मानधन न मिळाल्यामुळे अभिनेता शशांक केतकर संतापला, पोस्ट शेअर करत म्हणाला - "ते लोक..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 16:58 IST2023-09-02T16:58:31+5:302023-09-02T16:58:46+5:30
Shashank Ketkar : शशांक केतकरने फेसबुकवर पोस्ट शेअर करत त्याचे पैसे थकवल्या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.

मानधन न मिळाल्यामुळे अभिनेता शशांक केतकर संतापला, पोस्ट शेअर करत म्हणाला - "ते लोक..."
कलाकारांचे पैसे बुडवणं, शूटिंग संपल्यानंतरही त्यांचे पैसे थकवणे हा प्रकार अनेकदा सिनेइंडस्ट्रीत घडताना दिसतो आणि बऱ्याचदा कलाकार त्याबद्दल सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. असाच अनुभव काही दिवसांपूर्वी गौतमी देशपांडे हिला आला होता आणि तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सगळा प्रकार सांगितला होता. त्यानंतर आता मुरांबा फेम अभिनेता शशांक केतकर(Shashank Ketkar)लाही असाच अनुभव आला आहे. त्याने सोशल मीडियावर त्यांच्या कामाचे पैसे थकवल्याचा आरोप निर्मात्यांवर केला आहे.
शशांक केतकरने फेसबुकवर पोस्ट शेअर करत त्याचे पैसे थकवल्या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. त्याने लिहिले की, आणखी एका फसव्या प्रोडक्शन हाऊससोबत मी काम केले आहे. ज्याने मला माझ्या कामाचे X, xx, xxx लाख रुपये देण्याचे वचन दिले होते आणि त्यांचे काम मी त्यांच्या अपेक्षेनुसार पूर्णदेखील केले आहे. (डबिंग वगळता) गेल्या अनेक महिन्यांपासून मी या फसव्या प्रोडक्शन हाऊससोबत पाठपुरावा करतो आहे आणि ते लोक मला सतत वेगवेगळी कारणं देत आहेत.
तो पुढे म्हणाला की, मी एका मराठी चित्रपटाबद्दल बोलतो आहे, ज्यात अनेक मोठ्या कलाकारांनी काम केले आहे. त्या मोठ्या कलाकारांना त्यांच्या देय रकमेची वाजवी टक्केवारी आधीच देण्यात आली आहे. पण मला आणि त्याच टीममधील इतर अनेकांना २० टक्के रक्कमही मिळालेली नाही. माझ्या आणि निर्मात्यांमध्ये झालेल्या संवादाचे सर्व तपशील योग्य वेळी न्यूज आणि मीडिया चॅनेलसोबत शेअर केले जातील.
गमतीचा भाग हा आहे की एखाद्याकडे अॅक्टिंग स्किल्स नसतील तर त्याला आपण अभिनेता म्हणत नाही… मग ज्याच्याकडे पैसा नाही त्याला निर्माते का म्हणतो आपण, असा सवालही या पोस्टमध्ये त्याने केला आहे.