सावनी अनप्लग्ड !
By Admin | Updated: August 8, 2016 03:04 IST2016-08-08T03:04:54+5:302016-08-08T03:04:54+5:30
'होणार सून मी या घरची' या मालिकेतील तू मला, मी तुला गुणगुणू लागलो... या गाण्यामुळं घराघरांत पोहोचलेली गायिका म्हणजे सावनी रवींद्र. मराठीसोबतच कोकणी आणि तमिळ भाषेत

सावनी अनप्लग्ड !
'होणार सून मी या घरची' या मालिकेतील तू मला, मी तुला गुणगुणू लागलो... या गाण्यामुळं घराघरांत पोहोचलेली गायिका म्हणजे सावनी रवींद्र. मराठीसोबतच कोकणी आणि तमिळ भाषेत आपल्या सुरांची जादू दाखवणाऱ्या सावनीने आपल्या आई-वडिलांकडून मिळालेला संगीताचा समृद्ध वारसा पुढे सुरू ठेवलाय. याच निमित्ताने सावनी रवींद्र यांच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद.
संगीताची आवड कशी निर्माण झाली?
-घरातूनच संगीताचा वारसा मला लाभलाय. वडील शास्त्रीय गायक आणि आईसुद्धा मराठी संगीत-नाटक गायिका. त्यामुळं आईवडिलांकडून लहानपणापासूनच संगीताचे संस्कार घडत गेले. मी दोन-अडीच वर्षांची असताना गायला सुरुवात केली, असं आई सांगते. त्यानंतर आठवीत असताना प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. नंतर यशवंत देव यांच्यासोबत परफॉर्म केलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत शो केले. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. 'भावसरगम' या कार्यक्रमात त्यांच्यासोबत गाण्याची संधी मिळाली आणि तेव्हापासून खऱ्याअर्थाने गायनाची सुरुवात झाली.
आई-वडील गायक असल्याने गायन क्षेत्रातील करिअर आईवडिलांनी तुझ्यावर लादलं का?
-घरातच संगीताची परंपरा असल्यानं बालपणापासूनच शास्त्रीय आणि सुगम संगीताचे संस्कार घडत गेले. सुरुवातीला फिल्मी गाण्याची परवानगी नव्हती. मात्र, जेव्हापासून मला समजायला लागलं, त्यानंतर मी सगळ्या प्रकारची गाणी ऐकू लागली. मात्र,आता कोणतीही बंधनं नाहीत.
मंगेशकर कुटुंबीयांशी तुझं एक वेगळं नातं आहे. तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल?
-आई-वडील मंगेशकर कुटुंबाचे अभ्यासक आहेत. मंगेशकर कुटुंबीयसुद्धा मला नातीसारखं ट्रीट करतात. अकरावीत असताना पहिल्यांदाच लतादीदी आणि महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासमोर गाणं गायलं. त्या वेळी लतादीदींनी दिलेली ‘गुणी बाळ’ अशी कौतुकाची थाप आजही प्रेरणा देऊन जाते.
तमिळ गाण्याकडे तू कशी काय वळली?
-सध्या मी तमिळ सिनेमांसाठी पार्श्वगायन करते. ए. आर. रेहमान यांची आणि तमिळ गाणी दिवस-रात्र ऐकली. त्यातून तमिळ गाण्यांची आवड निर्माण झाली. अक्षय जोनपूरकर यांच्याशी ओळख झाली. चार भाषा एकत्र करून एक गाणं आम्ही बनवलं. हेच गाणं दक्षिणेकडे एकानं ऐकलं आणि त्याने फेसबुकवरून संपर्क साधत आम्हाला चेन्नईला बोलवलं आणि त्यानंतर दक्षिणेत गायला सुरुवात केली.
तमिळ इंडस्ट्री कशी आहे? एका वेगळ्या भाषेत गाण्यासाठी कशी तयारी केली?
-आपल्या पाचपट मोठी आहे तमिळ इंडस्ट्री. आपल्याकडे जसे येसुदास, इलायराजा प्रत्येकाला माहीत आहेत तसंच तिथंही संगीतप्रेमींना श्रीनिवास खळे माहीत आहेत. तमिळ भाषेत गाणं हा एक वेगळा अनुभव होता. शब्द आणि उच्चारासाठी आधी तमिळ मी देवनागरी भाषेत लिहून घ्यायची आणि मग ते रेकॉर्डिंग करायची. मात्र इतकं करूनही शब्द मात्र लक्षात राहायचे नाहीत. त्यामुळं रेकॉर्डिंगच्या वेळी खूप धम्माल यायची. साऊथमध्ये गाणं गात असल्यामुळे मला ए. आर. रेहमान यांना भेटण्याची इच्छा आहे.
मात्र अजून तो योग जुळून आलेला
नाही.
सध्याच्या संगीताबद्दल काय वाटतं?
-भावगीत एकेकाळी आपल्याकडे प्रचंड लोकप्रिय होतं. मात्र, सध्या भावगीतं आपल्याकडे लोप पावत चाललीत. मात्र, तरीही अजय-अतुल यांनी आपली मेलडी टिकवून ठेवलीय. सध्या स्पर्धा खूप वाढलीय, असं मला वाटतं. त्यामुळं मीसुद्धा गायकीबाबत कोणतीही चॉईस ठेवलेली नाही. कुठल्याही प्रकारचं गाणं मला गायला आवडतं. 'दोस्ती' सिनेमासाठी आनंद शिंदे यांच्यासोबत मी एक आयटम साँग गायलंय. एका मराठी सिनेमासाठी लोकगीत गायलंय. या लोकगीताची कमाल अशी आहे, की आवाज बदलून मी हे गाणं गायलंय. जे जे हे गाणं ऐकतील त्यांना विश्वासच बसणार नाही की हे गाणं मी गायलंय. हा आवाज माझाच आहे, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. सगळ्यांना ते गाणं खूप वेगळं वाटेल, असं मला वाटतं. सगळ्या प्रकारची गाणी गाणं मी एन्जॉय करते.
तुझ्या सध्याच्या आणि भविष्यातील प्रोजेक्टविषयी जाणून घ्यायला आवडेल?
-'सावनी अनप्लग' हा लाइव्ह शो करायचा असून, सध्या त्यावर काम सुरू आहे. यूट्यूबवर याला चांगला प्रतिसादही मिळतोय. परदेशात आणि भारतात याचे शो करण्याची इच्छा आहे. सध्या 'लताशा' हा शो तसेच वैभव जोशी आणि मी मिळून 'शब्दांचीच रत्ने' हा शो करतो. बंगाली, तमिळ, गुजराती, मल्याळम भाषांमध्येही गाण्याची माझी इच्छा आहे. भविष्यात वन वे तिकीट, दोस्तीगिरी हे मराठी सिनेमा आणि तमिळ सिनेमाही करतेय. गाण्यासोबत मालिकांसाठी मला अभिनयाच्याही आॅफर्स येतात. मात्र, शेड्यूल जमत नसल्याने मी त्या स्वीकारल्या नाहीत. कारण संगीत हे माझं पॅशन आहे.
भविष्यात मला संगीतावर आधारित एखादा सिनेमा करायला नक्की आवडेल.