मराठीतले स्मार्ट व्हिलन

By Admin | Updated: July 20, 2015 09:23 IST2015-07-20T02:27:00+5:302015-07-20T09:23:26+5:30

खलनायक म्हणजे उग्र चेहरा, विचित्र भीतिदायक पेहराव अशी एक धारणा; पण मराठीतील खलनायक आता स्मार्ट होतोय. खलनायक साकारणाऱ्यांना नंतर नायकाच्या भूमिका मिळू लागल्या आहेत

Smart Villain in Marathi | मराठीतले स्मार्ट व्हिलन

मराठीतले स्मार्ट व्हिलन

खलनायक म्हणजे उग्र चेहरा, विचित्र भीतिदायक पेहराव अशी एक धारणा; पण मराठीतील खलनायक आता स्मार्ट होतोय. खलनायक साकारणाऱ्यांना नंतर नायकाच्या भूमिका मिळू लागल्या आहेत. तर, नायकांना खलनायक करायला आवडत आहे.
‘‘बाई जरा वाड्यावर या, तिकडे बोलू आपण!’’ हे शब्द आठवले, की मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर खलनायक निळू फुले डोळ्यांसमोर उभे राहतात. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट मराठी चित्रपटांतील त्या काळचे खलनायक म्हणजे गावचा पाटील अथवा त्याचा हाताबाहेर गेलेला मुलगा. वाढलेले केस, डोक्यावर भरजरी टोपी.... भेदक नजर... हातात गुप्ती... सोबत चार-पाच धडधाकट पहिलवान, असा या खलनायकांचा तोरा होता. सदाशिव अमरापूरकर, राजशेखर, कुलदीप पवार, डॉ. श्रीराम लागू, राघवेंद्र कडकोळ, मोहन जोशी, राहुल सोलापूरकर यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांनी आपल्या अभिनयातून हा खलनायक जणूकाही जिवंतच केला.... मात्र, खलनायकांचा बाज काळाच्या पडद्याआड गेला असून, मराठीतील आजचा खलनायक स्मार्ट झाला आहे.
‘लय भारी’तून मराठीमध्ये पदार्पण केलेल्या रितेश देशमुखलाही संग्रामच्या भूमिकेतील शरद केळकर जास्त भाव खातोय काय? अशी भीती वाटली. महेश मांजरेकरांच्या ‘फक्त लढ म्हणा’मधील सचिन खेडकरांनी साकारलेला मधुसूदन पाटील हा खलनायकही मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ‘क्लासमेट’मधील सचित पाटीलने साकारलेला रोहित भोसले, ‘दुनियादारी’मध्ये जितेंद्र जोशीने साकारलेला साईनाथ, ‘उलाढाल’ चित्रपटात सुबोध भावेने साकारलेला गुरू, अंकुश चौधरीची ‘गैर’ आणि ‘पोरबाजार’ या चित्रपटांमधीलमधील भूमिका निगेटिव्ह असली, तरी त्यांना युवकांनी डोक्यावर घेतले. ‘ड्रीम मॉलन’मध्ये सिद्धार्थ जाधवही निगेटिव्ह भूमिकेत दिसला. बोलण्याच्या धाटणीने विनोद निर्माण करणाऱ्या मकरंद अनासपुरेलाही त्यामुळेच ‘पारध’मध्ये खलनायक साकारावासा वाटला. याउलट, अशोक सराफसारख्या ज्येष्ठ अभिनेत्याने कारकिर्दीच्या सुरुवातीला खलनायक केला; मात्र नंतर नायकाच्या भूमिकेत ते दिसू लागले. तर, कुलदीप पवार कथेच्या गरजेप्रमाणे नायक किंवा खलनायक साकारत असत.

सुरुवातीच्या काळात नायकाची भूमिका करणाऱ्यांनी नंतर खलनायक म्हणून कारकिर्द घडविल्याची अनेक उदाहरणे हिंदीमध्ये आहेत. अजित, के.के. सिंग, किरणकुमार ही त्यांतील काही उदाहरणे. के.एन. सिंग हे बुजुर्ग कलाकार तर म्हणायचे की त्यांच्या गुरूनेच सांगितले, ‘‘हीरो कब तक करोगे? व्हिलन जिंदगी भर करते रहना।’

मराठीतले काही खलनायक हिंदी आणि साऊथमध्येही हिट झाले आहेत. त्यांत प्रामुख्याने सयाजी शिंदे, नागेश भोसले, ‘सिंघम’मधील शिवाच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची मने जिंकणारा अशोक समर्थ, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यासारख्या प्रमुख आघाडीच्या कलावंतांचा समावेश आहे. या कलाकारांनी मराठी भाषेच्या सीमा पार करून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये साकारलेल्या खलनायकांच्या भूमिकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मराठीपेक्षा साऊथमध्येच हे कलाकार अधिक हिट झाले आहेत.

Web Title: Smart Villain in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.