भक्तिमार्गाकडे वळवणारी कथा

By Admin | Published: August 1, 2015 04:11 AM2015-08-01T04:11:22+5:302015-08-01T04:11:22+5:30

श्रद्धा आणि विज्ञान यांच्यातला संघर्ष जसा जुना आहे, तसाच आस्तिक आणि नास्तिक यांच्यातला वादही नवीन नाही. याच पार्श्वभूमीवर श्रद्धा, भक्ती, अध्यात्म एका पारड्यात; तर विज्ञान, शास्त्र, चिकित्सा

Story about devotional devotion | भक्तिमार्गाकडे वळवणारी कथा

भक्तिमार्गाकडे वळवणारी कथा

googlenewsNext

- राज चिंचणकर

श्रद्धा आणि विज्ञान यांच्यातला संघर्ष जसा जुना आहे, तसाच आस्तिक आणि नास्तिक यांच्यातला वादही नवीन नाही. याच पार्श्वभूमीवर श्रद्धा, भक्ती, अध्यात्म एका पारड्यात; तर विज्ञान, शास्त्र, चिकित्सा यांना दुसऱ्या पारड्यात ठेवत ‘देऊळ बंद’ चित्रपट थेट भाष्य करतो. भक्ती आणि शास्त्राची सांगड घालत, श्रद्धा आणि विज्ञानाचा खेळ रंगवत, तसेच स्वामी समर्थांची महती सांगत ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने भक्तिमार्गाकडे नेणारी दारे उघडली आहेत.
मूळ भारतीय असलेला राघव शास्त्री हा शास्त्रज्ञ थेट ‘नासा’तून भारतात एक प्रोजेक्ट करण्यासाठी येतो. देशासाठी महत्त्वाचा असलेला हा प्रोजेक्ट राघव करत असल्याने त्याच्या मागावर काही दहशतवादी लागलेले असतात. राघवची वास्तव्याची सोय ज्या सोसायटीत केलेली असते, तिथे स्वामी समर्थांचे देऊळ असते आणि राघवच्या कामात तिथल्या आवाजाने खंड पडत असतो.
परिणामी, राघव त्याचे अधिकार वापरून ते देऊळ बंद करायला लावतो. पण हा विषय इथेच संपत नाही; तर एके दिवशी थेट स्वामी समर्थ राघवच्या समोर जाब विचारण्यासाठी उभे ठाकतात आणि मग अध्यात्म व विज्ञान यांच्यातल्या संघर्षाला धार येत जाते. राघवच्या प्रोजेक्टचे पुढे काय होते, दहशतवादी नक्की कोणती चाल खेळतात, स्वामी समर्थ आणि राघवच्या द्वंद्वात कुणाची जीत होते; यावर हा चित्रपट रंगतदार प्रकाश टाकतो. प्रवीण तरडे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा व दिग्दर्शन केले असून, प्रणित कुलकर्णी यांनी त्यांना पटकथेसाठी साहाय्य केले आहे. एक ठोस विचार चित्रपटातून जावा, याची दक्षता कथेच्या माध्यमातून घेण्यात आली असल्याचे सतत जाणवत राहते. त्यानुसार या चित्रपटाची बांधणी केल्याचेही स्पष्ट होत जाते. पण हे करताना मनोरंजनात्मक पेरणी करत यातले बाळकडू पचनी पडेल, याचा विचारही करण्यात आला आहे. मात्र चित्रपटात खरी रंगत येते ती मध्यंतरानंतर!
तब्बल तीन तासांच्या या चित्रपटाचा पूर्वार्ध यातल्या व्यक्तिरेखा प्रस्थापित करण्यातच खर्ची पडला आहे. त्याला कात्री लावणे गरजेचे होते. मध्यंतरानंतर मात्र ही गाडी सुसाट धावली आहे. चित्रपटात स्वामींचे दर्शन कधी होईल, याची उत्कंठा ताणून धरण्यात चित्रपटाचा पूर्वार्ध खूपच लांबवत नेला आहे. पण पडद्यावर स्वामींचे दर्शन झाल्यावर त्यांचे गारुड मनावर होत जाते. मात्र चित्रपटात दाखवलेले शास्त्रज्ञांचे बालिश वर्तन असो किंवा काही पोरसवदा संवाद असोत, ते एकूणच विषयाला मारक ठरले आहेत. यातल्या स्वामी समर्थांच्या ठायी अध्यात्म आणि आधुनिकतेचा संगम घडवून आणला असला, तरी स्वामींच्या या व्यक्तिरेखेला अजून थोडी गांभीर्याची झालर आवश्यक होती. चित्रपटात प्रशांत मिसळे यांचा कॅमेरा मस्त फिरला असून, नरेंद्र भिडे यांनी संगीताची बाजू चांगली सांभाळली आहे.
राघव शास्त्रीच्या भूमिकेत गश्मीर महाजनीने त्याचे आंतरिक गुण प्रकट केले आहेत. या भूमिकेचे मोठे फूटेज त्याच्या वाट्याला आले असून, त्याने त्यात रंग भरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. गिरिजा जोशी (पत्नी) व निवेदिता सराफ (आई) यांना यात फार काही करण्यास वावच नव्हता. सुनील बर्वे, प्रसाद ओक, सतीश आळेकर, किरण यज्ञोपवित आदी कलाकारांचे छोटेखानी दर्शनही यात घडते. या चित्रपटात घडवलेली काही देवस्थानांची परिक्रमा आणि एकूणच भक्तिभावाला बळकटी देणारी चित्रपटाची कथा यामुळे स्वामीभक्तांसाठी हा चित्रपट खास ठरेल यात मात्र शंका नाही.

Web Title: Story about devotional devotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.