ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' सिनेमा OTTवर या दिवशी येणार भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:57 IST2025-10-14T13:56:03+5:302025-10-14T13:57:32+5:30
Kantara Chapter 1 OTT Release: ऋषभ शेट्टीचा चित्रपट 'कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच कमाई करत आहे आणि लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' सिनेमा OTTवर या दिवशी येणार भेटीला
ऋषभ शेट्टीचा चित्रपट 'कांतारा चॅप्टर १' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच कमाई करत आहे आणि लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. 'कांतारा चॅप्टर १'बद्दल लोकांमध्ये असलेली क्रेझ पाहण्यासारखी होती आणि आता ती आणखी वाढली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी इतकी उत्कृष्ट कमाई केली की अनेक बॉलिवूड चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. आता चाहते तो ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.
कोणताही सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर चाहते तो ओटीटीवर कधी येईल याची वाट पाहू लागतात. 'कांतारा चॅप्टर १' चित्रपटगृहांमध्ये २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. साउथचे चित्रपट १ महिन्यानंतरच ओटीटीवर रिलीज होतात, त्यामुळे चाहत्यांना वाटत होते की हा चित्रपट ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला ओटीटीवर येईल, पण त्याची रिलीज डेट पुढे ढकलली जात आहे.
कधी आणि कुठे होणार रिलीज?
'कांतारा चॅप्टर १' सुरुवातीला ३० ऑक्टोबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ज्या पद्धतीने कमाई करत आहे, ते पाहता निर्मात्यांनी तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, 'कांतारा चॅप्टर १' हिंदीमध्येही रिलीज झाला आहे आणि कोणताही हिंदी चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांनीच ओटीटीवर येतो. त्यामुळे 'कांतारा चॅप्टर १' नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
बॉक्स ऑफिसवर केली इतकी कमाई
'कांतारा चॅप्टर १'च्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, हा चित्रपट दररोज अनेक चित्रपटांचे विक्रम मोडत आहे. चित्रपटाने १२ दिवसांत भारतात ४५१.९० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर जगभरात हा चित्रपट लवकरच ६०० कोटींचा आकडा पार करणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावरही हा चित्रपट उत्कृष्ट कमाई करू शकतो.