Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 21:44 IST2025-08-24T21:43:31+5:302025-08-24T21:44:59+5:30
आजपासून 'बिग बॉस'च्या १९ व्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे.

Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
Bigg Boss 19 Grand Premiere: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे 'बिग बॉस'. गेल्या कित्येक वर्षांपासून 'बिग बॉस' हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आजपासून 'बिग बॉस'च्या १९ व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. टेलिव्हिजनवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिग बॉसचं होस्टिंग यंदाही सलमान खान करतोय. भाईजानचा अनोखा स्वॅग प्रेक्षकांना चांगलाच भुरळ घालतोय. या पर्वातील पहिली स्पर्धक म्हणून 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री अशनूर कौर (Ashnoor Kaur)हिने घरात शानदार एन्ट्री घेतली आहे.
छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचलेली अशनूर आता थेट 'बिग बॉस १९'च्या घरात पोहचली आहे. अशनूर कौरने बाल कलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. ती पहिल्यांदाच बाल कलाकार म्हणून पडद्यावर दिसली. तिने २००९ मध्ये 'झांसी की राणी' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत ती महाराणी लक्ष्मीबाई यांच्या बालपणीच्या भूमिकेत दिसली. अशनूर कौर तिच्या पहिल्याच मालिकेने लोकांच्या मनावर छाप सोडण्यात यशस्वी झाली.
यानंतर अशनूर कौरने अनेक मालिकांमध्ये काम करून हळूहळू लोकांमध्ये आपली छाप पाडली. अशनूर ही छोट्या पडद्यातील सर्वात यशस्वी बाल अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या २१ व्या वर्षी तिने मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत आपली छाप सोडली आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'सुमन इंदोरी', 'ना बोले तुम ना मैने कुछ कहा', 'पटियाला बेब्स' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून तिने प्रेक्षकांची मने जिंकली. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे ती 'बिग बॉस'च्या घरात आल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता अशनूर कौर घरात किती दिवस टिकते आणि कोणत्या रणनीतींनी प्रेक्षकांची मने जिंकते, हे पाहणे खूपच रोचक ठरणार आहे.