आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:46 IST2025-09-19T13:45:27+5:302025-09-19T13:46:32+5:30
मिस्टर खान अतिशय हुशार..., असं का म्हणाले मुकुल रोहतगी?

आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
शाहरुख खानचा लेक आर्यन खानची 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमधून आर्यनने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. आर्यनला अभिनयाची नसून दिग्दर्शनाची आवड आहे. दरम्यान आर्यन खान हे नाव २०२१ मध्ये जास्त चर्चेत आलं होतं. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्सप्रकरणी एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी आर्यन खानला अटक केली. जवळपास महिनाभर आर्यन तुरुंगात होता. लेकाला सोडवण्यासाठी शाहरुखने जंग जंग पछाडलं होतं. माजी अॅटर्नी जनरल ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना शाहरुखने आर्यनची केस लढण्याची विनंती केली होती. नुकतंच मुकुल रोहतगी यांनी तो किस्सा सांगितला.
रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मुकुल रोहतगी म्हणाले, "माझ्यासाठी तर हे नेहमीचं जामीन अर्जाचं प्रकरण होतं. मी असे हजार हँडल केले आहेत. सेलिब्रिटीचं प्रकरण असल्याने सर्वांचं त्याकडे लक्ष गेलं. मी तेव्हा लंडनमध्ये सुट्टीसाठी गेलो होतो. तेव्हा कोरोना हळूहळू कमी होत होता. मला शाहरुख खानच्या एका निकटवर्तियाचा फोन आला आणि त्याने मला मुंबई उच्च न्यायालयात आर्यनची केस लढण्यासाठी विचारलं. मी सुट्टीवर असल्याने नकार दिला. मग शाहरुखने स्वत: मला फोन केला. त्यालाही मी हेच सांगितलं. तो एक चांगला अभिनेता आहे. त्याने मला मी तुमच्या पत्नीशी बोलू शकतो का असं विचारलं. मी म्हणालो, ठीक आहे. माझ्या पत्नीशी बोलताना तो भावुक होत म्हणाला की माझ्याकडे नेहमीचा क्लाएंट म्हणून पाहू नका. मी आज एक वडील म्हणून विनंती करत आहे. शाहरुख तेव्हा खरोखर खूप डिस्टर्ब झाला होता. मग माझ्या पत्नीने मला जायला सांगितलं."
ते पुढे म्हणाले, "मिस्टर खान खरोखर जेंटलमन आहे. त्याने मला मुंबईत येण्यासाठी प्रायव्हेट जेटही ऑफर केलं. पण मी ते घेतलं नाही. मला छोटे जेट्स आवडत नाहीत. मी मुंबईत आलो आणि मी नेहमी ज्या हॉटेलमध्ये राहतो तिथेच शाहरुखनेही रुम बुक केली. शाहरुख अतिशय हुशार आणि स्मार्ट आहे. त्याने वकीलांच्या व्यतिरिक्त स्वत: काही नोट्स आणि पॉइंट्स लिहिले होते आणि त्याबद्दल त्याने माझ्यासोबत चर्चा केली. दोन-तीन दिवस कोर्टात युक्तिवाद झाला आणि अखेर आर्यनला जामीन मिळाला. मग मी पुन्हा लंडनला परत गेलो."