बिग बॉसच्या घरातील हे सिक्रेट्स पहिल्यांदाच जगासमोर, शो मध्येच सोडल्यास द्यावा लागेल २ कोटींचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 21:47 IST2018-10-08T21:45:53+5:302018-10-08T21:47:18+5:30
बिग बॉसचा शो अर्धवट सोडणं कुणालाही परवडण्यासारखं नाही. हा शो मध्येच सोडल्यास घरातील सदस्याला त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागू शकते.

बिग बॉसच्या घरातील हे सिक्रेट्स पहिल्यांदाच जगासमोर, शो मध्येच सोडल्यास द्यावा लागेल २ कोटींचा दंड
बिग बॉसच्या घरात राहणं सोपी गोष्ट नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस घरातील सदस्यांसाठी जणू अग्निपरीक्षाच असते. इथले टास्क आणि वादावादी याला कंटाळून घरातील सदस्य वारंवार घर सोडून जाण्याच्या वल्गना करतात. याआधीच्या प्रत्येक सीझनमध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धकानं अशी धमकी दिलीच आहे. मात्र कोणताही स्पर्धक घर सोडण्याची हिंमत करत नाही. कारण बिग बॉसचा शो अर्धवट सोडणं कुणालाही परवडण्यासारखं नाही. हा शो मध्येच सोडल्यास घरातील सदस्याला त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागू शकते. बिग बॉसमध्ये येण्याआधी स्पर्धक आणि वाहिनीमध्ये एक करार झालेला असतो. या करारानुसार शो मध्येच सोडल्यास २ कोटींचा दंड संबंधित स्पर्धकाला द्यावा लागू शकतो. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक असलेल्या नितीभाने ही बाब सांगितली आहे.
बिग बॉसच्या घरातील अनेक सिक्रेट्सही आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. घरातील सदस्यांना स्वतः साफसफाई करावी लागते. मात्र सगळे स्पर्धक झोपल्यानंतर घराचा दर्जा उत्तम दिसावा आणि स्वच्छता कायम राहावी यासाठी मध्यरात्रीनंतर घरात गुप्तपणे साफसफाई करण्यात येते. जेणेकरुन घरातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसावा. याशिवाय विकेंडचा वार या भागात घरातील सदस्यांसाठी सलमानच्या घरचं खास जेवण येतं. सलमानचा खासगी कुक हे जेवण बनवतो. यांत लज्जतदार मेन्यू असतो. या भागाच्या सुरुवातीलाच सलमान सगळ्यांना जेवण कसं होतं अशी विचारणा करतो. याबाबतही नितीभाने एक किस्सा शेअर केला आहे. एका विकेंडला हे जेवणं पोहचलं नसल्याने स्पर्धक नाराज होते. सलमाननं नेहमीप्रमाणे भागाच्या सुरुवातीला जेवण कसं होतं अशी विचारणा केली. मात्र स्पर्धकांकडून जेवण मिळालंच नाही हे कळताच सलमानला दुःख झालं. शोचं चित्रीकरण थांबवून सलमानने प्रॉडक्शन टीमला फैलावर घेतलं.
तसंच बिग बॉसच्या घरात झोपण्याच्या आणि सकाळी उठण्याची वेळही वेगवेगळी असते. रात्री उशिरापर्यंत शुटिंग सुरु राहिल्यास दुसऱ्या दिवशी स्पर्धकांना उशिरा उठवलं जातं. सूर्य कुठे आहे यावरुन घरातील सदस्य अंदाज लावतात की सकाळचे अकरा वाजले की दुपारचे १२. शिवाय बिग बॉसच्या लोणावळ्यातील घराशेजारी मस्जिद असून अजान ऐकूनही स्पर्धक बऱ्याचदा वेळेचा अंदाज बांधतात असं नितीभाने सांगितले.