Baaplyok Review: नात्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा सिनेमा

By संजय घावरे | Published: September 1, 2023 03:13 PM2023-09-01T15:13:55+5:302023-09-01T15:28:15+5:30

Baaplyok Review: मकरंद मानेनं सादर केलेलं बाप-लेकाचं नातं इतर नात्यांकडेही पाहण्याची नवी दृष्टी देणारं आहे.

makarand mane nagraj manjule marathi movie Baaplyok review | Baaplyok Review: नात्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा सिनेमा

Baaplyok Review: नात्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा सिनेमा

Release Date: September 01,2023Language: मराठी
Cast: शशांक शेंडे, विठ्ठल काळे, नीता शेंडे, पायल जाधव
Producer: विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद मानेDirector: मकरंद माने
Duration: 1तास 40 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

संजय घावरे

बाप आणि मुलगा हे नातं खूप वेगळं असतं. वरवर पाहता एखाद्या फणसासारखं, पण आत गोड गऱ्यासारखं असतं. मुलाला ठेच लागल्यास वडिलांच्या डोळ्यांत पाणी येतं, आणि वडिलांना कोणी काही बोललल्यास मुलाचा राग अनावर होतो. थोड्या फार फरकाने सर्वच घरांमध्ये हे नातं तसं सारखंच असतं. या चित्रपटात दिग्दर्शक मकरंद मानेनं सादर केलेलं बाप-लेकाचं नातं इतर नात्यांकडेही पाहण्याची नवी दृष्टी देणारं आहे.

कथानक : चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बाप-लेकाभोवती गुंफण्यात आली आहे. पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्यांचा त्याच्यावर राग असतो. सागरचं लग्न जमलेलं असून, घरी लगीनघाई सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं. तात्यांसोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो, पण तात्यांच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही. अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो. त्यानंतर दोघांमधल्या नात्यांमधले भावनिक पदर हळूहळू उलगडत जातात. या सोबतच इतर नातेवाईकांसोबतचे संबंधही अधोरेखित होतात.

लेखन-दिग्दर्शन : मुख्य भूमिकेतील विट्ठल काळेच्या साथीने मकरंद मानेने लिहिलेली पटकथा व संवाद गावाकडच्या वातावरणनिर्मितीचं काम चोख बजावतात. बोलीभाषेवर विशेष लक्ष दिल्याने कुठेही विसंगती वाटत नाही. या चित्रपटात इतरही व्यक्तिरेखा असल्या तरी विशेषत: हि कथा वडील आणि मुलगा या दोनच कॅरेक्टरवर फोकस करते. नात्यांमधील दुरावा दूर करण्याचा प्रयत्न सुरेखरीत्या दाखवण्यात आला आहे. चित्रपटाची गती काहीशी संथ वाटते. सुरुवातीच्या काही दृश्यांमध्ये बराच वेळ गेल्यासारखा वाटतो आणि रोमँटिक अँगल काहीसा मागे पडतो. 'लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं...' हे गाणं छान आहे. लोकेशन्स सुरेख असून ती तितक्याच सुंदरपणे कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहेत. वेशभूषा आणि रंगभूषेकडेही विशेष लक्ष देण्यात आलं आहे. मकरंदने पुन्हा एकदा एक साधी कथा तितक्याच साधेपणानं सादर करण्यात यश मिळवलं आहे.

अभिनय : शशांक शेंडे यांनी पुन्हा एकदा अफलातून वडील साकारले आहेत. यासाठी त्यांच्यावर पुरस्काराचा वर्षाव होईल यात शंका नाही. विठ्ठल काळेने साकारलेला सागरही स्मरणात राहण्याजोगा आहे. गावाकडच्या तरुणांच्या वागणूकीतील बारकावे त्याने अगदी हेरून सादर केले आहेत. नायिकेच्या रूपात पायल जाधवचा हा पहिलाच चित्रपट असूनही तिच्यात कुठेही नवखेपणा जाणवत नाही. नीता शेंडे यांनी आईची व्यक्तिरेखा एकरूप होऊन सादर केली आहे. इतर सर्वच कलाकारांनी आपापाली कामं चोख बजावली आहेत.

सकारात्मक बाजू : अभिनय, दिग्दर्शन, लोकेशन्स, कॅमेरावर्क, वेशभूषा, रंगभूषा  

नकारात्मक बाजू : चित्रपटाची गती, वेळ काढणारी काही दृश्ये

थोडक्यात काय तर पटकथेपासून संवादांपर्यंत आणि बोलीभाषेपासून अभिनयापर्यंत सर्वच पातळीवर गावातील वातावरणात नेत जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या नात्यांवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा.

Web Title: makarand mane nagraj manjule marathi movie Baaplyok review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.