PM Narendra Modi Movie Review : पी. एम. नरेंद्र मोदीः एका सामान्य मुलाची प्रेरणादायी कथा

By प्राजक्ता चिटणीस | Published: May 24, 2019 01:38 PM2019-05-24T13:38:27+5:302023-08-08T20:27:58+5:30

एका सामान्य घरातील मुलाची पंतप्रधानपदापर्यंतची झेप ही कथा अतिशय प्रेरणादायी आहे.

PM Narendra Modi Movie Review | PM Narendra Modi Movie Review : पी. एम. नरेंद्र मोदीः एका सामान्य मुलाची प्रेरणादायी कथा

PM Narendra Modi Movie Review : पी. एम. नरेंद्र मोदीः एका सामान्य मुलाची प्रेरणादायी कथा

ठळक मुद्देचित्रपट मध्यांतरापर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो. पण मध्यांतरानंतर चित्रपट चांगलाच ताणल्यासारखा वाटतो. चित्रपटाची लांबी थोडी कमी केली असती तर तो अधिक नेमका झाला असता. विवेक ऑबेरॉयने चांगले काम केले आहे. पण काही वेळा संवादफेक करताना तो नरेंद्र मोदी यांची नक्कल करत असल्याचे जाणवते.
Release Date: May 24,2019Language: हिंदी
Cast: विवेक ऑबेरॉय, जरीना वहाब, मनोज जोशी, बोमन इराणी
Producer: सुरेश ऑबेरॉय, संदीप सिंग, आनंद पंडित, आचार्य मनिष, जाफर मेहदीDirector: उमंग कुमार
Duration: २ तास ११ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

प्राजक्ता चिटणीस

बायोपिकचा गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमध्ये चांगलाच ट्रेंड आला आहे. खेळाडू, अभिनेते, राजकारणी अशा विविध क्षेत्रातील लोकांचे बायोपिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणूकीचे काल निकाल हाती आले असून भारतीय जनता पक्षाला लोकांचा कौल मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी दिसणार असून त्यांच्याच आयुष्यावर आधारित पी. एम. नरेंद्र मोदी हा चित्रपट आहे. एका सामान्य घरातील मुलाची पंतप्रधानपदापर्यंतची झेप ही कथा अतिशय प्रेरणादायी आहे. पण ती दिग्दर्शक उमंग कुमारला तितक्या ताकदीने मांडता आलेली नाहीये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आयुष्यात केलेला संघर्ष आपल्याला पी. एम. नरेंद्र मोदी या चित्रपटात पाहायला मिळतो. घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने त्यांची आई (जरीना वहाब) घरकाम करत असते तर वडील (राजेंद्र गुप्ता) चहा विकून आपल्या संसाराचा गाडा हाकत असतात. घराच्या परिस्थितीची चांगलीच जाणीव असल्याने नरेंद्र मोदी अभ्यास सांभाळून आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करत असतात. देशभक्ती, लोकांना मदत करण्याची भावना या गोष्टी बालपणापासूनच त्यांच्या मनात रुजलेल्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. एका सामान्य व्यक्तीप्रमाणे आपल्याला जीवन जगायचे नाहीये हे त्यांनी खूपच कमी वयात ठरवले असते. त्यामुळे आपण संन्यास घेणार आहोत असे ते आपल्या पालकांना सांगतात आणि त्या वाटेने जाण्यासाठी काही वर्षं ते कुटुंबियांपासून वेगळे देखील राहातात. पण नरेंद्र यांचा कल समाजकार्याकडे आहे हे ओळखून त्यांना तिथे भेटलेले एक गुरू त्यांना समाजकार्य करण्याचा सल्ला देतात आणि त्यानंतर ते आपले सगळे जीवन समाज कार्यात वाहून देतात. राष्ट्रीय सेवा संघाद्वारे त्यांच्या सामाजिक वाटचालीला सुरुवात करतात. लोकांना एकत्र आणण्याची ताकद, बळाचा वापर न करता युक्तीचा वापर करून अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणे हे त्यांच्यातील गुण भारतीय जनता पार्टीतील वरिष्ठांना आवडतात आणि त्यांच्यावर गुजरात विधानसभा निवडणुकीची जबाबदारी टाकण्यात येते. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक वर्षांनंतर गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार येते. त्यानंतरच्या पुढील निवडणुकीत पक्षाकडून मुख्यमंत्री पदासाठी त्यांची निवड होते. मुख्यमंत्री बनल्यानंतर गुजरातवर आलेल्या प्रत्येक संकटाचा ते खंबीरपणे सामना करतात. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात विकास करतात आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीकडून पंतप्रधान उमेदवार म्हणून २०१४ लोकसभा निवडणुकीला त्यांच्या नावाची घोषणा केली जाते आणि भारतातील जनता देखील त्यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारते.

नरेंद्र मोदी यांचा हा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. या चित्रपटात देखील आपल्याला तोच पाहायला मिळतो. त्यामुळे काही नवीन पाहायला मिळेल अशी आशा असणाऱ्या लोकांचा नक्कीच अपेक्षाभंग होतो. कोणताही चित्रपट म्हटला की, त्यात नायकासोबत खलनायक हा येतोच. आपला नायक हा योग्य आहे हे दाखवण्यासाठी खलनायकाची वाईट बाजू प्रत्येकच चित्रपटात पाहायला मिळते. त्याचप्रमाणे या चित्रपटात देखील नायकाला लार्जर दॅन लाइफ बनवण्यासाठी खलनायकाच्या केवळ चुकीच्याच गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. खलनायकाची बाजूच चित्रपटात मांडण्यात आलेली नाही. त्यामुळे चित्रपटाच्या कथेत अनेक उणिवा जाणवतात. तसेच चित्रपटात अनेक गोष्टी उगागच टाकल्यासारख्या जाणवतात. तसेच काही वेळा चित्रपट पाहाताना आपण नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावरची डॉक्युमेंट्री पाहातोय का असे वाटते. मेरी कोम सारखा चित्रपट दिग्दर्शित केलेल्या उमंग कुमारचे हे नक्कीच अपयश आहे.

नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा वगळता इतर व्यक्तिरेखांना चित्रपटात तितकेसे महत्व देण्यात आलेले नाहीये. रतन टाटा (बोमन इराणी), अमित शहा (मनोज जोशी), नरेंद्र मोदी यांची आई (जरीना वहाब) वगळता सगळ्याच व्यक्तिरेखा मोजून केवळ ३-४ दृश्यांसाठी आपल्याला पाहायला मिळतात. इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या व्यक्तिरेखांना खूपच कमी वाव मिळाला असला तरी या भूमिका लक्षात राहातात. पण सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग या व्यक्तिरेखा उभ्या करण्यात दिग्दर्शकाला अपयश आलेले आहे. त्यांच्याप्रमाणे त्यांना गेटअप दिला असला तरी तसा मेकअप करण्यात आलेला नाही. त्यामुळे या व्यक्तिरेखा ओळखणे देखील कठीण जाते. 

चित्रपट मध्यांतरापर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो. पण मध्यांतरानंतर चित्रपट चांगलाच ताणल्यासारखा वाटतो. चित्रपटाची लांबी थोडी कमी केली असती तर तो अधिक नेमका झाला असता. विवेक ऑबेरॉयने चांगले काम केले आहे. पण काही वेळा संवादफेक करताना तो नरेंद्र मोदी यांची नक्कल करत असल्याचे जाणवते. मनोज जोशी, बोमन इराणी आणि जरीना वहाब यांनी त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाची सिनेमेटोग्राफी, बॅकराऊंड स्कोर आणि लोकेशन्स चांगले आहेत. पण एडिटिंगमध्ये त्रुटी जाणवतात. तसेच एकही गाणे ओठावर रुळत नाहीत. चित्रपट पाहाताना अनेक ब्रँडच्या जाहिराती कथेची गरज नसताना देखील केल्या असल्याचे जाणवते.       

एकंदरीत चित्रपटाच्या कथेवर चित्रपटाच्या टीमने जास्त मेहनत घेतली असती तर हा बायोपिक अधिक चांगला झाला असता. पण तरीही नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यात आलेले चढ-उतार पाहायचे असतील तर हा चित्रपट पाहायला काहीच हरकत नाहीये.

 

Web Title: PM Narendra Modi Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.