सुमीत राघवनची मराठीशी गट्टी
By Admin | Updated: August 2, 2015 05:17 IST2015-08-02T04:49:58+5:302015-08-02T05:17:13+5:30
‘हॉलिडे’मधील कमांडो झालेल्या अक्षय कुमारच्या मैत्रीसाठी करिअर पणाला लावणारा इन्स्पेक्टर आठवतोय... तोच सुमीत राघवन. ‘फास्टर फेणे’ या मालिकेपासूनच बालगोपाळांचा आवडता.

सुमीत राघवनची मराठीशी गट्टी
‘हॉलिडे’मधील कमांडो झालेल्या अक्षय कुमारच्या मैत्रीसाठी करिअर पणाला लावणारा इन्स्पेक्टर आठवतोय... तोच सुमीत राघवन. ‘फास्टर फेणे’ या मालिकेपासूनच बालगोपाळांचा आवडता. ‘महाभारत’ मालिकेमध्ये मैत्रीचे प्रतीक असलेल्या सुदामाची भूमिका त्याने साकारली. त्यानंतर मालिका आणि चित्रपटांतील वेगवेगळ्या पठडीतील भूमिका लीलया साकारून रसिकांच्या मनात स्थान मिळविले. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिकेतील त्याची भूमिका तर विशेष गाजली. तमीळ पिता आणि कन्नड माता.. पण मराठीत रुळलेला आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही स्थान मिळविलेल्या सुमीतने ‘सीएनएक्स’ला दिलेल्या मुलाखतीत आपला प्रवास उलगडला.
मराठी आणि बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये बजेटचा विषय सोडला तर सगळंच सेम असतं. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळ्याच प्रसिद्ध अभिनेत्यांशी २५-३० वर्षांची ओळख असल्याने मैत्रीचं वातावरण असतं. पण बॉलीवूडमध्ये कितीही चांगली ओळख झाली तरी त्यामध्ये प्रोफेशनलिझम्ची किनार असतेच. त्यामुळे तिथे मराठीसारखं मोकळं वातावरण खूप कमी वेळा अनुभवायला मिळतं.
‘फास्टर फेणे’ मालिकेपासून बालकलाकार म्हणून सुरुवात केल्याने अगदी पहिल्यापासूनच कौटुंबिक वातावरण अनुभवयाला मिळाले. ‘संदूक’ चित्रपट करताना खूप मजा आली. वेगळा विषय होता. मात्र, आजवरच्या मालिका आणि चित्रपटांनंतर आता नाटक करायची इच्छा आहे. त्यादृष्टीने मी नाटकाकडे वळलोही आहे. सुरू असलेले नाटक आता बंद झालं आहे. मी नवीन नाटकाच्या शोधात आहे. माझ्या मते, प्रत्येक कलाकाराने रंगभूमीशी त्याची नाळ जोडलेली असेल तर त्याने एका बाजूला नाटक सुरू ठेवायलाच पाहिजे. जो नाटक करतो तो खूप काही तरी ग्रेट करतो, असं मानलं जातं. पण ही चुकीची समजूत आहे. नाटकामध्ये अभिनय न जमणारे अनेक लोक आहेत आणि जे मालिका किंवा चित्रपटातूनच इंडस्ट्रीत येतात; त्यांच्यातही अनेक उत्तम अभिनय करणारे कलाकार आहेत, त्यामुळे माझ्या मते हा गैरसमज आहे. केवळ नाटकातच खरा अभिनेता तयार होतो, असंही कित्येकदा बोललं जातं. पण त्यापेक्षाही एखादं काम किती सिरीयसली करतो आणि स्वत:ला त्या कामात कसे झोकून देतो यावर खरा कलाकार घडणं अवलंबून असतं.
बख्तियारबरोबर क्लोज बॉँड
‘बडी दूर से आए है’मध्ये सुमीत एलियनची भूमिका साकारतोय. या मालिकेतील बख्तियार इराणीबरोबर अत्यंत जवळची मैत्री आहे. या मालिकेतील सगळी टीम अगदी एखाद्या कुटुंबासारखी आहे, असे सुमीत म्हणतो.
कधी सुदामा, कधी ड्रायव्हर तर कधी कॉमेडी
अशा भूमिका साकारल्यानंतर सुमीतला आता मनाला भावेल, अशी भूमिका साकारायची इच्छा आहे. ड्रीम रोलबद्दल सुमीत सांगतो, एकेकाळी माझ्या ड्रीम रोलबद्दल मी विचारही करायचो, पण आता अनुभवपरत्वे मला अस वाटतं की ड्रीम रोल वगैरे असा नसतो. एखाद्या रोलचे स्वप्न बघण्यापेक्षा मिळालेला रोलच ड्रीम रोल कसा करता येईल, यावर लक्ष दिले पाहिजे.
शब्दांकन : मृण्मयी मराठे