विधिलिखित भेटीतील नियतीचा खेळ! कसा आहे सुबोध-मानसीचा 'सकाळ तर होऊ द्या' सिनेमा

By संजय घावरे | Updated: October 11, 2025 11:40 IST2025-10-11T11:40:26+5:302025-10-11T11:40:54+5:30

या चित्रपटाची एका रात्रीत घडणारी कथा नायकाच्या आयुष्याचा संपूर्ण ग्राफ दाखवणारी असून, कितीही संकटे आली तरी निराश न होता त्यातून मार्ग काढण्याचा संदेश देणारी आहे. आजवर हिंदीत काम केलेले दिग्दर्शक आलोक जैन यांनी मराठी चित्रपट बनवताना एक वेगळा विषय हाताळला आहे.

subodh bhave mansi naik sakal tar hou dya marathi movie review | विधिलिखित भेटीतील नियतीचा खेळ! कसा आहे सुबोध-मानसीचा 'सकाळ तर होऊ द्या' सिनेमा

विधिलिखित भेटीतील नियतीचा खेळ! कसा आहे सुबोध-मानसीचा 'सकाळ तर होऊ द्या' सिनेमा

Release Date: October 10,2025Language: मराठी
Cast: सुबोध भावे, मानसी नाईक
Producer: नम्रता सिन्हाDirector: आलोक जैन
Duration: १ तास ५५ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

या चित्रपटाची एका रात्रीत घडणारी कथा नायकाच्या आयुष्याचा संपूर्ण ग्राफ दाखवणारी असून, कितीही संकटे आली तरी निराश न होता त्यातून मार्ग काढण्याचा संदेश देणारी आहे. आजवर हिंदीत काम केलेले दिग्दर्शक आलोक जैन यांनी मराठी चित्रपट बनवताना एक वेगळा विषय हाताळला आहे.

कथानक : एकटेपणाच्या चक्रव्यूहात अडकल्याने मरणाची प्रतीक्षा करत चितेवर बसलेल्या अभय पुरंदरे नावाच्या श्रीमंत तरुणाची ही गोष्ट आहे. पिस्तुलीचा ट्रीगर दाबण्याची हिंमत नसलेल्या अभयची भेट नियती नावाच्या तरुणीशी होते. वर्षभर जंगलात एकटा राहणारा अभय तिला आपल्या घरी आणतो. देहविक्रय करणारी नियती आपले मानधन सांगून त्याच्यासोबत जाते. अभयला मात्र नियतीकडे आपले मन मोकळे करायचे असते. अभय स्वत:ला मारण्यासाठी नियतीला तयार करतो, पण त्यानंतर घडणारे नाट्य चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचे तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला आहे. नियतीचा खेळ कोणाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. चुकीच्या वाटेने जाणारी एखादी व्यक्तीही कधी-कधी भरकटलेल्या व्यक्तीला जीवनाची नवी दिशा देऊ शकते हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. संवाद अर्थपूर्ण आहेत. काही त्रुटी राहिल्या आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकते. नायिका तिथे कशी पोहोचते याचा संदर्भ लागत नाही. चित्रपट कमी लांबीचा असला तरी सुरुवातीपासूनच गती संथ वाटते. गीत-संगीत, तसेच सिनेमॅटोग्राफी चांगली आहे. 

अभिनय : चित्रपटात दोनच व्यक्तिरेखा असल्याने सुबोध भावे आणि मानसी नाईक हे दोनच कलाकार आहेत. दोघांनीही आपापल्या प्रतिभेला साजेसा अभिनय केला आहे. सुबोध यापूर्वी कधीही न दिसलेल्या रूपात आहे, तर मानसी पुन्हा एकदा ग्लॅमरस भूमिकेत लक्ष वेधते. क्लायमॅक्सपूर्वी सुबोधने केलेला अभिनय मनाला भावतो. मानसीने सांगितलेली स्वत:ची दुर्दैवी कथा आजही देशाच्या कोणत्या ना कोणत्या अंधाऱ्या कोनाड्यात घडत असल्याची जाणीव होते. दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्याजोगी आहे. 

सकारात्मक बाजू : विषय, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत
नकारात्मक बाजू : संथ गती
थोडक्यात काय तर जीवनाच्या प्रवासात एखाद्या वळणावर नैराश्य आले तरी हताश न होता त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास पुढील प्रवास सुखाचा होऊ शकतो हे सांगणारा हा चित्रपट एकदा पाहायला हवा.

Web Title: subodh bhave mansi naik sakal tar hou dya marathi movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.