साध्या विषयाची छोटीशी गोष्ट!
By Admin | Updated: February 13, 2015 22:55 IST2015-02-13T22:35:50+5:302015-02-13T22:55:47+5:30
पण ते साध्य करताना हा चित्रपट मोठी झेप घेता घेता राहिला आहे.

साध्या विषयाची छोटीशी गोष्ट!
चित्रपटाच्या नावाप्रमाणेच ही गोष्ट आहे ती एका राणीची; पण यातली राणी आहे ती एक छोटीशी गोड मुलगी़ या मुलीला केंद्रस्थानी ठेवत हा चित्रपट तिच्याभोवती फिरतो. या कथेत अनाथ मुलांचाही विषय हाताळण्यात आला असला, तरी सगळा फोकस आहे तो या लहानग्या बाळावऱ चित्रपटाची कथाही या छोट्याशा मुलीप्रमाणेच छोटेखानी आहे आणि त्यामुळे या कथेला पूर्णांशाने फुलवत नेण्याची मोठी जबाबदारी या चित्रपटाच्या टीमवर होती; पण ते साध्य करताना हा चित्रपट मोठी झेप घेता घेता राहिला आहे.
हा चित्रपट अनाथ मुलांच्या विश्वावरही भाष्य करू पाहतो, पण या विषयाचा पाया आवश्यक तेवढा पक्का झालेला नाही. परिणामी ही कथा छोट्या राणीपुरती मर्यादित राहिली आहे. अब्बा जान या गेल्या जमान्यातल्या संगीत अभ्यासकाच्या पश्चात त्यांचा मुलगा आणि त्याची बायको म्हणजे चाचा आणि सईदा चाची अब्बा जान यांच्या स्मृती जपत दिवस ढकलत असतात. या दोघांनी ओम, राजू आणि आयेशा या तीन मुलांना त्यांच्या घरी आश्रय दिलेला असतो. टाईपरायटरवर काम करणाऱ्या या चाचाला संगणकाशी जुळवून घेता येत नसल्याने त्याच्या हाताला काम नसते. त्यामुळे घरात सगळीच ओढाताण असते. ओम हा गॅरेजमध्ये, तर राजू हॉटेलमध्ये काम करीत घराला हातभार लावतात.
एक दिवस या तीन मुलांना रस्त्यावर एक छोटीशी मुलगी कुणीतरी सोडून गेल्याचे आढळते. ही मुले तिला घेऊन घरी येतात आणि तिचे संगोपन करतात. कथेचा हा एक धागा आहे; तर दुसरीकडे मार्इंचा अनाथाश्रम आणि तेजस्विनी नामक शिक्षिका व सामाजिक कार्यकर्तीचा धागा कथेत आहे.
अनाथ मुलांना शिक्षण मिळायला हवे, या हेतूने तेजस्विनीचा या तीन मुलांना मार्इंच्या आश्रमात नेण्यासाठी हट्ट असतो आणि त्यामुळे ही तीन मुले तिच्यापासून दूर पळू पाहतात. या दोन बाजूंची गुंफण करीत ही कथा साकारत जाते.
माधुरी अशिरगडे यांची कथा प्रामाणिक असून, त्यांनी दोन धागे एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. माणुसकी, आपुलकी व एकात्मकतेची भावना यात आहे; पण कथेचा जीव लहान आहे आणि त्यामुळे तिची मांडणी करण्यासाठी दिग्दर्शिका सुचिता शब्बीरना परिश्रम घ्यावे लागले आहेत. चित्रपट बऱ्यापैकी प्राथमिक गोष्टींवर रेंगाळतो आणि आवश्यक तशी पकड घेण्यात कमी पडतो.