कृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर 'इंद्रायणी'मध्ये घडणार भावनांना स्पर्श करणारा प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 18:17 IST2025-08-15T18:17:02+5:302025-08-15T18:17:50+5:30
Indrayani Serial : 'इंद्रायणी' मालिकेत मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे.

कृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर 'इंद्रायणी'मध्ये घडणार भावनांना स्पर्श करणारा प्रसंग
कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत (Indrayani Serial) मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे. कृष्ण जन्माष्टमी म्हणजे भक्ती, उत्साह आणि आनंदाचं प्रतीक. दरवर्षीप्रमाणे गावात साजरा होणारा हा सोहळा यंदा प्रेक्षकांसाठी अधिक खास ठरणार आहे. मंदिर सजावट, गावकऱ्यांचा उत्साह, पाळणा सजवण्याची लगबग, आणि श्रीकृष्णाच्या जन्माचे स्वागत करण्याची तयारी या सर्वात प्रत्येक पात्राचा आनंद द्विगुणित झालेला दिसून येणार आहे. यंदा कृष्ण जन्म मंदिरात साजरा होणार असून आनंदीबाई स्वतः पाळणा देणार आहेत. इंदू, शकुंतला आणि नारायणी कृष्ण जन्मासाठी गाणी गाणार आहेत.
अशातच आनंदाच्या वातावरणात अचानक मंदिरात भक्त दाम्पत्य येतं. बाहेर वादळ व पावसाचं वातावरण आहे. कृष्ण जन्म पाहण्यासाठी आलेली ती गर्भवती स्त्री अचानक वेदना जाणवू लागतात आणि तिचा प्रसूतीचा क्षण समीप येतो. इंद्रायणी आणि अधू तात्काळ तिच्या मदतीला धावून जातात. इंद्रायणी दिग्रसकर वाड्यात तिला घेऊन जाते आणि प्रसूतीत गुंतागुंत निर्माण होऊ नये म्हणून तिथेच बाळाला जन्म द्यावा असं सुचवते. अशा कठीण क्षणी इंद्रायणी, विठुरायाचा आशीर्वाद घेऊन त्या स्त्रीची प्रसूती घडवून कशी घडवून आणणार ? कोणत्या समस्या समोर येणार ? अधूची साथ तिला कशी मिळणार हे बघणे रंजक असणार आहे.
मंदिर समितीच्या अध्यक्ष आनंदीबाईंसाठी हा उत्सव प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी त्या कडक शिस्तीने आणि आपल्या पद्धतीने कामे पार पाडतात. मात्र, गावातील काही जणांसाठी हा दिवस वेगळ्याच कारणाने महत्त्वाचा ठरतो. इंद्रायणी, आपल्या संवेदनशील आणि कणखर स्वभावामुळे, या दिवशी काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार घेते. तिच्यासोबत अधूची साथ आहेच जिथे गरज आहे तिथे पुढे सरसावणारा, पण कधी कधी आपल्या आई आनंदीबाईंच्या नाराजीचा धनी होणारा. या तिघांच्या नात्यातील ताणतणाव आणि परिस्थितीनुसार घडणारे भावनिक प्रसंग, या पर्वाला अधिक रंगतदार बनवतील.