प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनूची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 11:44 IST2025-09-13T11:44:06+5:302025-09-13T11:44:49+5:30
दोघांचं एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं.

प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनूची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं (Priya Marathe) ३१ ऑगस्ट रोजी निधन झालं. तिच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. प्रियाला कॅन्सर होता हे खूप कमी जणांना माहित होतं. प्रियाचा नवरा शंतनू मोघे (Shantanu Moghe) हा देखील अभिनेता. दोघांची जोडी खूप गोड होती. शंतनूने शेवटपर्यंत तिची साथ दिली. खंबीरपणे तिच्यामागे उभा राहिला. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) प्रियाचा चुलत भाऊ होता. सुबोध नुकतंच प्रिया आणि शंतनुच्या नात्यावर भरभरुन बोलला.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सुबोध भावे म्हणाला, "प्रिया आणि शंतनूचं एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं. शंतनूने प्रियासाठी खूप केलं. आजच्या काळात जिथे आपण दोन दोन तीन तीन महिन्यात घटस्फोट झालेले ऐकतो तिथे शंतनू प्रियाच्या आजारपणात ज्या ठामपणे तिच्याबरोबर उभा राहिला ते खरंच कौतुकास्पद आहे. स्वत:चं काम सोडून त्याने आयुष्यातला संपूर्ण वेळ प्रियासाठी दिला."
तो पुढे म्हणाला, "शंतनूने नवीन मालिका घेतली होती आणि अगदी शेवटी शेवटी म्हणजे प्रिया जायच्या आदल्या दिवशी त्याचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला होता. प्रियाने निधनाच्या आदल्या रात्री तो एपिसोड पाहिला होता. दुसऱ्या दिवशई सकाळीच तिने आई आणि शंतनूसमोर अखेरचा श्वास घेतला. दोघांनी एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम केलं आणि मला खात्री आहे पुढच्या जन्मी ते पुन्हा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात एकत्र येतील. तेव्हाही ते एकमेकांचे असतील इतकंच त्यांचं सुंदर आणि घट्ट नातं होतं. मला शंतनूचा खरंच खूप अभिमान वाटतो."
शंतनू स्टार प्रवाहवरील 'याड लागलं प्रेमाचं' मध्ये काम करायला लागला होता. त्याने त्याच्या एन्ट्रीचा प्रोमोही सोशल मीडियावर शेअर केला होता. तर प्रिया दीड दोन वर्षांपासून अभिनयापासून दूर होती. आधीही तिला कॅन्सर झाला होता ज्यावर ती मात करुन बाहेर आली होती. पण यावेळी पुन्हा कॅन्सरने डोकं वर काढलं आणि तिने अखेरचा श्वास घेतला. 'तुझेच मी गीत गात आहे' ही प्रियाची शेवटची मालिका होती.