शाहरूखची मुलंही करण जोहरच्या संपत्तीचे वारसदार
By Admin | Updated: March 9, 2017 12:23 IST2017-03-09T12:16:17+5:302017-03-09T12:23:34+5:30
करणच्या मुलांव्यतिरिक्त त्याच्या संपत्तीत बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानची मुलंही वारसदार असल्याची माहिती समोर येत आहे.

शाहरूखची मुलंही करण जोहरच्या संपत्तीचे वारसदार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - सरोगसीद्वारे बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर जुळ्या मुलांचा बाप बनला आहे. मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये करणच्या दोन्ही मुलांच्या नावांची नोंदणी झाल्याची माहिती दिली आहे. या मुद्यावर चर्चा सुरू असतानाच करण जोहरबाबतीत आश्चर्यचकित करणारी आणखी एक माहिती समोर आली आहे.
महिन्याभरापूर्वी जन्माला आलेल्या करणच्या मुलांव्यतिरिक्त त्याच्या संपत्तीचे आणखी दोन वारसदार असल्याची माहिती समोर आली आहेत. करणच्या संपत्तीचे हे दोन वाटेकरी दुसरे-तिसरे कुणी नसून त्याचा जवळचा मित्र किंग खान शाहरुखची मुलं आर्यन आणि सुहाना आहेत.
करण जोहर आणि शाहरुख खान एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. शाहरुख आणि गौरीची तीन मुलं आर्यन, सुहाना आणि अबरामला करण स्वतःच्या मुलाप्रमाणेच मानतो. शिवाय, आर्यन माझाच मुलगा आहे, असा उल्लेखही करणनं अनेकदा केला आहे. यापार्श्वभूमीवर, करणने आर्यन आणि सुहानाला आपल्या संपत्तीचा वारसदार केल्याचे बोलले जात आहे. शिवाय, आर्यन आणि सुहाना त्याच्या संपत्तीच्या वाट्यातील गोल्डन मेम्बर्स असल्याचेही त्याने यापूर्वी सांगितले होते. त्यामुळे, करण या चारही मुलांमध्ये संपत्तीची कशी वाटणी करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
दरम्यान, करण जोहरने सरोगसीद्वारे एक मुलगा आणि एका मुलगीला जन्म देत पितृसुख प्राप्त केले आहे. 7 फेब्रुवारी रोजी अंधेरी पूर्व येथील मसरानी रुग्णालयात या जुळ्यांचा जन्म झाला आहे. केंद्र सरकारच्या जन्म मृत्यू नोंद ठेवणाऱ्या संकेतस्थळावरून करण जोहरच्या मुलांच्या जन्माची पुष्टी करण्यात आली आहे. करणने आपल्या वडिलांच्या नावावरून मुलाचे नाव यश आणि मुलीचे नाव रुही असे ठेवल्याची माहिती मिळाली आहे.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या आपल्या 'अॅन अनसुटेबल बॉय' आत्मचरित्रात करणने एक मुलाला दत्तक घेण्याची वा सरोगसीद्वारे बाप बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर शुक्रवारी (3 मार्च रोजी)करण जोहरच्या जुळ्या मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी पद्मजा केरकर यांनी दिली. दरम्यान, शाहरुख खानचे तिसरे अपत्य अबरामचा सरोगसीद्वारे मसरानी रुग्णालयातच जन्म झाला होता.