‘& जरा हटके’ सिद्धार्थ!
By Admin | Updated: July 28, 2016 13:32 IST2016-07-28T02:16:58+5:302016-07-28T13:32:47+5:30
एकांकिका, रंगभूमीवर आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकलेला अभिनेता सिद्धार्थ मेनन, रवी जाधव दिग्दर्शित ‘अँड जरा हटके’ या सिनेमात जरा हटक्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला

‘& जरा हटके’ सिद्धार्थ!
एकांकिका, रंगभूमीवर आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकलेला अभिनेता सिद्धार्थ मेनन, प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘अँड जरा हटके’ या सिनेमात जरा हटक्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला आला आहे. सिद्धार्थच्या याच सिनेमाच्या निमित्ताने त्याच्याशी साधलेला हा खास संवाद...
मीमूळचा दाक्षिणात्य आहे. असे असूनही मराठीत काम करतोय. लहानपणापासूनच सिनेमा बघत आलोय. त्यामुळे मोठ्या पडद्याविषयी आकर्षण होते. मराठीत सध्या चांगले विषय येतायत. आशयघन विषय नाटक आणि सिनेमांमध्ये हाताळले जातायत. त्यामुळे सुरुवातीलाच मराठीत काम करण्याची संधी मिळाली आणि इथूनच माझ्या करिअरची खरी सुरुवात झाली. माझ्या नशिबाने मला मराठीतील दिग्गजांसह काम करण्याची संधी मिळाली. सचिन पिळगावकर, अतुल कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी आणि रवी जाधव यांच्यासारख्या मराठीतील दिग्गजांसह काम केल्याने त्यांच्या अनुभवांमधून बरेच काही शिकायला मिळाले.
‘अँड जरा हटके’ या माझ्या सिनेमात थोडा वेगळा विषय मांडला गेला. यांत नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आलीय. सिनेमाला चांगला प्रतिसादही मिळतोय. माझी भूमिकाही रसिकांना भावते. त्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या मिळतायत. या सिनेमाच्या टायटलमधील अँड हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण हा अँडच प्रत्येक नात्यामधील प्रमुख दुआ आहे. आई-वडील, बहीण, भाऊ अशा प्रत्येक नात्यातील हा अँड प्रमुख दुआ आहे. या अँडमुळेच अनेक गोष्टी कनेक्ट होतात, त्यामुळेच तो खूप-खूप महत्त्वाचा आहे. या सिनेमात माझी भूमिका साकारताना खूप धम्माल आली. कारण या सिनेमात मी बंगाली भाषा बोलली आहे. बंगाली भाषा बोलण्याचा अनुभवसुद्धा खास होता. पाच सहा बंगाली वाक्यच असली, तरी त्यातही खूप मज्जा आहे. भविष्यातही असे काहीतरी वेगळे करण्याची इच्छा आहे. सुरुवातीला या सिनेमाचे नाव 'ठिपक्यांची रांगोळी' असे होते. मात्र, सिनेमाच्या कथेला ते सूट होत नव्हतं. त्यामुळे रवी जाधव यांनी या सिनेमाला ‘अँड जरा हटके’ असे नाव दिले, जे खरेच खूप समर्पक आहे.
सिनेमासह हिंदी नाटकातही मी काम करतोय. नाटक आणि सिनेमा ही दोन्ही वेगवेगळी माध्यमे असली, तरी दोन्ही माध्यमांमध्ये मी रमतो. टीव्ही मालिकांच्या आॅफर्सही खूप येतात. मात्र, वेळेअभावी त्या करणं शक्य होत नाही. टीव्ही मालिकांना मात्र मी तितकासा वेळ देऊ शकत नाही. कारण मालिकेच्या शूटिंगला भरपूर वेळ द्यावा लागतो. पूर्ण महिना शूटिंगला वेळ देणं शक्य नाही किंबहुना, त्यात अडकून राहायला मला स्वत:ला आवडत नाही. कमी भागांची एखादी मालिका असेल, ज्यात महिन्यातून १०-१५ दिवसांचं शूटिंग असेल, तर करू शकेन. मात्र, महिना महिना यासाठी देणे शक्य होत नाही.
- suvarna.jain@lokmat.com