Review : कन्फ्युज तरुणाईची गोंधळलेली प्रेमकथा, वाचा 'इश्क विश्क रिबाऊंड' सिनेमाचा रिव्ह्यू

By संजय घावरे | Published: June 21, 2024 05:22 PM2024-06-21T17:22:30+5:302024-06-21T17:23:16+5:30

Ishq Vishk Rebound Movie Review : शाहिद कपूर आणि अमृता रावच्या २००३मध्ये आलेल्या 'इश्क विश्क' चित्रपटातील प्रेमाचा धागा पकडून २१ वर्षांनी प्रेमाचा सेकंड राऊंड असलेला हा चित्रपट रिलीज झाला आहे.

Ishq Vishk Rebound movie review fails to entertain and create magic like ishq vishk movie | Review : कन्फ्युज तरुणाईची गोंधळलेली प्रेमकथा, वाचा 'इश्क विश्क रिबाऊंड' सिनेमाचा रिव्ह्यू

Review : कन्फ्युज तरुणाईची गोंधळलेली प्रेमकथा, वाचा 'इश्क विश्क रिबाऊंड' सिनेमाचा रिव्ह्यू

Release Date: June 21,2024Language: हिंदी
Cast: रोहित सराफ, पश्मीना रोशन, नायला ग्रेवाल, जिब्रान खान, सुप्रिया पिळगावकर, कुशा कपीला, आकर्ष खुराणा, शताफ फिगर, शीबा चढ्ढा
Producer: रमेश तौरानीDirector: निपुण धर्माधिकारी
Duration: १ तास ४७ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

शाहिद कपूर आणि अमृता रावच्या २००३मध्ये आलेल्या 'इश्क विश्क' चित्रपटातील प्रेमाचा धागा पकडून २१ वर्षांनी प्रेमाचा सेकंड राऊंड असलेला हा चित्रपट रिलीज झाला आहे. दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीने यात तीन मित्रांच्या आधारे दोन प्रेमकथा सादर केल्या आहेत. आजच्या गोंधळलेल्या तरुणाईची हि प्रेमकहाणीही काहीशी गोंधळलेली वाटते.

कथानक : राघव, साहिर आणि सान्या या तीन मित्रांची ही कथा देहरादूनमध्ये घडणारी आहे. कालांतराने साहिर आणि सान्या यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होतं. प्रेम म्हटलं की तक्रारीही आल्या. हळूहळू साहिर-सान्यामध्ये प्रेमापेक्षा रुसवे-फुगवे वाढू लागतात. दोघांमधील भांडणं नेहमी राघव सोडवतो. साहिर-सान्याची भांडणं सोडवताना राघवला स्वत:च्या प्रेमाला म्हणजेच रियाला मुकावं लागतं. एकीकडे राघव-रियाचं ब्रेकअप होतं आणि दुसरीकडे साहीरचे वडील त्याला डिफेन्स अॅकॅडमीत पाठवतात. त्यामुळे साहिर-सान्या वेगळे होतात. त्यानंतर राघव-सान्या एकत्र येतात आणि पुढे काय घडतं ते चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : प्रेमाच्या या सेकंड राऊंडमध्ये तरुणाईला आवडणारी मैत्री, प्रेम, ब्रेकअप, आरोप-प्रत्यारोप, किसींग सीन्स असं सर्व आहे. तरूणांमधील प्रेमाबाबतचा गोंधळ, एक्स गर्लफ्रेंडशी नातं, दोन मित्रांची कोंडी, प्रेमीयुगुलांमध्ये दुरावा आल्यावर तिसऱ्या मित्राची एकाला निवडण्यासाठी होणारी घुसमट चांगल्या प्रकारे दाखवली आहे. लेखक असलेला राघव चित्रपटासाठी कथा लिहिताना क्लायमॅक्समध्ये गोंधळतो. या चित्रपटाच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं आहे. मध्यंतरापूर्वी कथा उत्सुकता वाढवते. मध्यंतरानंतर नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्यावर तो योग्य प्रकारे दाखवण्याऐवजी घाईघाईत गुंडाळण्यात आला आहे. गाणी तरुणाईच्या ओठांवर रुळली आहेत. सिनेमॅटोग्राफी आणि कोरिओग्राफी चांगली आहे.

अभिनय : तरुणींचा क्रश मानल्या जाणाऱ्या रोहित सराफने राघवच्या रूपात नैसर्गिक अभिनय केला आहे. त्याने साकारलेल्या नायकाने चित्रपटाला आधार दिला आहे. 'कभी खुशी कभी गम'मध्ये बालकलाकार म्हणून काम केलेल्या जिब्रान खाननेही आपल्या व्यक्तिरेखेला अचूक न्याय दिला आहे. ऋतिक रोशनची बहिण पश्मीनासाठी ही खूप मोठी संधी होती, पण तिला त्याचा फायदा उठवता आला नाही. तिला अभिनयात आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. या तुलनेत कमी सीन्स असूनही नायला ग्रेवालने लक्षवेधी अभिनय करत आपला ठसा उमटवला आहे.

सकारात्मक बाजू : अभिनय, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, गीत-संगीत
नकारात्मक बाजू : पटकथा, काही संदर्भ, मध्यंतरानंतरची गती
थोडक्यात काय तर हलकी-फुलकी प्रेमकथा पाहण्याची आवड असल्यास टाईमपास म्हणून हा चित्रपट बघायला हरकत नाही, पण यात रुसवे-फुगवेही खूप आहेत.

Web Title: Ishq Vishk Rebound movie review fails to entertain and create magic like ishq vishk movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.