सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीने मागितला बंदुकीचा परवाना, काय कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 17:37 IST2025-10-12T17:36:41+5:302025-10-12T17:37:03+5:30
संगीता बिजलानीनं बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे.

सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीने मागितला बंदुकीचा परवाना, काय कारण?
Sangeeta Bijlani : संगीता बिजलानी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. संगीता बिजलानी ही सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड होती. आजही ती सलमानची चांगली मैत्रिण आहे. त्याचबरोबर ती खान कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसते. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. संगीता बिजलानीनं सुरक्षेसाठी बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे. गेल्या १८ जुलै रोजी तिच्या पुण्याजवळील पवना येथील फार्महाऊसवर चोरी आणि तोडफोडीची भयानक घटना घडली होती, ज्यामुळे अभिनेत्री खूप अस्वस्थ आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना संगीता बिजलानीनं आपलं दुःख व्यक्त केलं. ती म्हणाली, "मी गेल्या २० वर्षांपासून पवनामध्ये राहत आहे आणि हे माझे घर आहे. परंतु, या भयानक चोरीला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. चोरी आणि तोडफोड अत्यंत भयानक होती आणि मी भाग्यवान आहे की मी त्यावेळी तिथे नव्हते".
संगीतानं पुण्याचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांची घेतली भेट
चोरीच्या घटनेतर असुरक्षित वाटत असल्यानं संगीता बिजलानीने पुणे ग्रामीण पोलिसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी (Gun License) अर्ज केला आहे. "एक महिला म्हणून, मी एकटी घरी जाताना काही सुरक्षा खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. मला यापूर्वी कधीही त्याची गरज वाटली नव्हती, परंतु आता मला असुरक्षित वाटते", असं तिनं म्हटलं. तसेच अभिनेत्रीनं पुण्याचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांची भेट घेतल्याचीही माहिती दिली. पोलिस अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आणि गुन्हेगारांना अटक करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
पुण्यातील फार्महाऊसमध्ये दरोडा पडला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी संगीता बिजलानीच्या फार्महाऊसमध्ये प्रवेश केला. त्यांनी केवळ चोरी केली नाही, तर संपत्तीचे मोठे नुकसान केले होते. चोरट्यांनी फार्महाऊसमधील रेफ्रिजरेटर, टीव्ही आणि फर्निचरसारख्या अनेक वस्तूंची तोडफोड केली. त्यांनी ५०,००० रुपये रोख आणि सुमारे ७,००० रुपये किमतीचा टीव्ही देखील चोरला. शिवाय, पोलिसांनी असेही म्हटले आहे की फार्महाऊसभोवती लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील तोडण्यात आले होते, ज्यामुळे हा एक जाणूनबुजून केलेला कट असल्याचा अंदाज आहे. परंतु, अपघाताच्या वेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते. याशिवाय, घराच्या भिंतींवर आक्षेपार्ह आणि अश्लील चित्रे देखील काढली होती.