Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 09:07 IST2025-07-17T09:06:37+5:302025-07-17T09:07:15+5:30
अभिनेत्याने एका मुलाखतीत माझी २ लग्न झालीत, पहिली पत्नी चंदना होती आणि दुसरी कोकिला आहे असं सांगितले.

Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
दाक्षिणात्य अभिनेता बालाची एक्स वाईफ एलिजाबेथ उदयन हिने हॉस्पिटलच्या बेडवरून एक खळबळजनक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने अभिनेता बालावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. जर मला काही झाले, मी मेले तर त्याची जबाबदारी बालाची असेल असं तिने या व्हिडिओत म्हटले आहे.
अभिनेत्याच्या एक्स वाईफने फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की, मला मरायच्या आधी न्याय मिळणार आहे का, की देशात फक्त श्रीमंतांना न्याय मिळतो? मी मजबुरीने या अवस्थेत व्हिडिओ बनवत आहे. अनेक गोष्टी सहन करण्यापलीकडे गेल्या. मला धमकी देणारे व्हिडिओ मिळत आहेत. माझ्याविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेव असं धमकावले जात आहे. इतकेच नाही तर मला पैसे लुटणारी म्हणून बोलले जाते असं तिने म्हटलं.
तसेच बाला म्हणतो, माझे लग्न झाले नाही, ना कुठलाही समारंभ झाला होता. मी त्याच्याबाबत बनावट कहाणी बनवतेय असा आरोप माझ्यावर केला जात आहे. मात्र बऱ्याच लोकांना त्याने ही माझी पत्नी असल्याचे सांगत भेटवले होते. माझ्यासोबत मुलाखती आणि कार्यक्रमही केले होते. जर मला काहीही झाले तर त्याला जबाबदार बाला असेल. पोलीस माझी तक्रार घेत नाहीत त्यासाठी मी मुख्यमत्र्यांकडे तक्रार केली त्यानंतर डीवायएसपी ऑफिसला माझी तक्रार पाठवली. ते एक दोनदा चौकशीसाठी माझ्या घरी आले, त्यानंतर मला काहीच माहिती दिली नाही. खटला न्यायालयात आहे. अनेक सुनावणीत बाला किंवा त्याचे वकील हजर झाले नाहीत असा आरोप एलिजाबेथ उदयन हिने केला.
बालाची ४ लग्न झालीत?
अभिनेता बालाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले तर त्याने ४ लग्न केली आहेत. २००८ मध्ये त्याने चंदना सदाशिव हिच्याशी लग्न केले परंतु हे लग्न वर्षभरातच मोडले. दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्याने दुसरं लग्न अमृता सुरेशसोबत केले. हेही लग्न ९ वर्षांनी घटस्फोट घेत मोडले. एलिजाबेथ उदयन ही तिसरी पत्नी होती. हे दोघे २०२१ मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले परंतु २०२४ साली दोघांनी घटस्फोट घेतला. २०२४ मध्ये बालाने कोकिलासोबत चौथे लग्न केले. अभिनेता बालाला एक मुलगाही आहे. मात्र अभिनेत्याने एका मुलाखतीत माझी २ लग्न झालीत, पहिली पत्नी चंदना होती आणि दुसरी कोकिला आहे असं सांगितले. दरम्यान, आता उदयन हिने लावलेल्या आरोपावर बालाकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.