सिद्धार्थ म्हणतो, गेला उडत

By Admin | Updated: July 7, 2016 03:00 IST2016-07-07T03:00:39+5:302016-07-07T03:00:39+5:30

‘दे धक्का, जत्रा, टाइम प्लीज’ यासारख्या सुपरहिट मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव हा तीन वर्षांनंतर रंगभूमीकडे

Siddhartha says, got out | सिद्धार्थ म्हणतो, गेला उडत

सिद्धार्थ म्हणतो, गेला उडत

‘दे धक्का, जत्रा, टाइम प्लीज’ यासारख्या सुपरहिट मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव हा तीन वर्षांनंतर रंगभूमीकडे वळला आहे. तसेच दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत तो थेट १३ वर्षांनंतर ‘गेला उडत’ हे नाटक करीत आहे. आज या नाटकाचे २५ प्रयोग यशस्वी झाले आहेत. याच नाटकाविषयी अभिनेता
सिद्धार्थ जाधव याने लोकमत सीएनएक्सने साधलेला संवाद.

‘गेला उडत’ या नाटकाचे नुकतेच यशस्वी २५ प्रयोग झाले. याबद्दल काय सांगशील?
- ‘गेला उडत’ नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे संपूर्ण टीमच खूप आनंदी आहे. या नाटकाचे हे यश पाहता, दिवस-रात्र या नाटकाचे रिहर्सल करीत असतानाचा तो सगळा कालावधी आठवतो. म्हणतात ना, मेहनत करा, यश हे नक्की मिळेल. त्याचेच हे सुंदर उदाहरण आहे. तसेच या नाटकाचे सर्व यश आहे फक्त एका माणसाचे. ते म्हणजे, या नाटकचे दिग्दर्शक केदार शिंदे.

या नाटकातील तुझी भूमिका काय आहे?
- या नाटकात सुपरहीरो सिंड्रोमचा बळी असलेल्या मारुतात्मज या तरुणाची भूमिका मी साकारलेली आहे. मारुतात्मज एक साधाभोळा मुलगा आहे; पण त्याच्या आईने त्याला सांगितलेले असते की, प्रत्येक माणसात एक सुपरहीरो असतो. त्यामुळे तो त्याच विश्वात जगणारा हा मुलगा आहे. तसेच तो सतत सुपरमॅनच्या पेहरावात वावरत असताना काही ना काही घोळ करून घरच्या मंडळींना गोचीत आणतो. पण एके दिवशी त्याला जाणीव होते, की माणसांमध्ये सुपरपॉवर नसली, तरी तो सुपरहीरो असतो. अशी ही मस्त गोष्ट आहे.

रंगभूमीवर मोठ्या कालावधीनंतरचा अनुभव कसा वाटला?
- खूप छान वाटत आहे. तीन वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीकडे पाहताना तितकीच मजा येत आहे. तसेच, केदार सरांसोबत १३ वर्षांपूर्वी ‘लोच्या झाला रे...’ नाटक केले होते. आता एवढ्या वर्षांनंतर त्यांच्यासोबत ‘गेला उडत’ हे नाटक करीत आहे या गोष्टीचा आनंद आहे. तसेच, रंगभूमीवर वेगवेगळ्या पद्धतींची नाटके येत आहेत. त्यात ‘गेला उडत’ने स्वत:चे स्थान निर्माण करण्यात यश मिळविल्याचा अधिक आनंद होत आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत १३ वर्षांनंतर काम करीत आहेस, त्याविषयी काय सांगशील?
- केदार सर हे प्रत्येक नाटक एकदम ताकदवान व सकारात्मकरीत्या प्रेक्षकांसमोर मांडतात. ‘लोच्या झाला रे’, ‘दामोदर पंत’ हे उत्तम उदाहरण आहे. ‘गेला उडत’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी माझ्या बाबतीतील सर्व सकारात्मक गोष्टी नाटकातून दाखविल्या आहेत. तसेच, समीक्षक व प्रेक्षकांचे रिव्ह्यू पाहून हे नाटक यशस्वी झाले आहे, असे वाटते. यामागे पूर्ण टीम व प्रसाद कांबळी यांचा हातभार आहे.

रंगभूमीवरील आदिमानव, सुपरमॅन अशा हटके भूमिकांविषयी काय वाटतं?
- प्रत्येक काम हे वेगळं असतं. सुपरमॅन म्हटलं तर हा रंगभूमीवर कसा उडणार, हा प्रश्न पडतो. पण, या सर्व गोष्टी केदार सरांनी रंगभूमीवर व्यवस्थित मांडल्या आहेत. तसेच आम्ही थिएटर कलाकार आहोत. एकांकिकेसारख्या स्पर्धांतून पुढे आलो आहोत. त्यामुळे रंगभूमीवर काम करणं ही आमच्यासाठी वेगळी गोष्ट असते.

चित्रपट आणि रंगभूमी यांतील काही फरक?
- माझ्यासाठी रंगभूमी व चित्रपट दोन्ही कम्फर्टेबल आहेत. तसेच रंगभूमीमुळे आम्हाला चित्रपट मिळाले आहेत. याच रंगभूमीमुळे आम्ही स्वत:ला प्रूव्ह केले आहे. त्यामुळे रंगभूमी सोडण्याचा विचारही करू शकत नाही.

‘गेला उडत’ नाटकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग करणार का?
- जगभरात नाटकाचे प्रयोग होतात. तेथील स्थानिकांना नाटक आवडले तर ते तशी मागणीही करतात. पाहू या तशी संधी आम्हाला मिळाली, तर नक्कीच जाऊ.
सध्या आम्ही महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करतोय. तसेच जी काही जगभरातून मागणी येते, ती प्रेक्षकांची दाद असल्यामुळेच येते. शेवटी बाहेर पडणारा पाऊस व आतमधला हास्याचा पाऊस या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी खूप चांगल्या व महत्त्वाच्या आहेत.

तुला या नाटकासाठी बरेच पुरस्कार मिळाले?
- हो. पारितोषिके, समीक्षकांची दाद व प्रेक्षकांचा आशीर्वाद या तिन्ही गोष्टींमुळे ‘गेला उडत’ हे नाटक यशस्वी झाले आहे. कारण, पुरस्कार हीच गोष्ट तुम्हाला कामाबद्दलची यशाची पावती देते.

- benzeer.jamadar@lokmat.com

Web Title: Siddhartha says, got out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.