सई, स्वप्निलने तोडली इमेजची बेडी

By Admin | Updated: September 6, 2015 13:31 IST2015-09-06T02:45:13+5:302015-09-06T13:31:53+5:30

तेजस्विनी पंडितचा गोड वावर तर संपूर्ण चित्रपटभर दरवळून राहतो. तेजस्विनीला खरं तर या रूपात पाहण्याची सवय नाही, पण यश चोप्राने ‘सिलसिला’मध्ये रेखासाठी जी भूमिका केली ती

Sai, Swapnilane broke pieces of image | सई, स्वप्निलने तोडली इमेजची बेडी

सई, स्वप्निलने तोडली इमेजची बेडी

तेजस्विनी पंडितचा गोड वावर तर संपूर्ण चित्रपटभर दरवळून राहतो. तेजस्विनीला खरं तर या रूपात पाहण्याची सवय नाही, पण यश चोप्राने ‘सिलसिला’मध्ये रेखासाठी जी भूमिका केली ती येथे संजय जाधवने केली आहे. तेजस्विनीलाही तिचा नवीन शोध यानिमित्ताने लागला आहे. ‘तू ही रे’चा लेखक अरविंद जगतापचे अष्टपैलूत्वही समोर आले आहे. त्याने नात्यांमधील प्रवास इतका अलगद उलगडून दाखविला आहे, की प्रेक्षक त्यामध्ये गुंतून जाते. सर्वार्थाने टीमवर्कचे यश आणि प्रत्येकच कलाकाराचा स्वत:चाच लागलेला नवीन शोध हेच केवळ ‘तू ही रे’चे वैशिष्ट्य नाही तर आशयघनता आणि लोकप्रियता हातात हात घालून जाऊ शकतात, हे सिद्ध करणारा हा चित्रपट आहे.


इमेजच्या बेडीत अडकण्यासारखे कलाकारांसाठी दुर्दैव नाही आणि या बेड्या तोडण्यासारखे यश नाही. ‘तू ही रे’च्या निमित्ताने तीनही प्रमुख कलाकारांनी हे यश मिळविले आहे आणि मराठी चित्रपटांमध्ये आशयघनता आणि संवादांच्या जादूचा वेगळा ट्रेंड निर्माण केल्याची भावना प्रेक्षकांबरोबरच चित्रपट क्षेत्रातील नामवंतही व्यक्त करीत आहेत. चित्रपटाचे लेख अरविंद जगताप यांनी बाळगलेले सामाजिक भान आणि संजय जाधव यांनी चित्रभाषेचा केलेला उपयोग यामुळे ‘तू ही रे’ मराठी चित्रपटातील एक मैलाचा दगड ठरेल असे म्टटले तरी वावगे ठरणार नाही.
आपला सर्वांचा लाडका स्वप्निल, खरं तर त्याला आपण चॉकलेटबॉय म्हणून ओळखतो. त्याच्या देखणेपणावर आणि संवादाच्या जादूवर मराठी रसिक फिदा आहेत. स्वत: स्वप्निल यामध्ये कितपत समाधानी होता, माहीत नाही. पण ‘तू ही रे’ने त्याला गोड गोड चॉकलेटबॉयपासून प्रगल्भ अभिनेत्यापर्यंतच्या प्रवासाची संधी दिली आहे. स्वप्निलने ज्या पद्धतीने एक प्रामाणिक आणि जबाबदार नवरा सादर केला आहे, हे पाहिल्यावर मराठीला शाहरूख खानबरोबरच आमीर खानसारखा परफेक्शनिस्ट मिळाला आहे.
सई ताम्हणकरने तर या चित्रपटासाठी संजय जाधवचे आभारच मानायला हवेत. सईचा आजपर्यंतचा सगळा अभिनयाचा प्रवास एका रेषेत सुरू होता. पण ‘तू ही रे’मध्ये तिने साकारलेली नंदिनी अफलातून आहे. एका भूमिकेत किती रंग भरले जाऊ शकतात, हे सईने दाखविले आहे. भूमिकेच्या आतमध्ये शिरणे म्हणजे काय, संवादाबरोबरच देहबोली काय कमाल करू शकते, हे सईने यामध्ये दाखविले आहे.

‘तू ही रे’ एक ब्रिलियंट फिल्म आहे. साध्या सुंदर पद्धतीने गोष्ट सांगितली आहे. सई आणि स्वप्निलचे काम तर ग्रेटच. तेजस्विनीनेही समरसून भूमिका केली आहे. संजय जाधवची माध्यमावरची हुकूमत यामध्ये दिसते. त्याच्या प्रगल्भ दिग्दर्शकीय प्रवासाचे उदाहरणच ‘तू ही रे’मध्ये दिसते. ग्रेट टीमवर्क.
- निशिकांत कामत,
दिग्दर्शक

‘तू ही रे’मधील सई मला खरी आणि प्रामाणिक वाटली. स्टायलाइज्ड गाणी असोत की नवरा-बायकोतील खरे संवाद, सई असे समरसून ते करते, की प्रेक्षक म्हणून मी तिला नंदिनी म्हणूनच बघू लागते. संजय जाधव आणि टीमने तिच्या शैलीपेक्षा काही तरी वेगळे करण्याचे धाडस केले आहे. सईने त्याला पूर्ण न्याय दिला.
- गिरिजा ओक-गोडबोले, अभिनेत्री

तेजस्विनी ही अत्यंत खरी अगदी फटकळ म्हणावी इतकी खरी मुलगी आहे. आपल्या मर्यादांची आणि गुणविशेषांची तिला पूर्ण माहिती आहे. त्यामुळे आलेला आत्मविश्वास ती आपल्या कामात उतरविते. ‘सिंधुताई सपकाळ’ असो की ‘तू ही रे’ तेजस्विनीची वेगळी छाप पडल्याशिवाय राहत नाही.
- स्पृहा जोशी,
अभिनेत्री

नेमकं सोशिओ-पॉलिटिकल भान असलेली काही मोजकी मंडळी चित्रपट क्षेत्रात आहेत. दक्षिण आणि उत्तर ध्रुव वाटावी अशी संजय जाधव, अरविंद जगताप यांची युती झाली. त्यांची युती अनेकांची अपेक्षापूर्ती करते. ‘तू ही रे’ची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्याचे संवाद. अरविंद ‘रिलेशनशिप’ या विषयावर तितक्याच समर्थपणे लिहू शकतो.
- उपेंद्र लिमये, अभिनेता

Web Title: Sai, Swapnilane broke pieces of image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.