१२ वर्षानंतर आसावरी जोशीचे मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक, या मालिकेतून रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 16:23 IST2021-02-18T16:21:12+5:302021-02-18T16:23:42+5:30

मी मालिकेत प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहे आणि मालिकेच्या मुख्य नायिकेची मी आदर्श आहे ही गोष्ट मी त्यांना फोन करुन आवर्जून कळवली. त्यांना अतिशय आनंद झाला.

After 12 years, Asavari Joshi's comeback on Marathi television | १२ वर्षानंतर आसावरी जोशीचे मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक, या मालिकेतून रसिकांच्या भेटीला

१२ वर्षानंतर आसावरी जोशीचे मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक, या मालिकेतून रसिकांच्या भेटीला

‘स्वाभिमान’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेतून अभिनेत्री आसावरी जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अदिती सूर्यवंशी असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून त्या प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना आसावरी जोशी म्हणाल्या, ‘खूप वर्षांनंतर मी मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे. हिंदीमध्ये काम करत असल्यामुळे मराठी इण्डस्ट्रीचा संपर्क काहीसा तुटला होता. मात्र 'स्वाभिमान' मालिकेच्या निमित्ताने मनासारखं प्रोजेक्ट मिळाल्यामुळे मी ही भूमिका स्वीकारली.

 

अदिती सूर्यवंशी असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. अदिती सूर्यवंशी दापोलीच्या एका कॉलेजमधील प्रोफेसर आहे. जी अत्यंत बुद्धिमान आणि विचारी आहे. ती काळाच्या पुढचा विचार करणारी आहे. स्वाभिमान मालिकेच्या कथेतील नायिका म्हणजेच पल्लवीची ती आदर्श आहे. पल्लवीसाठी अदिती मॅडम हेच तिचं विश्व आहे. पल्लवीमध्ये असणारी चमक अदितीला उमगते आणि ती खूप पुढे जावी अशी अदितीची इच्छा असते.

ही व्यक्तिरेखा साकारताना मला माझ्या कॉलेजमधल्या प्रोफेसर गोरे मॅडम यांची खूप आठवण होत असल्याचंही आसावरी जोशी यांनी सांगितलं. ‘माझं शिक्षण रुपारेल कॉलेजमध्ये झालं. मी कलाशाखेत असल्यामुळे लॉजिक विषय शिकवण्यासाठी गोरे मॅडम होत्या. गोरे मॅडमचं मला खूप मार्गदर्शन मिळालं. मी अजूनही त्यांच्या संपर्कात आहे. कॉलेजमध्ये असताना त्या माझ्या आदर्श होत्या आणि आता मी मालिकेत प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहे आणि मालिकेच्या मुख्य नायिकेची मी आदर्श आहे ही गोष्ट मी त्यांना फोन करुन आवर्जून कळवली. त्यांना अतिशय आनंद झाला. 

मालिकेत अदिती आता जे पल्लवीसाठी करते आहे ते खऱ्या आयुष्यात गोरे मॅडमनी माझ्यासाठी केलं होतं. त्यामुळे अदिती ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी खूप खास आहे.  १२ वर्षांपूर्वी वचन दिले तू मला या स्टार प्रवाहच्या मालिकेत मी भूमिका साकारली होती. स्वाभिमान मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा जोडले गेले आहे याचा आनंद आहे. स्वाभिमान मालिकेचा विषय खूपच वेगळा आहे. या मालिकेत नाट्य आहे, उत्कंठा आहे यामध्ये शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी पहिल्या भागापासून ही मालिका पहावी हीच इच्छा आहे.’

Web Title: After 12 years, Asavari Joshi's comeback on Marathi television

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.