विषयाचे अचूक साधलेले गणित...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 20:09 IST2017-05-26T15:41:11+5:302023-08-08T20:09:54+5:30
माणसाने कितीही काटेकोरपणे भविष्य 'प्लॅन' केले आणि त्याप्रमाणे पावले टाकायची ठरवली, तरी त्यात नशीब हा एक 'फॅक्टर' सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि तो किती साथ देईल, याची शाश्वती कुणालाच देता येत नाही.
(33).jpg)
विषयाचे अचूक साधलेले गणित...!
माणसाने कितीही काटेकोरपणे भविष्य 'प्लॅन' केले आणि त्याप्रमाणे पावले टाकायची ठरवली, तरी त्यात नशीब हा एक 'फॅक्टर' सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि तो किती साथ देईल, याची शाश्वती कुणालाच देता येत नाही. काळाची अशी काही पावले 'करार' या चित्रपटात पडतात. एका गंभीर विषयाला हाताशी कवटाळत एका 'कॅल्क्युलेटिव्ह' माणसाची कथा हा चित्रपट मांडतो. अत्यंत परिणामकारक कथेवर रचलेली पटकथा, उत्तम दिग्दर्शकीय दृष्टिकोन आणि अभिनयाची उच्च पातळी; यामुळे या चित्रपटाच्या विषयाचे गणित अचूक साधले गेलेले आहे. साहजिकच, हा चित्रपट एक संस्मरणीय अनुभव देऊन जातो.
एकाच वेळी हा चित्रपट नैसर्गिक व कृत्रिम नात्यांची मांडणी करत भावनिक आणि सामाजिक परिणाम साधतो. नात्यांतले भावबंध कुठल्याश्या लिखित करारावर भक्कम होत नसतात; तर प्रेम, आपुलकी, विश्वास यावर ते घट्ट रुजत जातात, याचे प्रतिबिंब चित्रपटात पडलेले दिसते. या चित्रपटातली राधा एक 'करार' सुनीलच्या हाती सोपवते आणि या चित्रपटाचे म्हणणे त्या हिरव्या कागदांवर ठोस उमटत जाते. सुनीलची पत्नी, जयश्रीला मूल हवे आहे; परंतु कायम 'कॅल्क्युलेटिव्ह' आयुष्य 'प्लॅन' करणाऱ्या सुनीलला त्यासाठी पाच वर्षे हवी असतात. मात्र या काळात जयश्रीचा दोनदा गर्भपात होऊन गुंतागुंत निर्माण झाल्याने, तिच्यावर आयुष्यभर मातृत्वाच्या सुखाला वंचित राहण्याची वेळ येते. यावर उपाय म्हणून ते दोघे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 'सरोगेट मदर'चा पर्याय स्वीकारतात. यासाठी त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या राधाची निवड केली जाते. राधालाही पैशांची निकड असल्याने ती यासाठी तयार होते. सुनील त्याच्या हिशेबी डोक्याने सर्वकाही जुळवून आणत असतानाच, नियती मात्र काही वेगळीच खेळी खेळते. नियतीच्या या खेळामुळे सुनीलच्या 'कॅल्क्युलेशन्स'चा पदोपदी चोळामोळा होत राहतो.
संजय जगताप यांचे भन्नाट कथासूत्र आणि त्याला हेमंत एदलाबादकर यांच्या पटकथेची व संवादांची मिळालेली चोख साथ; यामुळे ही कथा खिळवून ठेवते. वास्तविक, 'सरोगेट मदर' हा आता अनोळखी विषय राहिलेला नाही; मात्र या संकल्पनेभोवती या चित्रपटाने केलेले विणकाम अफलातून आहे. यातल्या व्यक्तिरेखांची बांधणी घट्ट आहे. सुरुवातीला चित्रपट थोडा हळूवार 'स्टॅन्ड' घेतो; मात्र यातले कराराचे कागद फडकू लागल्यावर एकामागोमाग अनपेक्षित धक्के देत ताकदीने बांधून ठेवतो. दिग्दर्शक मनोज कोटियन यांनी चित्रपटाला दिलेली ट्रीटमेंट, कथेला अचूक न्याय मिळवून देणारी आहे. गुरु ठाकूर व मंगेश कांगणे यांच्या गीतांना लाभलेली विजय गवंडे यांची संगीतसाथ, चंद्रशेखर नगरकर यांचे छायांकन आणि फैसल-इम्रान यांचे संकलन अशा टीमवर्कमुळे या चित्रपटाची घडी चांगली बसली आहे.
अभिनयाच्या बाबतीत या चित्रपटाने सुखद धक्का दिला आहे आणि त्यासाठी निमित्त ठरली आहे ती क्रांती रेडकर! अतिशय नॉन-ग्लॅमरस स्वरूपात तिला चित्रपटात पेश करण्यात आले असतानाही; तिने अभिनयात कमाल केली आहे. यात 'सरोगेट मदर' साकारताना विविध पातळ्यांवर तिने दाखवलेले विभ्रम तडाखेबंद आहेत. ही राधा म्हणजे तिच्या कारकिर्दीतली अविस्मरणीय भूमिका ठरू शकेल. सुबोध भावेने यात सुनील रंगवताना विविध रंगांची उधळण केली आहे. राधा आणि सुनील या दोन व्यक्तिरेखांवर असलेला या चित्रपटाचा फोकस दोघांनीही अजिबात ढळू न देण्याची शिकस्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, जिच्यामुळे या सगळ्या प्रपंचाला प्रारंभ होतो; ती जयश्री साकारताना उर्मिला कानेटकर-कोठारे हिने त्या भूमिकेचा बॅलन्स अचूक सांभाळला आहे. सुहासिनी मुळे, आरती मोरे, मिनल बाळ यांची उत्तम साथ या प्रमुख कलावंतांना मिळाली आहे. एक आगळावेगळा अनुभव घ्यायचा असल्यास, करारांच्या या कागदांवर बेधडक सही करताना इतर कोणताही विचार मनात आणायची काही गरजच नाही.