तिहार...कैद्यांच्या भावनांचा 'तुरुंग' समजून घेताना...'ओटीटी'वर गाजत असलेली 'ब्लॅक वॉरंट' का पाहावी?

By देवेंद्र जाधव | Updated: January 16, 2025 17:31 IST2025-01-16T17:30:31+5:302025-01-16T17:31:11+5:30

सध्या नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली 'ब्लॅक वॉरंट' वेबसीरिज एवढी का गाजतेय? जाणून घ्या (black warrant)

black warrant hindi webseries review based on tihar jail incidents netflix release | तिहार...कैद्यांच्या भावनांचा 'तुरुंग' समजून घेताना...'ओटीटी'वर गाजत असलेली 'ब्लॅक वॉरंट' का पाहावी?

तिहार...कैद्यांच्या भावनांचा 'तुरुंग' समजून घेताना...'ओटीटी'वर गाजत असलेली 'ब्लॅक वॉरंट' का पाहावी?

Release Date: January 10,2025Language: हिंदी
Cast: जहान कपूर, राहुल भट, परमवीर चीमा, अनुराग ठाकूर, सिद्धांत गुप्ता
Producer: Applause EntertainmentDirector: विक्रमादित्य मोटवाने आणि टीम
Duration: ५ तास ३० मिनिटं/ ७ एपिसोडGenre:
लोकमत रेटिंग्स

>> देवेंद्र जाधव

दोन ठिकाणांना वेगवेगळ्या भागात विभागण्याचं काम करते ती भिंत. एका बाजूला अगदी सुशेगात जीवन जगत असताना भिंतीच्या दुसऱ्या बाजूला अगदी विरोधाभासाचं जीवन कुणीतरी जगत असेल याची जाणीव करुन देणारं ठिकाण म्हणजे तुरुंग. जिथं शिक्षा भोगणाऱ्यांना कैदी म्हटलं जातं. पण तीही शेवटी माणसासारखी माणसंच. त्यांच्या भावना, त्यांचं विश्व किती भयाण असू शकतं याची जाणीव करुन देणारी वेबसीरिज म्हणजे 'ब्लॅक वॉरंट'. ही सीरिज आपल्याला आजवर कधीही न पाहिलेलं जळजळीत वास्तव दाखवते. तुरुंगातील कैद्यांप्रमाणे आपणही ती घुसमट अनुभवतो. हेच 'ब्लॅक वॉरंट'चं यश आहे. 

कथा:

एखाद्या कैद्याला फाशी देण्यापूर्वी कोर्टाकडून जो लेखी आदेश दिला जातो, त्याला 'ब्लॅक वॉरंट' म्हणतात. पुढे वेबसीरिजमध्ये सुनील कुमार गुप्ताला तिहार जेलमध्ये जेलर म्हणून नोकरी मिळते. स्वभावाने काहीसा अबोल, प्रामाणिक, हळव्या मनाचा सुनील तिहारच्या कठोर वातावरणात किती टिकेल हा प्रश्नच असतो. पुढे DSP तोमरच्या मार्गदर्शनाखाली सुनील तिहारचे बारकावे समजून घेतो. खून, चोरी, अपहरण, बलात्कार असे गंभीर गुन्हे केलेले कैदी जेलमध्ये दिसतात. प्रत्येकाची स्वतःची कहाणी असते.

यापैकी रंगा-बिल्ला सारख्या कुख्यात गुंडांना फाशी देताना त्यांची अन् पोलिसांची मानसिकता काय असते, याचं चित्रण पाहायला मिळतं. शारीरिक आणि मानसिक घुसमट करणाऱ्या तिहार जेलच्या या वातावरणात सुनीलचा निभाव कसा लागतो? त्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो? याची अंगावर शहारा आणणारी कहाणी 'ब्लॅक वॉरंट'मध्ये बघायला मिळते. पण इतकीच या सीरिजची कथा नाही तर त्यापलीकडेही अनेक गोष्टी 'ब्लॅक वॉरंट'मध्ये आहेत. 

विशेष काय?

विक्रमादित्य मोटवाने यांनी 'ब्लॅक वॉरंट' सीरिज बनवली आहे. सुनील गुप्ता, सुनेत्रा चौधरी यांनी जो अनुभव पुस्तकात शब्दबद्ध केलाय तो मोटवाने यांच्या टीमने लिलया वेबसीरिजमध्ये उतरवलाय. पुस्तकावर आधारीत फार कमी कलाकृती असतात ज्या लेखकाच्या शब्दांना न्याय देतात. 'ब्लॅक वॉरंट'ने लेखकाच्या शब्दांना न्याय दिलाय हे क्षणोक्षणी जाणवतं.

हॉरर सीन नसले तरी काही कठीण प्रसंग ज्यापद्धतीनं चित्रीत केले गेलेत ते अगदी अंगावर आल्याशिवाय राहत नाहीत. उदा. रंगा-बिल्ला या कुख्यात गुंडांना फाशी देण्याचा प्रसंग. स्वत: प्रेक्षक म्हणून आपण तो अगदी जवळून अनुभवतो आहोत. जे घडलं असेल ते असंच असेल. यापेक्षा वेगळं काहीच नाही. हे डोळ्यासमोर फिट्ट होऊन जातं अशापद्धतीनं अगदी बेमालूमपणे चित्रीत करण्यात आलं आहे. अशा अनेक घटना सीरिजमध्ये बघायला मिळतात.

'हिंदू-मुस्लिम वाइट नाहीत. तर आपली राजकीय परिस्थिती या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे', असे मार्मिक संवाद असोत किंवा मग कॅरेक्टरबाबत केलं गेलेलं डिटेलिंग. प्रत्येक सीन तुरुंगाला न्याय देणारा वाटतो. एकाक्षणी आपणही तुरुंगातील जागाशी परिचित होतो. शेवटच्या टप्प्यात सीरिज सकारात्मकतेकडे घेऊन जाते आणि दुसऱ्या सीझनची चाहूल लागते.

अभिनय:

दमदार अभिनय 'ब्लॅक वॉरंट' वेबसीरिजचा मुख्य गाभा आहे. कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीची जाणीव सीरिजमध्ये वेळोवेळी जाणवते. शशी कपूर यांचा नातू जहान कपूरने सुनील कुमार गुप्ताची भूमिका साकारलीय. जहानला या वेबसीरिजच्या माध्यमातून पहिल्यांदाच इतकी मोठी भूमिका मिळालीय. जहानने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय. संयत अभिनयाचं दर्शन घडवून कुठेही भूमिकेचा गाभा न सोडता जहानने उत्कृष्ट अभिनय केलाय.

 'ब्लॅक वॉरंट'मध्ये छाप पाडलीय ती म्हणजे राहुल भटने. डीएसपी तोमरच्या भूमिकेत राहुल जेव्हा जेव्हा स्क्रीनवर दिसतो तेव्हा तो अभिनयात सर्वांपेक्षा वरचढ ठरतो. तोमरचा टोन अचूक पकडत सर्वांवर धाक निर्माण करणारा अधिकारी राहुलने मस्त रंगवलाय. राहुलची ही भूमिका अनेक काळ दर्दी चाहत्यांच्या लक्षात राहील यात शंका नाही. 

आणखी एक अभिनेता त्याच्या अभिनयाने मन जिंकतो तो म्हणजे चार्ल्स शोभराजच्या भूमिकेतील सिद्धांत गुप्ता. शोभराजचं व्यक्तिमत्व सिद्धांतने हुबेहूब वठवलंय. मांगट आणि दहीया या पोलिसांच्या भूमिकेत अनुक्रमे परमवीर चीमा आणि अनुराग ठाकूर यांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. अजय जयंती यांनी 'ब्लॅक वॉरंट'ला दिलेल्या म्यूझिकचाही विशेष उल्लेख करावा लागेल.

सरतेशेवटी...

'ब्लॅक वॉरंट' सिनेमाचा खरा नायक कोण आहे?  तर तो म्हणजे सीरिजची खिळवून ठेवणारी पटकथा. अत्यंत बारकाव्यानिशी ही कथा पडद्यावर साकार होते आणि प्रेक्षक म्हणून आपण यात हरवून जातो. अनेक दिवसांनी सशक्त कहाणी असलेली एक हिंदी कलाकृती बघितल्याचं समाधान मिळतं. तुरुंगातले कैदी हे बहुतांशवेळेस आपल्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेमुळे निर्माण होतात.

हे कैदी जेव्हा तुरुंगात जातात तेव्हा एक दुर्लक्षित घटक म्हणून ओळखले जातात. तिहारमधले काही कैदी निरपराध असूनही सिद्ध न झाल्याने त्यांना आयुष्यभर खितपत पडावं लागतं. ना त्यांचं ऐकून घेणारं कोणी असतं, ना त्यांच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलणारं...  ब्लॅक वॉरंट' वेबसीरिज आपला हाच दृष्टीकोन बदलते. त्यामुळे यापुढे जेव्हा आपण आर्थर रोड किंवा येरवाडा तुरुंगाच्या आसपास असू. तेव्हा आपण नजर वळवणार नाही. काहीक्षण माणूस म्हणून संवेदनशील विचार नक्कीच करु.

Web Title: black warrant hindi webseries review based on tihar jail incidents netflix release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.