लॉकडाऊनमध्ये घराच्या छतावर केले बिग बॉसच्या विजेत्याने लग्न, वाचलेले पैसे देणार पीएम फंडात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 18:11 IST2020-04-28T18:09:34+5:302020-04-28T18:11:11+5:30
बिग बॉस या कार्यक्रमाच्या एका सिझनच्या विजेत्याने चक्क घराच्या टेरेसवर लग्न केले आहे.

लॉकडाऊनमध्ये घराच्या छतावर केले बिग बॉसच्या विजेत्याने लग्न, वाचलेले पैसे देणार पीएम फंडात
सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. लोकांना कोणत्याही समारंभाला एकत्र येण्याची देखील परवानगी नाहीये. त्यामुळे या काळात होत असलेली अनेक लग्नं पुढे ढकलण्यात आली आहेत. पण या सगळ्यात आता बिग बॉस या कार्यक्रमाच्या एका सिझनच्या विजेत्याने चक्क घराच्या टेरेसवर लग्न केले आहे.
बिग बॉस २ हा सिझन राहुल महाजन, राजा चौधरी, आशुतोष कौशिक यांच्यामुळे गाजला होता. या सिझनचा विजेता आशुतोषने अतिशय साधेपणाने नुकतेच लग्न केले. या लग्नाला आशुतोष आणि त्याच्या पत्नीच्या कुटुंबातील केवळ चार जण उपस्थित होते. आशुतोषने घराच्या टेरेसवर लग्न केले असून त्याच्या लग्नाचा खर्च त्याने वाचवला आहे आणि हा पैसा तो पंतप्रधान सहाय्यक निधीत मदत म्हणून देणार आहे. आशुतोष हा उत्तर प्रदेशमधील सहारनपूरचा राहाणारा असून त्याची पत्नी अर्पिता ही अलीगढमधील आहे. त्यांचे लग्न नोएडात आशुतोषच्या घराच्या टेरेसवर झाले. आशुतोषचे लग्न २६ एप्रिलला होणार असल्याचे आधीच ठरले होते. त्याने लग्न पुढे न ढकलता अतिशय साधेपणाने लग्न करण्याच निर्णय घेतला.
आशुतोषने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर लग्नाचे व्हिडिओ शेअर केले असून या व्हिडिओमध्ये आपल्याला लग्न लावत असलेल्या पंडिताने मास्क घातलेला दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर लग्नासाठी उपस्थित असलेले लोक एकमेकांमध्ये अंतर राखून उभे असल्याचे दिसत आहे.
आशुतोष बिग बॉसप्रमाणेच एमटीव्ही रोडीजचा देखील विजेता आहे. त्याला या दोन्ही कार्यक्रमांमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्याने जिला गाजियाबाद, शॉर्टकट रोमिओ अशा काही चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.