आता घरबसल्या पाहू शकाल 'सालार', 'या' OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला सुपरस्टार प्रभासचा सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 03:33 PM2024-01-23T15:33:31+5:302024-01-23T15:34:08+5:30
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
'बाहुबली' फेम साऊथ सुपरस्टार अभिनेता प्रभासचा 'सालार' चर्चेत आहे. 'सालार' आता सोशल मीडियावर ट्रेंड करत असून या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये क्रेझ नक्कीच आहे. चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता 'सालार' ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. 'सालार'च्या ओटीटी प्रदर्शनाबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.
सालारच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल माहिती दिली. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला आहे. पण, यात हिंदी प्रेक्षकांची निराशा होणार आहे. कारण, हा चित्रपट तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या चार भाषांमध्ये ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या हिंदी डब रिलीझबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सालारच्या स्टार कास्टमध्ये प्रभाससह पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, ईश्वरी राव, श्रिया रेड्डी, टिनू आनंद आणि जगपती बाबू महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, हा चित्रपट काल्पनिक शहर खानसारवर आधारित आहे. तर सिनेमाची कथा देवा (प्रभास) आणि वर्धा (पृथ्वीराज) या दोन मित्रांभोवती फिरते. तसेच चित्रपटात प्रचंड हिंसा आहे.
'सालार'चा पहिला भाग रिलीज झाल्याने प्रेक्षकांना आता दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. २७० कोटींचं बजेट असलेल्या 'सालार' सिनेमाचं दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. हा सिनेमा २०२३ या वर्षातील सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. प्रभासच्या 'सालार'च्या एक दिवस आधी, शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. पण, 'सालार'ने जबरदस्त ओपनिंग करून इतिहास रचला आणि 'डंकी'चा पराभव केला. 'बाहुबली' नंतर सुपरहिटच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रभाससाठी हा सिनेमा फायदेशीर ठरतोय.