विशेष मुलांची कहाणी ‘लालबागची राणी’
By Admin | Updated: June 3, 2016 01:35 IST2016-06-03T01:35:53+5:302016-06-03T01:35:53+5:30
विशेष मुलेदेखील सर्वसामान्यांप्रमाणे जगू शकतात. त्यांनाही ती स्पेस द्या, त्यांना सहानुभूती दाखवू नका. तिला जगण्यासाठी मोकळीक द्या.

विशेष मुलांची कहाणी ‘लालबागची राणी’
विशेष मुलेदेखील सर्वसामान्यांप्रमाणे जगू शकतात. त्यांनाही ती स्पेस द्या, त्यांना सहानुभूती दाखवू नका. तिला जगण्यासाठी मोकळीक द्या. त्याचबरोबर, या चित्रपटात विशेष मुलीची भूमिका साकारणारी वीणा जामकर हिलादेखील ती विशेष असली, तरी आपण काही तरी खास आहोत, या भावनेने कोणतीही तक्रार न करता आनंदाने जगत असते. नेमका हाच विचार समाजापर्यंत लालबागची राणी या चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचवायचा असल्याचे, दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी ‘लोकमत’ भेटीदरम्यान सांगितले. या वेळी अभिनेता अशोक शिंदे, प्रथमेश परब, पार्थ भालेराव, लेखक रोहन घुगे, संगीतकार रोहित नागभिडे हे कलाकार या वेळी उपस्थित होते.
या चित्रपटाच्या एकदम शेवटच्या क्षणी मी या चित्रपटात सहभागी झालो आहे, तसेच या चित्रपटाचा अनुभवपण खरंच एकदम छान होता. त्याची आत्मानंद नावाची भूमिका असून, तो एका विशेष मुलीला भेटल्यावर त्याचा आत्मानंद कसा जागा होतो, ते या चित्रपटात दाखविले असल्याचे प्रथमेशने सांगितले.
नितीन परुळकरच्या भूमिकेत अशोक शिंदे असून, त्यांनी विशेष मुलीच्या वडिलांची भूमिका पार पाडली. या चित्रपटात आपल्या मुलीला अत्यंत सामान्य मुलीसारखे ट्रीट केले आहे. तिला कोणत्याही प्रकारची वाईट वागणूक न देता आनंदाने जगण्यासाठी प्रोत्साहन दिले. अशा जागरूक पालकाची भूमिका समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे अभिनेता अशोक शिंदे यांनी सांगितले.
पार्थनेदेखील ‘लोकमत’ सीएनएक्सशी बोलताना सांगितले की, ‘लक्ष्मणसरांकडून खूप काही शिकायला मिळाले, तसेच सीनिअर कलाकारांसोबत काम करतानादेखील खूप आनंद झाला. रोहन घुगे यांच्या लिखाणातून नक्कीच एक वेगळा विषय समाजापर्यंत पोहोचणार आहे, तर रोहित नागभिडे यांच्या संगीताने चार चाँद लागले आहेत, हे नक्की.’ हा चित्रपट ३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.