'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री सीमा घोगळे झळकणार 'या' नव्या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 18:41 IST2025-08-11T18:41:16+5:302025-08-11T18:41:40+5:30

Tujhyasathi Tujhyasang Serial : अभिनेत्री सीमा घोगळे (Seema Ghogle) 'सन मराठी'वरील 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. यात ती 'पुष्पा' या खलनायिकेची भूमिका साकारत आहे.

Actress Seema Ghogle of 'Aai Kuthe Kay Karte' fame will be seen in Sun Marathis new serial Tujhyasathi Tujhyasang | 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री सीमा घोगळे झळकणार 'या' नव्या मालिकेत

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री सीमा घोगळे झळकणार 'या' नव्या मालिकेत

'आई कुठे काय करते' मालिकेत विमलच्या भूमिकेतून अभिनेत्री सीमा घोगळे (Seema Ghogle) घराघरात पोहचली. या मालिकेनंतर तिने आणखी काही मालिकेत काम केले. त्यानंतर आता ती 'सन मराठी'वरील 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. यात ती 'पुष्पा' या खलनायिकेची भूमिका साकारत आहे.

'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या मालिकेत माईसाहेब वैदहीचा बदला घेण्यासाठी वेगवेगळे प्लॅन तयार करतात. पण तेजा कायम वैदहीच्या बाजूने खंबीर उभा राहतो. माईसाहेबांसह मालिकेत सीमा घोगळे पुष्पा ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. याबद्दल ती म्हणाली की, यापूर्वी बऱ्याचदा खलनायिकेची भूमिका साकारली आहे, पण 'पुष्पा' भूमिकेत बऱ्याच वेगवेगळ्या छटा आहेत. त्यामुळे ही भूमिका साकारताना दडपण येतं पण दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनामुळे पुष्पा साकारणं सोपे होतंय. मला या रूपात पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय असतील? याकडे माझं लक्ष आहे.  

'''पुष्पा' प्रेक्षकांना खिळवून ठेवेल''

सीमा पुढे म्हणाली, ''पुष्पा मक्तेदार घराण्यातील मोठी जाऊबाई असली तरी, घरात तिला सत्तेचा पूर्ण हक्क नाही. माईसाहेब सगळे निर्णय घेतात आणि हेच पुष्पाच्या अस्वस्थतेचं कारण आहे. सत्ता मिळवण्यासाठी ती वेगवेगळ्या पद्धती वापरते. कोणाशी गोड बोलते, तर कोणाला फसवते. तेजाला ती आपल्या मुलासारखं मानते, पण त्याचा उपयोग करून माईसाहेबांना त्रास देण्याचा प्रयत्न करते. पुष्पा ही केवळ खलनायिका नाही, ती एक सत्तेला भुकेली बाई आहे, जी आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोणतीही सीमा ओलांडते.  माईसाहेबच्या सावलीत वावरणारी, पण स्वतःचं अधिराज्य निर्माण करू पाहणारी ही 'पुष्पा' प्रेक्षकांना खिळवून ठेवेल ही खात्री देऊ शकते."


"माझी सन मराठीसोबत ही पहिली मालिका आहे. चिन्मय मांडलेकर, विकास पाटील, विनोद लव्हेकर आणि निखिल शेठ एकंदरीतच पोतडी एंटरटेनमेंट ह्या टीम सोबत मी दुसऱ्यांदा काम करते आहे. या सगळ्यांमुळे मला पुष्पा ही भूमिका साकारायला मिळत आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा नाशिक मध्ये शूटिंग करण्याची संधी मिळाली. मुंबईच ट्राफिक, धावपळ या पासून थोडं लांब नैसर्गिक वातावरणात शूटिंग करताना खूप समाधान मिळत. कितीही तास शूटिंग केलं तरी १५ मिनिटात घरी पोहचणार हे सुख वेगळंच आहे. त्यामुळे काम करायला आणखी छान वाटतं.", असे सीमा घोगळेनं सांगितलं.

Web Title: Actress Seema Ghogle of 'Aai Kuthe Kay Karte' fame will be seen in Sun Marathis new serial Tujhyasathi Tujhyasang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.