MHORKYA Movie Review: खऱ्या नेतृत्वाची उकल करणारा 'म्होरक्या'

By अजय परचुरे | Published: February 6, 2020 09:31 AM2020-02-06T09:31:02+5:302023-08-08T19:47:32+5:30

जो सर्वांना पुढे नेतो,तो म्होरक्या,एकटा पुढे जातो तो कधीच म्होरक्या नसतो ह्याची जाणीव करून देणारा हा सिनेमा आहे.

MHORKYA Movie Review | MHORKYA Movie Review: खऱ्या नेतृत्वाची उकल करणारा 'म्होरक्या'

MHORKYA Movie Review: खऱ्या नेतृत्वाची उकल करणारा 'म्होरक्या'

ठळक मुद्देम्होरक्या ही एका परेडची कहाणी असली तरी त्यातून समाजातील ,आपल्या भोवतालची आपल्या प्रत्येकाची गोष्ट आहे.
Release Date: February 07,2020Language: मराठी
Cast: रमण देवकर,यशराज कऱ्हाडे,अमर देवकर, रामचंद्र धुमाळ, अनिल कांबळे, सुरेखा गव्हाणे
Producer: व्यंकटेश पडाल,युवराज सरवदेDirector: अमर देवकर
Duration: २ तास ३ मिनीटंGenre:
लोकमत रेटिंग्स

म्होरक्या म्हणजे  जो सर्वांना पुढे नेतो ,एकटा पुढे जातो तो कधीच म्होरक्या नसतो. मराठी सिनेमांमध्ये गेल्या काही वर्षात आपल्या ताकदीच्या संहिता आणि तितकंच प्रभावी सादरीकरण करणारे नव्या दमाचे दिग्दर्शक आपल्याला तयार होताना दिसत आहेत. ज्यांना आपला विचार सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचवायचा आहे. स्वतमधील व इतरांमधील मानवी संवेदना,जाणिवा आणि मूल्यांना शोधून मानवी जीवनाचा संपन्नपणे आनंद घेणे म्हणजे जीवन. परंतु व्यव्सथेमधील नेतृत्वाने त्यांच्या हाती दिलेल्या शक्ती आणि अधिकारांच्या जोरावर रंजल्या -गांजलेल्या भारतीय समाजाचे उत्थान किती आणि कसे केले ? यावर म्होरक्यातून प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे. अमर देवकर या ताज्या दमाच्या लेखक -दिग्दर्शकाने नेतृत्व कसं नसावं  असं न मांडता नेतृत्व कसं असावं हे अधोरेखित करत म्होरक्याची मांडणी केली आहे जी आपल्याला प्रचंड भावते. 

म्होरक्या ही एका गरीब कुटुंबातील अशोक (रमण देवकर) उर्फ  आश्याची कहाणी आहे. आश्या आपल्या गरीब परिस्थितीमुळे गावात मेंढ्या हाकत फिरणारा मुलगा . सातवीत असूनही शाळेत जाण्यासाठी अजिबात उत्सुक नसलेला आणि दिवसभर मेंढ्याच्या कळपात रमणारा आश्या. या आश्याला त्याचे मित्र एक दिवस बळजबरीने शाळेत घेऊन जातात. आणि नेमकं त्याच दिवशी शाळेत प्रजासत्ताकदिनी होणाºया परेडच्या सरावाला सुरवात झालेली असते. डोंगरदºयांमधून मेंढ्या हाकणाºया आश्याचा आवाज कणखर असतोच.त्यामुळे परेडमधला त्याचा खणखणीत आवाज सगळ््यांचं लक्ष वेधून घेतो. आणि आश्या परेडचा म्होरक्या होण्याच्या स्पर्धेत येतो. यात त्याला गावाच्या पाटलाचा मुलगा बाळ्याचा रोष सहन करावा लागतो. एकीकडे परेडचं नेतृत्व तर आश्याला करायचं असतं. पण घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्याला नियमीत मेंढ्या पाळण्याचे काम दिवसभर करण्याची गरज असते. परेडमध्ये सहभागी व्हायचं तर नियमित शाळेत येण्याची अटही शिक्षक आश्यासमोर ठेवतात. शाळेत येणं शक्य नाही पण परेडच्या तांत्रिक बाबी शिकल्याशिवाय म्होरकेपद मिळणार नाही अशी विचित्र स्थिती आश्याची होते. त्याच गावात कारगिल युध्दात लढलेला पण गावाने गद्दार घोषित केलेला स्किझोफ्रेनिक अण्णा (अमर देवकर) नावाचा सैनिक असतो. मोठ्या प्रयत्नानंतर अण्णाच्या मदतीने आश्या परेडचं शास्त्रशुध्द शिक्षण घेतो. आणि परेडचं म्होरक्यापद मिळवतो. प्रजासत्ताक दिनी हाच आश्या हे म्होरकेपद कायम ठेवतो का ?  त्याला या म्होरकेपदाने नवीन दृष्टी जगायला मिळते का ? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हांला हा सिनेमा नक्कीच पाहण्याची गरज आहे. 
 

म्होरक्याचा विषय आपल्यावर एक प्रभाव टाकतो मात्र या विषयाचा जीव फार लहान आहे. अगदी थोडक्यात जरी हा सिनेमा आटोपता घेतला असता तरी त्यातला आशय जास्त चांगला पोहचू शकला असता. फाफटपसाऱ्यापेक्षा यातील काही प्रसंग नाहक वाढलेत असं सिनेमा पाहताना वाटत जातं. परेडपर्यंतचा प्रवास हा अगदीच काही दिवसांचा आहे. त्यामुळे ती गोष्ट सिमित राहिली असती तर सिनेमा अजून प्रभावी वाटू शकला असता .. मात्र या वेगळ््या विषयाबद्दल लेखक दिग्दर्शक अमर देवकरचं विशेष कौतुक आहे. अमरने यातील गरिबी आणि भेदभावाची संयतपणे केलेली मांडणी आपल्याला जगाशी जोडून ठेवते तसेच पद आणि नेतृत्व या दोन संकल्पनांमधला फरकही स्पषटपणे जाणवून देते. अमरचा हा प्रयत्न मात्र नक्कीच वाखाण्याजोगा आहे. या सिनेमाचं विशेष कौतुक यासाठी की यातील अनेक कलाकारांनी अगदीच पहिल्यांदा अभिनय केला आहे. पण कुठेही त्यांचा अभिनय कृत्रिम वाटत नाही हे दिग्दर्शकाचं कौशल्य आहे. ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार म्होरक्याला मिळाला आहे. सिनेमाचा म्होरक्या आहे आश्या म्हणजे रमण देवकर . रमणने आश्याच्या भूमिकेत जीव ओतला आहे. परेडसाठी तडफडणारा ,प्रसंगी कोसळणारा , एक बूट मिळवण्यासाठी जीवाचं रान करणारा आश्या रमणने प्रभावी उभा केला आहे. त्याला तितकीच भन्नाट साथ यशराज कऱ्हाडे या कलाकाराने दिली आहे. कारगिल युध्दात जरी असला तरी अख्ख्या गावाने गद्दार ठरवलेला  स्किझोफ्रेनिक अण्णा अमर देवकरने चांगला रंगवला आहे. रामचंद्र धुमाळ, अनिल कांबळे, सुरेखा गव्हाणे या नवीन कलाकारांनीही उत्तम साथ दिली आहे. म्होरक्या ही एका परेडची कहाणी असली तरी त्यातून समाजातील ,आपल्या भोवतालची आपल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. त्यामुळे या परेडला जायला एकदातरी हरकत नाही.

 

Web Title: MHORKYA Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.