‘पुनर्जन्म, बालविवाहापेक्षा इतिहास दाखवा’

By Admin | Updated: January 23, 2017 05:05 IST2017-01-23T05:05:33+5:302017-01-23T05:05:33+5:30

‘डेलीसोप’च्या नावाखाली अशाकाही विचित्र आशयाच्या मालिका दाखविल्या जात आहेत, ज्या बघून अक्षरश: चीड येते. ‘पुनर्जन्म, बालविवाह,

'Reincarnation, Show History Between Child Marriage' | ‘पुनर्जन्म, बालविवाहापेक्षा इतिहास दाखवा’

‘पुनर्जन्म, बालविवाहापेक्षा इतिहास दाखवा’

‘डेलीसोप’च्या नावाखाली अशाकाही विचित्र आशयाच्या मालिका दाखविल्या जात आहेत, ज्या बघून अक्षरश: चीड येते. ‘पुनर्जन्म, बालविवाह, सासू-सुनेचे भांडण’ हे विषय घेऊन काहीतरी विचित्र मांडणी केलेल्या मालिकांचा प्रेक्षकांवर मारा केला जात आहे. मला असे वाटते की, अशा विषयांच्या मालिका दाखविण्यापेक्षा ऐतिहासिक मालिकांमधून आपला इतिहास सांगणे गरजेचे आहे. इतिहासातच आपली संस्कृती असून, त्याचे प्रेक्षकांना स्मरण होणे गरजेचे आहे. त्याकाळी होऊन गेलेल्या महात्म्यांनी ज्या पद्धतीने तत्कालीन शत्रूशी लढा दिला, त्या शूरवीरांच्या कथा आपल्याला ज्ञात असायला हव्यात, असे रोखठोक मत अभिनेत्री पल्लवी जोशी हिने व्यक्त केले. ‘पेशवा बाजीराव’ या मालिकेत महाराणी ताराबाई यांची भूमिका साकारणाऱ्या पल्लवीशी केलेली ही खास बातचीत...

हसतमुख आणि गंभीर भूमिकेसाठी तुला ओळखले जाते, मात्र ‘पेशवा बाजीराव’मध्ये तू एका धाडसी महाराणीची भूमिका साकारत आहेस, ही भूमिका साकारावी असे का वाटले?

खरं तर जेव्हा मला या भूमिकेसाठी विचारण्यात आले तेव्हा मीही आश्चर्यचकीत झाले. मात्र, त्याचबरोबर नवी भूमिका अन् तेही आव्हानात्मक असल्याने त्यासाठी मी लगेचच होकार दिला. आजपर्यंत मी माझे व्यक्तिमत्त्व पाहता डेलीसोप करायचे की नाही, या संभ्रमात होती. मात्र, या मालिकेमुळे माझा संभ्रम दूर झाला. जेव्हा मला हसतमुख अभिनेत्री म्हणून बघितले जात होते तेव्हा मला असे वाटत होते की, जणू काही मी हसत-हसत जन्माला आले. त्यामुळे एखादी गंभीर भूमिका साकारताना मी एन्जॉय करीत असे. रडण्याचा अ‍ॅक्ट करण्यात मला आनंद वाटायचा. त्यानंतर ‘मेरी आवाज पहचान है, सारेगमप, अंताक्षरी’ या शोने मला ग्लॅमर मिळवून दिले. पुढे हसतमुख आणि गंभीर भूमिकांपलीकडे काहीतरी करण्याची भावना मनात आली. त्यासाठी ‘पेशवा बाजीराव’मधील महाराणी ताराबाई यांची भूमिका मला खूपच आव्हानात्मक वाटली.
सध्या ऐतिहासिक मालिकांचा ट्रेंड सुरू आहे, तू याकडे कशा पद्धतीने बघतेस?
‘सासू, सुनेचे भांडण, पुनर्जन्म, बालविवाह’ या विषयांवर आधारित मालिका बघितल्यानंतर मला प्रचंड चीड येते. काहीतरी दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यापेक्षा इतिहासावर आधारित मालिका निर्मात्यांनी दाखवायला हव्यात. जेव्हा ‘महाराणा प्रताप’ ही मालिका मी बघितली तेव्हा मला त्यांच्याविषयीच्या बऱ्याचशा गोष्टी जाणून घेता आल्या. इतिहासात आपली संस्कृती दडलेली असल्याने ती लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, संभाजीमहाराज, महाराणा प्रताप यांनी त्या-त्या काळात दिलेल्या लढ्यामुळेच आपले आजचे अस्तित्व आहे, असे मला वाटते. ट्रेंडबद्दल बोलायचे झाल्यास, ऐतिहासिक मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अर्थात, हा सर्व ट्रेंड अर्थकारणावर अवलंबून असला, तरी त्यातून आपल्या इतिहासाची उजळणी होते, एवढाच सकारात्मक विचार आपण घ्यायला हवा.
‘डेलीसोप’ मालिकांकडे तू कशा पद्धतीने बघतेस?
मुळात डेलीसोप मालिकांविषयी माझ्या मनात बराचसा संभ्रम आहे. महिन्यातील २० ते २५ दिवस सलग काम करणे कुठल्याही कलाकारासाठी आव्हानात्मकच असते. शिवाय, खासगी आयुष्य उद््ध्वस्त होते ते वेगळेच. त्यातच या मालिकांचा शेवट कधीच निश्चित नसल्याने त्या कलाकाराला यामध्ये गुंतून राहावे लागते. त्यामुळेच मी आतापर्यंत या मालिकांपासून दूर होते. मी जरी ‘पेशवा बाजीराव’ या डेलीसोपमध्ये झळकत असले, तरी काही दिवसांचाच कॉन्ट्रॅक्ट करून मी मालिकेत काम करीत आहे. इतिहास हा माझा आवडता विषय असल्याने सध्या मी ही मालिका एन्जॉय करीत आहे.
कुठलीही भूमिका साकारताना तू त्यातून सामाजिक संदेश कसा देता येईल याचा विचार करीत असते, या भूमिकेविषयी तुझ्या मनात असा विचार आला होता का?
होय, मुळात मी इतिहासाची विद्यार्थिनी असल्याने महाराणी ताराबाई यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून होते. त्याकाळी पुरुषप्रधान संस्कृतीचा जबरदस्त पगडा असतानाही ताराबाई यांनी स्वत:ची छाप पाडली होती. ‘दंगल’ सिनेमाच्या भाषेत सांगायचे झाल्यास त्या ‘धाकड’ स्वभावाच्या होत्या. आजही समाजात पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असल्याने समाजात ‘ताराबार्इं’चे शौर्य पोहोचायला हवे, या विचारातून मी ही भूमिका साकारली.
आगामी काळातील तुझ्या सिनेमांबाबत काय सांगशील?
हिंदीमध्ये मी सध्या ‘लाल बहादूर शास्त्री’ यांच्या मृत्यूबाबत असलेल्या कॉन्ट्रोर्व्हसीवर आधारित सिनेमामध्ये काम करीत आहे. हा सिनेमादेखील इतिहासावरच आधारित असल्याने मला त्याचा फायदा होत आहे. मराठीमध्ये सध्या तरी मी कुठल्याच प्रोजेक्टवर काम करीत नाही. केवळ या दोन प्रोजेक्टवरच सध्या मी लक्ष केंद्रित करून आहे.

Web Title: 'Reincarnation, Show History Between Child Marriage'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.