षणी तुझं प्रेम जाणवतं. तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही, पण तुझी ऊर्जा आणि उब आजही माझ्या आजूबाजूला आहे, जे शब्दांत सांगता येणार नाही."
तिने पुढे म्हटले की,"तू जिथे असशील तिथे शांत आणि सुखी असशील आणि त्याच खोडकर स्मितहास्याने हसत असशील, ज्याने नेहमी आमचं आयुष्य उजळलं. तू कायम माझा छोटा भाऊ, माझा अभिमान, आणि माझ्या आत्म्याचा तो भाग राहशील, जो वेळ कधीच हिरावून घेऊ शकत नाही. मला तुझी खूप आठवण येते... आणि मी तुझ्यावर अथांग प्रेम करते. अप्पू"