अक्षर कोठारी परतला छोट्या पडद्यावर
By Admin | Updated: November 5, 2016 02:11 IST2016-11-05T02:11:13+5:302016-11-05T02:11:13+5:30
अक्षर कोठारीने कमला या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.

अक्षर कोठारी परतला छोट्या पडद्यावर
मुंबई- अक्षर कोठारीने कमला या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर अक्षर काय करतोय? कुठे आहे? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होेती. अक्षर आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतत असून, चाहूल या मालिकेत तो प्रमुख भूमिका साकारणार आहे. या मालिकेत तो साकारत असलेली भूमिका ही कमला या मालिकेत साकारलेल्या व्यक्तिरेखेपेक्षा वयाने लहान दाखवली आहे. त्यामुळे एक यंग डॅशिंग अक्षर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
चाहूल या मालिकेत अक्षर परदेशातून शिक्षण घेऊन साताऱ्यात परतलेल्या एका मुलाची भूमिका साकारत आहे. तो परदेशातून परत येताना एकटा न येता त्याच्या पत्नीला सोबत घेऊन आला आहे. त्याने परदेशातीलच एका मुलीशी लग्न केलेले आहे. परदेशात असताना तो एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि ही मुलगीदेखील त्याच्या प्रेमाखातर आपला देश सोडून साताऱ्यातील एका छोट्या गावात राहायला येते; पण त्यांच्या नात्यात एका अज्ञात शक्तीचा अडथळा येतो आणि शोध लागतो एका गूढाच्या शोधाचा, अशी या मालिकेची कथा आहे. अक्षर त्याच्या कमबॅकविषयी सांगतो, ‘‘मी कमला ही मालिका संपल्यानंतर काही महिन्यांच्या ब्रेकवर गेलो होतो. या वेळात मी माझा संपूर्ण वेळ हा माझ्या कुटुंबीयांना दिला. मी मूळचा सोलापूरचा असल्याने मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना आई-वडिलांना जाऊन भेटणे शक्य व्हायचे नाही. त्यामुळे माझ्या ब्रेकमधील सगळा वेळ हा त्यांना द्यायचा, असे ठरवले. आम्ही सगळे मिळून दांडेली येथील जंगलात गेलो होतो. त्या वेळी तर मी जवळजवळ १५ दिवस मोबाईलदेखील बंद ठेवला होता. मी माझा हा ब्रेक खूप एन्जॉय केला. चाहूल या मालिकेत प्रेक्षकांना माझे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. कारण, कमला संपल्यानंतर मी जवळजवळ १२ किलो वजन कमी केले आहे.