'बाबा तुमच्याशिवाय हे शक्य झालं नसतं', अभिनेत्री ऋतुजा बागवेनं घेतलं स्वतःचं घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 14:25 IST2022-09-10T14:24:49+5:302022-09-10T14:25:35+5:30
Rutuja Bagwe: अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

'बाबा तुमच्याशिवाय हे शक्य झालं नसतं', अभिनेत्री ऋतुजा बागवेनं घेतलं स्वतःचं घर
नाटक आणि मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe). 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेच्या माध्यमातून ऋतुजा खऱ्या अर्थाने लाइमलाइटमध्ये आली होती. या मालिकेत अभिनेता सुबोध भावने तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. कलाविश्वामध्ये सक्रीय असलेली ऋतुजा सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. बऱ्याचदा तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत येत असते. दरम्यान, पुन्हा एकदा तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. यावेळी तिने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिने स्वतःचं नवीन घर घेतल्याचं या पोस्टमध्ये सांगितले आहे.
ऋतुजा बागवे हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, स्वतः चं घर. हॅप्पी बर्थडे टू मी. पहिली भेट. जेव्हा लोक विचारतायत की वय झालंय लग्न कधी करणार तेव्हा माझी आई म्हणाली वय झालं म्हणून नाही तुला जेव्हा करावास वाटेल तेव्हा लग्न कर पण त्या आधी स्वतंत्र हो स्वतःचं घर घे. आई तुझी मी खूप आभारी आहे. हे स्वप्न तू दाखवलेस. मला माहिती आहे की तू सर्वात बलवान आणि शहाणी व्यक्ती आहेस. बाबा तुमच्या शिवाय हे शक्य झालं नसतं. आईने स्वप्न दाखवले पण तुम्ही पाठीशी होतात म्हणून घेतली उडी. तू माझ्या ओळखीची सर्वात दयाळू व्यक्ती आहेस. बापमाणूस.
ती पुढे म्हणाली की, भौतिक गोष्टीत मी यश नाही मानत ना समाधान शोधत पण तुमचं स्वप्नं पूर्ण करु शकले याचा आनंद खूप आहे. जो मी शब्दांत नाही मांडू शकत. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमानाने पाणावलेले डोळे. मला कठोर परिश्रम करण्याची शक्ती आणि शक्ती दे. तुम्ही माझे पालक म्हणून भाग्यवान आहात.