छोट्या पडद्यावरील प्रमोशनचा ‘फ्लॉप शो’
By Admin | Updated: July 8, 2016 03:15 IST2016-07-08T03:15:07+5:302016-07-08T03:15:07+5:30
छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो, डान्स शो, म्युझिकल शो किंवा मग मालिका यातून सिनेमांना प्रमोट करण्याचा नवा ‘ट्रेंड’ रूढ झाला. गेल्या काही वर्षांत बॉलीवूडचे बडे स्टार सलमान खान, शाहरूख खान

छोट्या पडद्यावरील प्रमोशनचा ‘फ्लॉप शो’
विविध ‘शो’मधील उपस्थिती वाटू लागली रटाळवाणी
छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो, डान्स शो, म्युझिकल शो किंवा मग मालिका यातून सिनेमांना प्रमोट करण्याचा नवा ‘ट्रेंड’ रूढ झाला. गेल्या काही वर्षांत बॉलीवूडचे बडे स्टार सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित, दीपिका पदुकोण, विद्या बालन आणि बऱ्याच जणांनी आपल्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी छोट्या पडद्यावरील ‘रिअॅलिटी शो’मध्ये हजेरी लावली. यानिमित्ताने बॉलीवूडच्या मंडळींना घरबसल्या टीव्हीवर पाहण्याची, त्यांच्या सिनेमाविषयी जाणून घेण्याची संधी छोट्या पडद्यावरील रसिकांना मिळाली. त्यामुळे रसिकांनाही सुरुवातीला हा ‘ट्रेंड’ आवडला. त्यामुळे रसिकांना या स्टारच्या सिनेमाची माहिती मिळाली. कलाकारांची गुपिते या ‘रिअॅलिटी शो’मधून उघड होऊ लागली. त्यामुळे प्रमोशनचा हा फंडा सुरुवातीच्या काळात छोट्या पडद्यावरील शो आणि बॉलीवूड सिनेमांच्या पथ्यावर पडला.
‘अति तिथे माती’ ही म्हण आपण ऐकलेलीच आहे. तीच ती गोष्ट वारंवार होत राहिली की रसिकही त्यापासून दूर होऊ लागतो. सुरुवातीला छोट्या पडद्यावरील एखाददुसऱ्या शोमध्ये अवतरणारे बॉलीवूडचे कलाकार आता त्यांच्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी सर्वच चॅनेल्सवरील शोमध्ये दिसू लागलेत. तेच ते कलाकार, त्यांच्या त्याच त्याच गोष्टी ऐकून छोट्या पडद्यावरील रसिकांनाही सारे रटाळवाणे वाटू लागले आहे. कधी काळी ‘रिअॅलिटी शो’मध्ये सिनेमाचे प्रमोशन म्हणजे बकवास आहे असं म्हणणारा सलमान त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी विविध रिअॅलिटी शोमध्ये झळकू लागलाय.
शाहरूख, आमीर, ऐश्वर्या, हृतिक, दीपिका, कतरिना, रणबीर, बॉलीवूडचा प्रत्येक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते या ना त्या शोमध्ये झळकतात.
आता तर भाषेच्या सीमा ओलांडून हे कलाकार मराठी रिअॅलिटी शो ‘चला हवा येऊ द्या’ मध्येही हजेरी लावतायत. या रिअॅलिटी शोमध्ये प्रमोशनसाठी हजेरी लावणारे तेच ते बॉलीवूड कलाकार आणि रिअॅलिटी शोमध्ये स्किट सादर करणाऱ्या कलाकारांचे तेच फुटकळ विनोद, त्याच कोट्या, तेच डान्स, तीच तीच मस्ती पाहून रसिकांना हा प्रमोशन फंडा कंटाळवाणा वाटू लागलाय. बडे बडे स्टार हजेरी लावत असूनही टीआरपीमध्ये ‘द कपिल शर्मा शो’ पहिल्या पाचमध्येही स्थान मिळवू शकत नसल्याचे उदाहरण ताजे आहे. त्याऐवजी रसिकांची पसंती ‘डेली सोप’ला मिळताना दिसते आहे. जिथे त्यांना मनोरंजन आणि ‘टिष्ट्वस्ट एंड टर्न’ अनुभवता
येतात. या सगळ्याचं कारण म्हणजे छोट्या पडद्यावरील रसिकांना बॉलीवूडकरांनी आणि ‘रिअॅलिटी शो’च्या निर्मात्यांनी गृहीत धरलेय. मात्र ‘ये पब्लिक है सब जानती है’ ही गोष्ट मात्र ते विसरलेले दिसताहेत. सध्याच्या सोशल नेटवर्किंग, व्हॉट्सअॅपच्या जमान्यात अशा रीतीने सिनेमा प्रमोशनचा फंडा रसिकांना सिनेमागृहाकडे आकर्षित करेलच असे नाही. गेल्या काही सिनेमांच्या यशाचं रिपोर्टकार्ड पाहिल्यास याची प्रचिती येईल.
‘शानदार’ या सिनेमाचे आलिया भट्ट आणि शाहीद कपूरने जोरदार प्रमोशन केले. विविध शोमध्ये हजेरी लावून रसिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर साफ आपटला. दुसरीकडे बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतच्या ‘क्वीन’ सिनेमाचे उदाहरण घ्या. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कंगना कोणत्याही शोमध्ये गेली नाही. मात्र सिनेमा सुपरडुपर हिट ठरला. त्यामुळे कोणताही सिनेमा हिट होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असते तगडी स्क्रिप्ट. त्यानंतर सिनेमाचा आकर्षित करणारा ट्रेलर आणि दमदार म्युझिकसह कलाकारांचा दमदार अभिनय. या सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर माऊथ पब्लिसिटी आणि सोशल मीडियातून येणाऱ्या प्रतिक्रियांचाही सिनेमाच्या यशात मोलाचा वाटा असतो, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मराठीतही अनेक सिनेमांचे प्रमोशन ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या सेटवर करण्यात आले. मात्र त्यापैकी किती सिनेमांनी बॉक्स आॅफिसवर चांगले कलेक्शन मिळवले हे ट्रेड गुरू नक्कीच सांगू शकतील. या शोमध्ये येणाऱ्या सिनेकलाकारांच्या हजेरीने सिनेमाला कलेक्शन आणि रिअॅलिटी शोला टीआरपी मिळत असेल असा विचार करणाऱ्यांनी
छोट्या पडद्यावरील रसिकांना गृहीत
धरणे बंद करावे कारण ‘पब्लिक है ये सब जानती है.’
- suvarna.jain@lokmat.com