गोड नात्यांचा आनंदी सोहळा!

By Admin | Published: October 30, 2015 11:26 PM2015-10-30T23:26:03+5:302015-10-30T23:26:03+5:30

काही चित्रपट ध्यानीमनी नसताना अचानक सुखद असा धक्का देऊन जातात. अनपेक्षितपणे मिळालेला असा धक्का धकाधकीच्या जीवनात ताजेपणा आणतो.

Sweet tunes! | गोड नात्यांचा आनंदी सोहळा!

गोड नात्यांचा आनंदी सोहळा!

googlenewsNext

काही चित्रपट ध्यानीमनी नसताना अचानक सुखद असा धक्का देऊन जातात. अनपेक्षितपणे मिळालेला असा धक्का धकाधकीच्या जीवनात ताजेपणा आणतो. सामाजिक, राजकीय, वैचारिक तसेच ओढूनताणून आणलेल्या विनोदीपटांची सध्या गर्दी झाली असताना, त्यापासून मोकळा श्वास घेता येईल याची सोय ^‘ते आठ दिवस’ या चित्रपटाने केली आहे. नात्यांत घट्ट बांधलेल्या एका कुटुंबातल्या लगीनघाईची गोष्ट या चित्रपटात मांडली आहे. पण लग्नसोहळ्यांमधल्या कुठल्याही गोष्टीची पुनरावृत्ती न करता हा चित्रपट गोड नात्यांचा आनंदी सोहळा साजरा करतो आणि हा सोहळा अनुभवणाऱ्यांनाही त्या आनंदात सामावून घेतो. एका वाड्यात देवधरांचे मोठे कुटुंब वास्तव्यास आहे. आबा हे पहिल्या पिढीचे प्रतिनिधी; तर सुधाकर, प्रभाकर व मधुकर ही त्यांची तीन विवाहित मुले आणि त्यांची मुले हे सगळे एकत्र कुटुंबपद्धतीत वाड्यात राहत आहेत. सुधाकरची मुलगी प्राजक्ता हिच्या लग्नाची घाई वाड्यात सुरू आहे. फक्त तिची आई वसुंधरा मात्र यात नाही; कारण प्राजक्ता एक वर्षाची असतानाच करियर करण्यासाठी ती परदेशी गेली आहे. अर्थात यावरून तिच्याबद्दल देवधरांच्या कुटुंबात नाराजी आहे. पण प्राजक्ताचे लग्न ठरल्याचे वसुंधराला समजल्यावर तब्बल १८ वर्षांनी तिने या घरात या लग्नसोहळ्यासाठी, आठ दिवस का होईना पण येण्याचे ठरवले आहे. अर्थातच तिच्या या निर्णयाने देवधरांच्या वाड्यात अस्वस्थता पसरली आहे. पण अखेरीस ती या वाड्यात येते आणि मग पुढे जे जे काही घडते त्याची गुंफण या चित्रपटात केली आहे.
लग्नसोहळा म्हटला की चित्रपटात बरेच काही घुसवण्यास मोकळे रान मिळते; परंतु या सोहळ्यात नेमकेपणावर दिलेला भर हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरावे. तसेच यात दोन-चार गाणी घालायलाही सहज वाव होता; पण ते टाळून यात एकुलते एक गोड गाणे ठेवत चित्रपटाची लज्जत वाढवली आहे. यात कुठेही अघळपघळपणा केलेला जाणवत नाही. याचे श्रेय अर्थातच कथा, पटकथा, संवादकार शशांक केवले आणि दिग्दर्शक श्याम धानोरकर यांना द्यावे लागेल. पण यातल्या मधुकर या पात्राचा बालिशपणा आणि मालू या व्यक्तिरेखेचे प्रयोजन मात्र अनावश्यक वाटते. चित्रपटाचा शेवट अपेक्षित मार्गावरून जाणारा असला, तरी तो तसा केला नसता तरीसुद्धा यातला गोडवा काही कमी झाला नसता.
प्राजक्ता ही या चित्रपटाची खरी नायिका असली, तरी यातली मध्यवर्ती भूमिका वसुंधरा या व्यक्तिरेखेची आहे आणि ती तेवढ्याच लव्हेबलपणे रेणुका शहाणेने साकारली आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या भाषेचा टोन रेणुकाने अतिशय छान सादर केला आहे आणि तो ऐकायलाही खूप गोड वाटतो. त्यावर रेणुकाचे ‘ते’ प्रसिद्ध असे खास स्टाईलचे हास्य पार तिच्या प्रेमात पडायला लावते. तिच्या भूमिकेतच गोडवा आहे आणि तिने त्याचे चांदणे चित्रपटभर पसरवले आहे.
प्राजक्ताच्या भूमिकेत दीपाली मुचरीकरने आश्वासक रंग भरले आहेत आणि तिच्याकडून अपेक्षा वाढवल्या आहेत. अविनाश मसुरेकर (आबा), तुषार दळवी (सुधाकर), सुनील जोशी (प्रभाकर), अतुल तोडणकर (मधुकर) यांच्यासह मीना सोनावणे, अभिलाषा पाटील, आरोह वेलणकर, आशुतोष गायकवाड, सुहासिनी परांजपे, अभिषेक देशमुख, अक्षय कुलकर्णी, पांडुरंग कुलकर्णी या लग्नमंडपातल्या साऱ्यांचा गोतावळा जमून आला आहे. दिवाळीची चाहूल तर आता लागली आहेच आणि निखळ आनंद देणारा असा हा चित्रपट या माहोलात भर घालणारा आहे.

Web Title: Sweet tunes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.