वैभव सूर्यवंशीची दमदार खेळी पाहून थक्क झाला अभिनेता, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 18:20 IST2025-04-29T18:19:53+5:302025-04-29T18:20:35+5:30
मनोरंजनविश्वातूनही युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वैभव सूर्यवंशीची दमदार खेळी पाहून थक्क झाला अभिनेता, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
आयपीएलमध्ये सोमवारी रात्री राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्यात झालेला सामना हा सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. या सामन्यात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने इतिहास घडवला आहे. केवळ ३५ बॉलमध्ये त्याने शतक ठोकले. वैभव आयपीएल इतिहासात वेगवान शतक करणारा सर्वात युवा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे अवघ्या १४ वर्षांच्या असलेल्या या खेळाडूची शतकी खेळी पाहून भलेभले अचंबित झाले. मनोरंजनविश्वातूनही या युवा क्रिकेटपटूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिनेता ऋषी सक्सेना याने खास वैभवचं कौतुक करणार एक व्हिडीओ शेअर केला.
ऋषी सक्सेनानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "हा वेडेपणा आहे... एक राजस्थानी म्हणून आणि राजस्थान रॉयल्सचा चाहता म्हणून मला आता काहीही नको".l तर व्हिडीओमध्ये तो म्हणतो, "या १४ वर्षांच्या वैभवने जे सर्वांना जे कुटले आहे ना, याला म्हणतात धुलाई... फक्त १४ वर्षांचा आहे तो! १४ वर्षांचा असताना मी काय करत होतो? मी तर क्लासेस चुकवण्याची कारणं शोधयचो", या शब्दात त्यानं वेभवच्या खेळाचं कौतुक केलं. यासोबतच ऋषी सक्सेनानं व्हिडीओच्या शेवटी चाहत्यांना ते १४ वर्षांचे असताना नेमकं काय करत होते? याबद्दलही विचारलं.
ऋषी सक्सेनाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो "काहे दिया परदेस" या मालिकेतून घराघरात पोहचला. मराठीशिवाय त्याने हिंदी मालिकेत काम केले आहे. तसेच त्याने फत्तेशिकस्त, पावनखिंड, सुभेदार, शेर शिवराज या चित्रपटात काम केले आहे. त्याच्या लव्हलाईफबद्दल बोलायचं झालं तर तो मराठी अभिनेत्री ईशा केसकरसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतो. २०१८ मध्ये, इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ईशासोबतचा फोटो पोस्ट करत ऋषीने रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.