‘या’ स्टार्सचे देऊळ पाण्यात! पाहिजे एक तरी ‘हिट’!!

By Admin | Updated: March 19, 2017 07:39 IST2017-03-19T03:25:35+5:302017-03-19T07:39:59+5:30

बॉलिवूड म्हणजे एकार्थाने बेभरवशाचा कारभार होय. बॉक्स आॅफिसवरचा प्रत्येक शुक्रवार प्रत्येक बॉलिवूड कलाकाराचे नशीब ठरवत असतो. चित्रपट लोकांना आवडला, तर स्टारडम

'This' star's temple is in water! Should be a 'hit' !! | ‘या’ स्टार्सचे देऊळ पाण्यात! पाहिजे एक तरी ‘हिट’!!

‘या’ स्टार्सचे देऊळ पाण्यात! पाहिजे एक तरी ‘हिट’!!

- Rupali mudholkar 

बॉलिवूड म्हणजे एकार्थाने बेभरवशाचा कारभार होय. बॉक्स आॅफिसवरचा प्रत्येक शुक्रवार प्रत्येक बॉलिवूड कलाकाराचे नशीब ठरवत असतो. चित्रपट लोकांना आवडला, तर स्टारडम टिकणार आणि नाही आवडलाच, तर स्टारडम टिकवण्याचे आव्हान कायम. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देताय, तोपर्यंत ठीक. हिट देणे बंद झाले की, तुमच्या करिअरची नौका डगमगणार, हे इथे ठरलेले. सध्या बॉलिवूडच्या काही कलाकारांची नौका अशीच डळमळीत दिसू लागली आहे. त्यांना हवाय, एक हिट. एका हिटच्या प्रतीक्षेत असलेल्या अशाच काही स्टार्सवर एक नजर...

कॅटरिना कैफ
कॅटरिना कैफ एकेकाळी बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांपैकी एक होती, असे आम्ही म्हणतोय कारण २०१५ पासून कॅटच्या करिअरला चांगलीच ओहोटी लागलीय. आधी कॅटरिनाचा ‘फँटम’ आला. तो बॉक्स आॅफिसवर दणकून आपटला. मग ‘फितूर’ आला, तोही फ्लॉप ठरला. यानंतर ‘बार बार देखो’कडून कॅटला मोठी अपेक्षा होती. पण, हा चित्रपटही तसाच सुपरफ्लॉप गेला. अशा स्थितीत कॅटरिनाची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. कॅटरिनाला आता एका तरी हिटची गरज आहे. लवकरच कॅटचा ‘जग्गा जासूस’ रिलीज होतोय. यानंतर सलमानसोबतच्या ‘टायगर जिंदा है’मध्ये कॅट दिसणार आहे. यापैकी कोणता चित्रपट कॅटची हिटची आस पूर्ण करतो, ते बघूच.

कंगना राणावत
कंगना राणावत म्हणजे, बॉलिवूडची क्वीन. कंगनाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. पण, गतकाळात तिचे एका पाठोपाठ एक आलेले अनेक चित्रपट आपटले. ‘रिव्हॉल्व्हर रानी’, ‘कट्टी बट्टी’ या कंगनाच्या दोन्ही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. अलीकडे आलेला ‘रंगून’ हा चित्रपटही तसाच आपटला. त्यामुळे कंगनालाही आता एका मोठ्या हिटची गरज लागणार आहे.

श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूरने एका पाठोपाठ एक असे चार हिट सिनेमे दिलेत. यामुळे श्रद्धाच्या करिअरने चांगलाच वेग घेतला. पण, यानंतर आलेला ‘रॉक आॅन 2’ आणि ‘ओके जानू’ या दोन्ही चित्रपटांनी श्रद्धाची निराशा केली. आता श्रद्धाला ‘हसीना’ व ‘हाफ गर्लफ्रेंड’ या दोन चित्रपटांकडून अपेक्षा आहेत.

आदित्य रॉय कपूर
सन २००९ मध्ये ‘आशिकी 2’ या चित्रपटाद्वारे आदित्य रॉय कपूर याने दमदार डेब्यू केला होता. यानंतर आलेल्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटामुळे आदित्यचे करिअर चांगले मार्गी लागले होते. मात्र, यानंतर आलेल्या ‘फितूर’ व ‘ओके जानू’ या दोन चित्रपटांनी आदित्यच्या करिअरला करकचून ब्रेक लावला. आता अशा स्थितीत करिअरची गाडी मार्गी लावायची, तर आदित्यला एक तरी हिट द्यावा लागणारच.

विद्या बालन
आदित्य रॉय कपूरची वहिनी म्हणजे अभिनेत्री विद्या बालन हिलाही एका हिटची गरज आहे. ‘कहानी’ हा विद्याचा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटानंतर विद्याने सहा चित्रपट केलेत. पण, बॉक्स आॅफिसवर हे सहाही चित्रपट
दणकून आपटले. अशा स्थितीत विद्याला हिटची मोठी गरज आहे. अर्थात लवकरच विद्याचा ‘बेगम जान’ रिलीज होतोय. हा चित्रपट विद्याची किती गरज पूर्ण करतो, ते बघूच.

सैफ अली खान
करिना कपूर हिचा लाडका हबी सैफ अली खान याचे करिअर सध्या फार काही चांगले नाही. ‘दिल चाहता है’,‘आेंकारा’,‘रेस’ असे अनेक हिट सिनेमे सैफने दिलेत. मात्र, २०१३ पासून त्याने एकही हिट दिला नाही. ‘बुलट राजा’,‘हमशकल्स’,‘फँटम’ आणि अलीकडे रिलीज झालेला ‘रंगून’ असे सैफचे सगळे सिनेमे फ्लॉप गेलेत. त्यामुळे करिअर सावरायचे, तर सैफला एक मोठा हिट लागेलच.

परिणीती चोप्रा
परिणीती चोप्राला आपण बऱ्याच दिवसांपासून पाहिलेले नाही. २०१४ मध्ये ‘किल दिल’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. हा चित्रपट चालला नाही. त्याआधी आलेला ‘दावत ए इश्क’ही आपटला. यानंतर परिणीतीने ब्रेक घेतला. आता ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाद्वारे परिणीती वापसी करतेय. हा चित्रपट परिणीतीच्या करिअरला कशी गती देतो, ते दिसेलच.

अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चनचे करिअर सध्या एकदम थांबले आहे. ‘हाऊसफुल 3’हा त्याचा रिलीज झालेला शेवटचा सिनेमा होता. हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. पण, सगळा भाव अक्षय कुमार खाऊन गेला. अभिषेकवर तसाही अपयशीपणाचा ठप्पा लागला आहे. तो मिटवायचा असेल, तर अभिषेकला एक हिट लागेल.

Web Title: 'This' star's temple is in water! Should be a 'hit' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.